यूट्यूबच्या शिवारात निंबोळ्या वेचणारे हौशे.नवशे.गवशे आणि पावशे ...

भाग-३


कुणी मला म्हणतील,मीडियातल्या मोठ्या डॉन,डाकूंना सोडून युट्युबवाल्याना का झोडताय राव.ते भास्करचं पहा ना जरा.मीडियाच्या नावाखाली काय काय धंदे करतात हे मीडियातले बडे डॉन-डाकू.फक्त भास्करच नाही इतरही अनेक.प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडियाचे चालक मालक.बोगस सर्कुलेशन वाढवून किंवा खोटे आकडे दाखवून सरकारी,कार्पोरेट जाहिराती मिळवायच्या.राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या ब्रॅण्डिंगच्या किंवा बदनामीच्या सुपाऱ्या घ्यायच्या.मांडवल्या करायच्या.त्यातून आमदारकी,खासदारकी मंत्रीपदे या पासून सरकारी कामांचे ठेके,भूखंड,आणखी काय काय मिळवायचे.खोटी उलाढाल-तोटे दाखवून कर चुकवायचे.अनेक मीडिया हाऊसचे मीडियाव्यतिरिक्त काय काय बिजनेस सुरु आहेत.किती जणांनी स्वतःच्या कंपन्या उद्योग चालवलेत.


कोणाचे कोणकोणत्या कंपन्यात शेअर्स आणि पार्टनरशिप आहेत.कितीजण केवळ आपल्या बेकायदेशीर गैरव्यवहारांना संरक्षण म्हणून मीडियाचा हत्यार म्हणून वापर करतात.यावर जरा प्रकाश टाका की.हिम्मत असेल चौथ्या स्तंभातील या अंडरवर्ल्ड बद्दल बोला.करा त्यांचे एन्काउंटर.ते सोडून आम्हा युट्युबर्सवर कशाला शक्ती खर्च करताय.आम्ही तुमचे काय घोडे मारले.किंवा समाजाचे काय वाकडे केले.आमची ताकद किती,आवाका किती.उपद्रव मूल्य किती.घातक क्षमता किती.आम्ही करून करून काय करणार.ठीक आहे आम्ही काही चुकत असू.पण ही आमची जगण्याची,अस्तित्वाची धडपड आहे.एक तर कोरोनाने मीडियात काम करणाऱ्यांचे कंबरडे मोडले.अनेक वर्तमानपत्रांनी आणि न्यूज चॅनल्सनी अनेक जणांना बाहेरचा रस्ता दाखवला.


कित्येकजण जर्नालिझम करूनही काम नाही म्हणून बेकार आहेत.हे सगळे हौशे,नवशे,गवशे,पावशे सध्या यूट्यूबच्या नादात पडलेत.निदान मनाचे समाधान.जमलेच जुगाड तर चार पैसे मिळतील.असे या मंडळींना वाटते.अनेकांना तीन हजार ह्यूज आणि चार हजार तास ह्यूचा आकडा खुणावतो.कुठलीही गुंतवणूक न करता,फारसे कष्ट न करता काहीतरी केल्याचे समाधान.पत्रकार म्हणून ओळख.कमाई हा बोनस.एवढीच माफक अपेक्षा या बहुतांश युट्युब चॅनल्स चालवणाऱ्यांची दिसते.पूर्वी निंबोळ्या वेचून विकण्याचा एक प्रकार खेड्या पाड्यात चालायचा.आज पन्नाशीच्या वयात असणाऱ्या मंडळींना तो चांगला माहिती आहे.


सत्तरच्या दशकात.किंबहुना बहात्तरच्या दुष्काळात गावातले दुकानदार निंबोळ्या विकत घेत असत.त्याचे ते काय करत माहिती नाही.कुठे तरी त्या निंबोळ्याच्या साबणी वैगैरे करतात म्हणून वदंता होती.लोकांना त्याच्याशी काही कर्तव्य नव्हते.दुष्काळ पडलेला होता.लोकांच्या हाताला काम नव्हते.जगण्याची ददात होती.त्यामुळे अनेकजण सकाळीच पामतेलाचे रिकामे डबे घेउन रान शिवारात जाऊन दिवसभर निंबोळ्या वेचत आणि दुकानात आणून विकत.त्यातून काही फार मोठी कमाई मिळत असेल अशातला भाग नाही.पण काहीतरी काम केल्याचे समाधान.यात जसे हौशे नवशे गवशे आणि पावशे असत तसेच आज युट्युब चॅनल्स मध्ये मरणाची गर्दी पडली आहे.त्यांच्यावर हसावे की रडावे हे ठरवावे लागेल.कीव करावी अशी परिस्थिती नक्कीच आहे.म्हणजे तंत्रशुद्धता,भाषाशुध्दता,कन्टेन्ट,प्रेझेंटेशन या बाबतीत.पण सगळ्याच साधन संपत्तीचा अभाव असल्याने त्यांच्या मजबुरीवर खरे तर दयाच व्यक्त करायला हवी.राहता राहिला प्रश्न प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडियातल्या डॉन-डाकूंचा.विषय गहन आहे.पण त्यांचे देखील एन्काउंटर याच लेखमालेत होणार हे नक्की.

(क्रमशः)

-रवींद्र तहकिक

7888030472


Post a Comment

0 Comments