युट्यूब्स चॅनल्सचा सुळसुळाट ...

(पूर्वार्ध )


मी सुळसुळाट हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय.कारण सुळसुळाट हा उंदीर आणि घुशींचा असतो.कायम काहीतरी कुरतडत राहणारे उंदीर आणि कायम बिळं खोदत राहणाऱ्या घुशी.वरवर यकिश्चित म्हणजे किरकोळ,नगण्य वाटणारे हे शूद्र जीव.पण हे उंदीरमामा त्याच्या सततच्या कुरतडीने एखादं मजबूत पोलादी जहाज सुद्धा बुडवू शकतात,आणि जहाज बुडायला लागलं की शिताफीने टपाटप उड्या मारून सर्वात आधी पसार सुद्धा होतात.तसंच घुशींचं.घूस एकदा लागली की मग इमारत कितीही मजबूत असो.तिचा पाया खचलाच म्हणून समजा.


   तर दोस्तहो,अशा या वरकरणी शुल्लक,किरकोळ,निरुपद्रवी,नगण्य,यकिश्चित वाटणाऱ्या उंदीर आणि घुशींचा भयंकर सुळसुळाट हल्ली इंटरनेट पत्रकारितेत झालाय.म्हणजे असं पहा की,इलेट्रॉनिक मीडिया हे जर प्रिंट मीडियाचं कानामागून येऊन तिखट झालेलं आणि अति लाडावून सैराट झालेलं सावत्र भावंड असेल तर इंटरनेट मीडियाला काय म्हणायचं ? त्यातले त्यात ब्लॉग हा जरा बऱ्या पैकी माणसाळलेला भाऊबंद आहे.पण युट्यूब्स चॅनल्सच्या गल्लीबोळात कोण कोण राहतात आणि काय काय करतात,ते जे काही करतात त्याला पत्रकारिता म्हणायचं का ? किंबहुना युट्युब चॅनल्स या प्रकाराकडे पत्रकारिता या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पाहायचे का ? की केवळ गावातल्या चावडी,कट्टा किंवा कुचर ओट्यावरच्या बाजारगप्पा म्हणून ?



  एक खरे की युट्युब चॅनल्स हा आजकाल अनेकांच्या उपजीविकेचा व्यवसाय,उद्योग किंवा धंदा झाला आहे.मला बाकी क्षेत्राबद्दल इथे काही भाष्य करायचं नाही.कारण युट्युब चॅनल अनेकविध विषयांशी संबंधित आहेत.मला इथे बोलायचं आहे ते युट्यूब्सच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या झुंडी बद्दल.होय झुंडीच.मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरलाय.आज महाराष्ट्रात पत्रकारिता करणारी,म्हणजे तसा भास,आभास,आव आणणारी किती युट्युब चॅनल्स असतील ? म्हणजे ठळकपणे नजरेत येणारी.बऱ्यापैकी पहिली जाणारी.सबस्क्राईब होणारी दहा-बारा चॅनल्स बाजूला ठेवा.म्हणजे आपण आज मुख्यतः बोलणार आहोत त्या 'पंटर,शुटर,खबऱ्या,म्होरक्यां'बद्दलच.पण त्यांचं एन्काउंटर करण्या आधी महाराष्ट्रात युट्युब चॅनल्सच्या नावाखाली जो काही उंदीर-घुशींचा गावगन्ना सुळसुळाट सुरु आहे त्या बद्दल बोलून टाकू.


काय आहे या अत्याधुनिक मोबाईल्स मध्ये इतक्या अत्याधुनिक तांत्रिक सुविधा आहेत की तुम्ही ठरवलं तर त्यावर अख्खा एखादा सिनेमा शूट आणि एडिट करू शकता.तो प्रसारितही करू शकता.(राज कुंद्राने तेच तर केलं) बरं याला काही सेन्सॉर नाही.पीआरबी कायदा नाही,आरएनआय नोंदीची किंवा परवान्याची गरज नाही.इतकंच काय ते युट्युब चॅनल कोण चालवतोय याचीही माहिती देण्याची गरज नाही.त्यामुळे झालंय काय की कोणीही उठतो आणि युट्युब चॅनल सुरु करतो.एकटा,दुकटा किंवा दोनचार जण मिळून.या ओनर्स मध्ये आपसात बिनसले की तिथेच नवे युट्युब चॅनल जन्माला येते.ते अल्पजीवी ठरते हा भाग वेगळा,किंवा समजा जगले वाचले तरी कुपोषित,लुळे पांगळे खुरडत खरडत इंटरनेटच्या ट्रॅफिक सिग्नलवर सब्स्क्राइब करो साब...भगवान आपके बाळ बच्चोको सुखी रखेगा.आपको बरकत होगी अशा अर्थाचे आशीर्वाद देत दिवस काढतात.


अमुक एक कमाल मर्यादा गाठली की त्यांना डॉलर्सच्या रूपात पैसे मिळतात म्हणे.मिळतही असतील.म्हणजे मिळावेत.मिळायला हवेत.पण खरेच मिळतात का ? आणि किती जणांना मिळतात ? दहा-पाच जणांना मिळतही असतील कदाचित.पण मृगजळामागे धावणाऱ्या आणि दमछाक करून घेणाऱ्या बाकीच्या हरणांचे काय ? ते त्यांचा अमूल्य वेळ आणि क्रेयशक्ती निष्कारण वाया तर घालवत नाहीत ना ? कोण आहेत या युट्युब चॅनल्सचे ओनर्स ऑनर्स वगैरे.तर बहुतांश लॉक डाउनच्या काळात अनेक दैनिकांनी किंवा टीव्ही न्यूज चॅनल्सनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली बाहेर काढलेले बेरोजगार पत्रकार.ते अन्य काही करू शकत नाहीत,कुठे जॉब मिळत नाही म्हणून एकतर ब्लॉग काढतात किंवा मग युट्युब चॅनल.दुसरा वर्ग पत्रकारितेतून सक्तीने वा स्वतःहून निवृत्त झालेल्या जेष्ठ पत्रकारांचा आहे.ही संख्या मोठी आहे.पूर्वी हे लोक मुक्त पत्रकार म्हणून,किंवा पुस्तके लिहिण्याचे वगैरे काम करीत.पण या कामाला आता पाहिजे तितके मार्केट आणि डिमांड राहिलेले नाही.म्हणण्यापेक्षा बरकत नाही ,यातले काहीजण स्वतःचे अनियतकालिक,साप्ताहिक किंवा विशेषांक काढीत.पण अलीकडे या धंद्यालाही उठाव नाही.थोडक्यात शितापेक्षा भुतांची संख्या जास्त झाल्याने सगळेच उपाशी आहेत आणि मिशीत भाताचे शीत अडकवून ढेकर देत फिरताहेत अशी अवस्था आहे.तर अशा मंडळींची संध्याकाळी पथारी मांडण्याची धर्मशाळा  युट्युब चॅनल असे माझे वयक्तिक मत आहे.


मला कोणाला नाउमेद करायचे नाही.कोणाचा उपमर्द अथवा टवाळीही करायची नाही.हे माध्यम चांगले हाताळले तर त्याची ताकद मोठी आहे निश्चित.कारण प्रिंट मीडिया आणि इलेट्रॉनिक मीडियापेक्षाही वेगाने,अधिक माणसापर्यंत आणि स्वस्तात पोहचण्याचा हा मीडिया आहे.अगदी प्रारंभी तिथे शिस्त,औचित्य पाळले जात होते.पण हळूहळू त्यात उंदीर घुशींचा इतका सुळसुळाट झालय की विचारता सोय नाही.बरे रॅटरेस अशी की जुने,नवे,नवखे,गुडघ्याला बाशिंग बांधलेले उतावळे,शिंगे मोडून वासरात शिरलेले डंगरे,शिंगरे,वळू,मेंढरे,एडके,बकरे असे सगळे सबघोडे बारा टक्के झालेत.त्यामुळे युटयूब चॅनल्स हा प्रकार आता उबग आणणारा आणि कंटाळवाणा ठरतोय.प्रश्न गुणवत्तेचा आणि तंत्रशुद्धतेचा आहेच,त्याशिवाय भूमिका,धारणा आणि धोरणांचा आहे.प्रेक्षकांना गृहीत धरून तुम्ही त्यांच्या समोर काहीही नाही ओतू शकत.प्रेक्षक एवढा दुधखुळा नाही.

(क्रमशः)

-रवींद्र तहकिक

7888030472


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या