पणजी : एकीकडे कोविडमुळे पत्रकारांचे जॉब जात असताना आणि पगारकपात सुरू असताना सकाळ ग्रुपनं गोवा मोहिम उघडलीय. सकाळ चालवत असलेल्या गोमन्तकचं पेपरचं रिलॉंचिंग करण्यासाठी लोकमतच्या गोवा एडिशनला भगदाड पाडलं. संपादक राजू नायक यांच्यासोबत पाच अव्वल कर्मचारी गोमन्तकमध्ये गेले आहेत.
येणाऱ्या मार्च- एप्रिल महिन्यात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांपेक्षा सगळ्या वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांनीच जास्त तयारी सुरू केली आहे. सकाळ ग्रुपने त्यासाठी ताज्या दमाचा संपादकीय सेट अप उभारणं सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी लोकमतला टार्गेट केले. त्यासाठी सीईओ उदय जाधव, समूह संपादकीय सल्लागार श्रीराम पवार गोव्यात तळ ठोकून होते. लोकमतचे संपादक राजू नायक, सहसंपादक अनंत साळकर, दक्षिण गोवा आवृत्ती प्रमुख सुशांत कुकळकर, वृत्तसंपादक भरत शिंदे, सिनीअर उपसंपादक सचिन कोरडे असे पाचजण पहिल्या फळीत गोमन्तकमध्ये गेले. आणखी पाचजण जून अखेरीस कॉन्ट्रॅक्ट संपले की लोकमतला रामराम ठोकणार आहेत.
युनिट मॅनेजर, एचआरची दादागिरी भोवली
लोकमतच्या गोवा युनिट हेड आणि एचआर हेड यांनी चालवलेली मनमानी लोकमतला भारी पडली. गेल्या वर्षी कोविडच्या कारणाखाली अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यात 10-12 वर्ष काम करणार्यांनाही काढून टाकण्यात आले. नंतर उरलेल्यांचे पगार कापले गेले. संपादकीय विभागात युनिट हेड आणि एचआरने दादागिरी चालवल्याने अस्वस्थता होती. ती आता बाहेर पडली. आता कामगार मिळत नसल्याने काढून टाकलेले, सोडून गेलेल्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यासाठी समूह संपादक विजय बाविस्कर, पुष्कर कुलकर्णी, प्रेमदास राठोड हे दिग्गज गोव्यात तीन दिवस माणसे शोधून थकले. अनेकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, पण कोणीही होकार देईना. सगळेच नकार देऊ लागल्याने शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तरीही प्रतिसाद शून्य मिळाल्यामुळे हे त्रिकूट माघारी परतले. मात्र एकेकाळी लोकमतमध्ये जाण्यासाठी खटपटी करणारे पत्रकार आता का म्हणून नकार देतात हे व्यवस्थापनाला आता कळून चुकले आहे. युनिट हेड आणि एचआरचा तुसडेपणा , कामगारांना मिळणारी हिन वागणूक याचमुळे एडिशनचे बारा वाजले, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गोवा आवृत्तीची जबाबदारी निवासी संपादक सद्गुरू पाटील यांना देण्यात आली. मात्र सगळा अनुभवी स्टाफ सोडून गेल्यामुळे आणि उरलेल्यांची आशा नसल्यामुळे पाटील यांच्या समोर एडिशन चालवण्याचे मोठे आव्हान आहे. माणसे मिळत नसल्याने तेही वैतागले आहेत. युनिट हेड आणि एचआरचा संपादकीय विभागाला कमी लेखण्याचा स्वभाव पहाता, गोव्याबाहेरून माणसे आणण्याची नामुष्की लोकमतवर येणार असे दिसते.
0 टिप्पण्या