चौथ्यास्तंभ केळीचा खुंट झालाय का ?

भाग -१४

 मी आठ वर्षांपासून पत्रकारितेत आहे.एका उप प्रादेशिक दैनिकाचा कार्यकारी कार्यकारी संपादक म्हणून.दैनिकाचे वय मोठे असले तरी आमचे सर्क्युलेशन छोटेच आहे.छोटे म्हणजे जेमतेम.छोटेखानी.हे काही महत्वाचे नाही,सांगायचा मुद्दा असा की,आम्ही काही आमचं झाकून आणि लोकांचं वाकून पाहत नाहीत.आमचं उघड सांगायला आम्हाला आडपडदा ठेवायचं कारण नाही.लपवण्यासारखं नाहीच काही तर झाकवायचं काय ? पुन्हा असो.तर मूळ मुद्दा असा की आठ वर्ष झाली,पत्रकारितेत आणि कार्यकारी संपादक म्हणून.पण अजून मी एकही राजकीय नेत्याचा इंटरव्ह्यू घेतला नाही.आय शप्पत ! बाइट्स सुद्धा नाही.पत्रकार परिषद तर नाहीच नाही.


मुळात मला हा सगळा प्रकार आवडतच नाही.कशाला पाहिजे पत्रकार परिषद ? शेवटी प्रेसनोट घेऊन तीच तेलात तळून-पाकात भिजवून छापता ना.बाकी काय घडतं तिथे ? चहा कॉफी नाश्ता लंच डिनर,फारच खास पार्टी असेल तर नॉनव्हेज लिकर.त्या बदल्यात  संबंधित राजकीय पक्षाच्या किंवा  नेत्याच्या मर्जी आणि कलानुसार प्रश्न विचारायचे.गुडी गुडी.मग पाकिटे आणि जाहिराती मिळतात.निवडणूक असेल तर पॅकेज.पेपरला,पत्रकारांना.एरवी लहान मोठ्या भेटी.हे पूर्वी आम पब्लिकला माहित नव्हतं.पक्ष नेते मोजके होते.आता काय कोणीही शेंबडा नागडा  पत्रकार परिषद घेतो.पत्रकारही तिथे जातात.त्यामुळे आजकाल पत्रकार परिषद म्हणजे थोडक्यात नवरीच्या बापाची आणि बॅंडवाले,मंडपवाले,आचारी,घोडेवाले,फटाकेवाले,पानपट्टीवाले,डेकोरेशनवाले,यांची बैठक असते.


पत्रिका एकच,सुपाऱ्या वेगळ्या वेगळ्या.क्वचित कोणी एखादा क्रॉस क्वश्चन विचारलाच तर त्या नेत्याचे पीए कार्यकर्ते वगैरे त्या पत्रकाराला जवळपास दटावून गप्प बसवतात.किंवा स्वतः तो नेताच त्या पत्रकाराचा जाहीर पाणउतारा होईल असा प्रतिप्रश्न करतो.त्याची खिल्ली उडवतो.यावर सगळे (बाकीचे पत्रकार सुद्धा )फिदी फिदी हसून त्या पत्रकाराच्या जाहीर मानभंगाचा शिमगा साजरा करतात.कमी अधिक फरकाने सर्वच राजकीय पत्रकार परिषदेत हेच घडते.कोणीही पत्रकार मान वर करून कोणत्याही नेत्याला मर्मभेदी प्रश्न विचारीत नाही.कारण त्याला बातमी पेक्षा जाहिरात मिळवायची असते.पुन्हा रिलेशन मेंटेन करायचे असते.त्यात राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर यासारखे काही जण तर जणूकाही पत्रकारावर उपकारच करतात.डाफरतात सुद्धा.त्यावर कोणीही पत्रकार उभा राहून तुमची ही अरेरावी चालणार नाही म्हणून सुनावण्याची हिम्मत करीत नाही.ताठ बाणा आणि कणा उरलाय कुठे.सगळ्यांना शेपट्या फुटल्यात.उघडी ढुंगणं झाकायला.


म्हणून मी पत्रकार परिषदेला जात नाही.मुलाखती तरी काय असतात.मोदी आणि अक्षयकुमारची ती 'आंबा चोख'मुलाखत जाऊद्या.तो काही पत्रकार नव्हता.पण मला राजदीप सरदेसाईने घेतलेली राज ठाकरेंची एक मुलाखत आठवते.दुसरी एनडीटिव्हीच्या एका महिला पत्रकाराने घेतलेली अमित शहांची मुलाखत.अरेरेरे.लाज वाटली लाज.राज ठाकरे चक्क राजदीप सरदेसाईला भुंकू नकोस म्हणाला.मी जर  राजदीपच्या जागी असतो ना तिथेच कानाखाली खेचली असती,पुढचं पुढं बघता आलं असतं काय ते.मारलं असतं ना त्याने.त्याच्या कार्यकर्त्यांनी.सुरक्षारक्षकांनी,किंवा पोलिसांनी.मग मलाही पत्रकारावर हल्ल्याची केस करता आली असती.कुत्रा संबोधून माझी मानहानी केल्याची.आणि समजा यदाकदाचित पैसे ,मोठे वकील लावून त्याने न्यायालयात माझी कृती गुन्हा ठरवली असती तर एखाद्या नेत्याच्या मुस्काडीत मारण्याची शिक्षा भारतीय दंडविधानात असून असून काय असेल ? मी ती भोगली असती .


मला कुत्रा म्हणणाऱ्याचे मुस्काड फोडण्याच्या बदल्यात.कारण मला शेपटी फुटलेली नाही.राजदीप सरदेसाईला नुसती शेपटीच नाही तर त्या शेपटीला गोंडा देखील आहे.पोळ्याला त्या गोंड्याची चांगली नक्षी देखील काढून घेतो.निर्लज्ज नालायक.अशी चौथ्या स्तंभाच्या अवमाननेची अनेक उदाहरणे आहेत.२०१९ च्या निवडणूक प्रचारात एका वृत्तवाहिनीच्या महिला अँकरने घेतलेली अमित शहांची मुलाखत तुम्हाला आठवते का ? मला तर ती एखाद्या लांडगा आणि शेळीचीच भेट वाटली.प्रश्न आधीच ठरलेले आणि सोयीचे होते.कुठेही क्रॉस काँट्रॅव्हर्सी नव्हती.तरी ती बया कशामुळे तणावात होती तिलाच माहित.बाकी मग नेत्यांच्या मागे बाइट्स साठी पळणारे पत्रकार ही एक कॉमेडी सर्कसच असते.एवढा का थाट रुबाब करतात हे लोक.नाकावरची माशी आणि पत्रकारांचे प्रश्न सारख्याच तुच्छतेने उडवून लावतात.मोठे-जेष्ठ तर जणू ताटावरच्या माशाच वारतात,त्यांचे पाहून चिल्ले पिल्लेही.लंगड्या गायीवर नाही का डांगरा बैलही टांग मारतो,गोऱ्हाही चढतो,अन वासरंही स्वतःला अजमावतात. आमचा चौथ्यास्तंभ केळीचा खुंट झालाय का ?

(क्रमशः )

-रवींद्र तहकिक

7888030472

Post a Comment

1 Comments

  1. खूपच छान लिहिलंय सर, अगदी वास्तववादी....

    ReplyDelete