प्रसन्न जोशी यांचा एबीपी माझाला निरोप, लवकरच साम जॉईन करणार ...

 


मुंबई - एबीपी माझाचे ज्येष्ठ न्यूज अँकर प्रसन्न जोशी यांनी एबीपी माझाला दुसऱ्यांदा निरोप दिला असून, लवकरच ते साम मध्ये संपादक म्हणून जॉईन होणार आहेत. जोशी सामच्या वाटेवर असल्याचे वृत्त बेरक्याने काही दिवसापूर्वी दिले होते. 


प्रसन्न जोशी यांनी यापूर्वी २०१५ मध्ये एबीपी माझाला राम राम ठोकला होता. त्यानंतर काही दिवस बीबीसी मराठी आणि एक वर्षे जय महाराष्ट्र करून पुन्हा एबीपी माझा जॉईन केले होते. आता दुसऱ्यांदा एबीपी माझाला निरोप दिला आहे. 


  निलेश खरे यांनी डिसेंबर २०२० मध्ये साम सोडल्यानंतर संपादक म्हणून अनेकजण इच्छूक होते, पण प्रसन्न जोशी यांची निवड झाली होती. त्यानंतर जोशी यांनी एबीपी माझाचा राजीनामा दिला होता, पण माझाच्या नव्या नियमांनुसार तीन महिने चॅनल सोडता येत नाही. म्हणून जोशी माझांमध्ये अडकले होते. त्यांचा नोटीस कालावधी अखेर संपला असून, ते लवकरच साममध्ये संपादक म्हणून जॉईन होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जोशी २४ मे ( सोमवार ) रोजी साम जॉईन करणार आहेत. 


राजेंद्र हुंजे हे डेप्युटी न्यूज एडिटर असून, त्यांच्याकडे आऊटपूटची जबाबदारी जाऊ शकते  तर आवाज महाराष्ट्र  या  डिबेट शोचे अँकरिंग स्वतः  प्रसन्न जोशी करतील अशी शक्यता आहे.  


प्रसन्न जोशी यांची फेसबुक पोस्ट 


'माझा'मधील माझा आज शेवटचा दिवस...


'एबीपी माझा' हे माझ्या व्यावसायिक आयुष्यातील पर्व आहे. हा प्रवास इथे, आज थांबतोय. गेले काही दिवस मी वाहिनीवर नसल्यानं अनेक मित्र, सहृद, ओळखणाऱ्यांनी आवर्जून चौकशी केली. माझ्या तब्ब्येतीबद्दलही ख्यालीखुशाली विचारली. त्यांना तेव्हा सांगता आलं नाही ते आज कळवतो आहे. खरं तर २०१५ला पहिल्यांदा 'माझा' सोडल्यावर मी पुन्हा २०१७ला जॉईन झालो. 'माझा' आणि माझा कनेक्ट असा की मधल्या दोन-अडीच वर्षांचं अंतर जाणवलंच नाही. आज २०१७पासून ते आजपर्यंतचा काळ झरझर डोळ्यासमोरून जातोय. 'माझा'तील पहिली इनिंग माझ्या व्यावसायिक कारकीर्दीचा पाया रचली जाण्याची होती. तर, दुसऱ्या टर्ममध्ये आतापर्यंतचा अनुभव, कौशल्य यांचा कस जोखणारी ठरली. या प्रवासात 'माझा'मधील सगळ्या सहकाऱ्यांची खंबीर साथ मोलाची आहे आणि अर्थातच आमचे संपादक राजीव खांडेकरांचा पाठिंबासुद्धा!


या तीन-साडेतीन वर्षांत टोकाचे वाद अनुभवले, तसंच नॅशनल हेडलाईन ठरल्या अशा दोन मुलाखतीही घेता आल्या. बारामतीला शरद पवारांच्या मुलाखतीत त्यांनी  सुप्रिया हरली तर लोकांचा ईव्हीएमवरचा विश्वास उडेल, या आशयाची मांडणी केली होती. ती मुलाखत आणि त्याआधी त्यांच्यासोबत झालेला सांगोल्याचा दौरा लक्षात राहील. २०१९च्या निवडणुकांसाठी 'खडाखडी' या कार्यक्रमासाठी केलेला राज्याचा दौऱ्यानं महाराष्ट्र पाहता आला. कोल्हापूर-सांगली पुराचं रिपोर्टींग आठवलं की आजही सांगलीतल्या मुख्य बाजारपेठेतून आयर्विन ब्रीजपर्यंतचा पाण्यानं भरलेला रस्ता आठवतो. मी त्यावेळी माझ्या लाईव्हमध्ये एक वाक्य म्हटलं होतं की, अवघ्या पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंतच्या प्रदेशाला दूध देणाऱ्या या शहरात आज लोकांना दूध मिळण्याची मारामार आहे. यावर अनेक कोल्हापूर-सांगलीकरांनी साश्रू नयनांनी आपली वेदना मांडल्याचं मला सांगितलं. गेल्या वर्षी श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यासाठी केलेला अयोध्या दौरा हाही असाच अनुभव. भारतीय राजकीय इतिहासाचं एक प्रकरण पूर्ण होताना पाहत होतो. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही गाजत असलेल्या वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची 'लोकमत'च्या कार्यक्रमात मुलाखत होती. 'एबीपी  माझा' टी.व्ही. पार्टनर होता आणि मला ही मुलाखत घेण्याची जबाबदारी मिळाली. "सिंग यांची बदली हा प्रशासकीय रूटीनचा भाग म्हणायचा का?" या प्रश्नाला देशमुखांनी थेट उत्तर दिलं आणि पुढे काय झालं, काय होतंय त्याचे तुम्ही सारे साक्षीदार आहात.


गेल्या वर्षींपासून आपल्या सर्वांवर कोसळलेल्या कोरोनाच्या आपत्तीत आजतागायत गांजणारा समाज पाहतोय. कोरोना परिषद, शिक्षण परिषदेसारख्या 

कार्यक्रमांद्वारे या काळात 'माझा'नं प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं 'पॉझिटिव्ह' काही देण्याचा प्रयत्न केला जो आजतागायत सुरू आहे. 


'माझा' सोडताना एक छानसा योग जुळून आला तो म्हणजे मीडियातील प्रसिद्ध अशा 'ईएनबीए' पुरस्कारामध्ये मला पश्चिम विभागातील बेस्ट अँकर पुरस्कार जाहीर झाला. जनरली शिव्याच खाव्या लागणाऱ्या आमच्या पेशात असं थोडंफार कौतुक बरं वाटतं.


'माझा'तील प्रत्येक जण जवळचा असल्यानं नावं तरी कुणाकुणाची घ्यायची? त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, त्यांचं मैत्र हा कायमचा ठेवा ठरणार आहे.


माझा 'माझा'तील प्रवास थांबत असला, तरी माध्यमातील प्रवास सुरूच आहे.  नव्या जबाबदारी आणि नव्या मंचासह पुन्हा भेटूच.....


तोपर्यंत...सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या