पुण्यात पत्रकार देवेंद्र जैनसह १३ जणांच्या टोळीविरुद्ध 'मोक्का' लागू



पुणे :  माहिती अधिकाराचा गैरवापर करून  संघटितरित्या खंडणी वसूल, जीवे मारण्याची धमकी, बंगला बळकाविण्याऱ्या  पत्रकार देवेंद्र जैन, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह १३ जणांच्या टोळीविरुद्ध  पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.


रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. मधुसुधा अपार्टमेंट, लुल्लानगर, बिबवेवाडी) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हॉटेल व्यावसायिकास धमकावून त्याचा बंगला बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये बऱ्हाटे आणि त्याचे साथीदार पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, बडतर्फ पोलिस परवेझ जमादार, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजित सिंह, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार यांच्या नावांचा समावेश होता.


त्यांच्याविरुद्ध मालमत्ता जबरदस्तीने घेणे, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, धमकाविणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे, त्यासह महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही दिवसांपुर्वीच शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याबाबतचे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही दिवसातच मोक्काची कारवाई झाली. अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी याबाबतचा आदेश सोमवारी रात्री काढला.


या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू होता. तपासाअंती रवींद्र बऱ्हाटे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून तो स्वतः टोळीप्रमुख बनला. त्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी आपापसात संगनमत करून शहरात विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार, हडपसर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) समावेश करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे संबंधित आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून करण्यात येत आहे. 


मांजरी भागात राहणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाने फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांकडून बेकायदा सावकारी करून 25 लाख रुपये जादा व्याजदराने कर्ज घेतले होते. त्यानंतर व्यावसायिकाने त्यांना सव्वा अकरा लाख रुपये परत केले होते. तर आरोपींनी निवडणुकीच्या काळात त्यांच्या हॉटेलवर जेवण करून चार ते पाच लाख रुपयांचे बील केले होते. तरीही उर्वरीत रक्कम परत घेण्यासाठी तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचा मांजरी येथील बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या पत्नी व मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर बनावट कागदपत्रे बनवून आरोपींनी बंगला बळकावण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराला कंटाळून व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 

पहिला गुन्हा कोथरुड पोलिस ठाण्यात 

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पहिला गुन्हा 7 जुलै 2020 रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर 12 जुलै रोजी समर्थ पोलिस ठाण्यातही एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 72 लाख रुपये घेऊन आणखी पावणे दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तिसरा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला, त्यामध्ये कोथरूड व औंध येथील जमिनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून एकाची तीस लाख रुपयांची फसवणूक केली होती. तर चौथा गुन्हा केटरिंग व्यावसायिकाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यातच दाखल झाला होता. त्यापाठोपाठ अन्य पोलिस ठाण्यातही बऱ्हाटे विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. बहुतांश गुन्ह्यात बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांनी संघटितपणे कट रचून नागरिकांना धमकाविणे, खंडणी मागणे, मालमत्ता बळकाविणे, जीवे मारण्याची धमकी देणे या स्वरूपाचे गंभीर गुन्हे केल्याचे दाखल गुन्ह्यांमध्ये स्पष्ट झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या