अमळनेरमध्ये महिला पत्रकार जयश्री दाभाडेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल !
राज्यात पत्रकारितेच्या नावावर खंडणी उकळण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. पुणे, नाशिक व विदर्भातून काही बोगस पत्रकारांच्या खंडणीची प्रकरणे अलीकडेच चव्हाट्यावर आली होती. त्यात आता खान्देशातील अमळनेरसारख्या छोट्या गावतील एक प्रकरण समोर आले आहे. यात चक्क एका महिला पत्रकाराने म्होरक्याची भूमिका निभावली आहे. तांदूळ घेऊन येणारे मालवाहू वाहन रस्त्यात अडवून एक लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अमळनेर येथील पत्रकार जयश्री दाभाडे यांच्यासह 8 जणांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, धुळ्यातील महेश सुरेश वाणी यांच्या मालकीचे तांदळाचे 346 कट्टे घेऊन चालक इम्रान फझल हक अन्सारी हा आयशर ट्रकने धुळ्याहून चोपड्याकडे निघाला होता. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अमळनेर गावाच्या हद्दीत दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी रस्त्यात हे वाहन अडवले. या टोळक्याने चालक इम्रानला धमकावून त्याच्याकडील मोबाईल फोन व गाडीची चावी हिसकावली. याचवेळी पत्रकार जयश्री दाभाडे व अन्य एक जणही दुचाकीवर तेथे आले. "तुम्ही हफ्ता न देता चालता, तुम्हाला हप्ते द्यावे लागतील, मालकाला फोन लाव व इथे बोलाव," असे या 8 जणांच्या टोळक्याने चालकाला सांगितले. त्यांनी वाहकाला गाडी परत धुळ्याकडे नेण्यास सांगितली. त्यानंतर लोंढवे येथे गाडी थांबविण्यात आली. मालक महेश वाणी तेथे पोहोचले. या टोळक्याने त्यांच्याकडे गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये खंडणीची मागणी केली.
चालकाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला पत्रकार जयश्री दाभाडे व त्यांच्यासोबतच्या इतर सात जणांवर खंडणी मागणे व खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे, रस्ता अडवणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
0 टिप्पण्या