गुरुनाथ नाईक : मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते ...


तो तो नव्हताच ! तो होता एक झपाटलेला.अखेर तो गेला.ज्या पुण्यात त्याचे तारुण्य गेले,ज्या पुण्यात तो शिकला,ज्या पुण्यात त्याने पहिली नोकरी केली.ज्या पुण्यात त्याने पहिली रहस्य कथा लिहिली,त्याच पुण्यात त्याचा मृत्यू झाला.वयाच्या ८४ व्या वर्षी.म्हणजे तो तसा दीर्घकाळ जगला.महाराष्ट्रातील पुणे,औरंगाबाद,मुंबई, अहमदनगर,लातूर या शहरात आणि गोव्यातील पणजीत तो टप्प्या टप्याने राहिला.वार्ताहर,उपसंपादक ते संपादक असा त्याचा प्रवास.म्हटला तर संघर्षाचा,बराचसा अस्थिर,अडी-अडचणीनी वेढलेला होता .उपजीविकेचे निश्चित,हक्काचे आणि कायम साधन हाताशी नसणे ही खरी समस्या होती,तिने त्याची शेवटपर्यंत पाठ सोडली नाही.


जन्म त्याचा गोव्यातला.आडवाई साखळी हे मूळ गाव,राणे हे आडनाव.त्याचे आजोबा विष्णू राणे हे गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय होते.पोर्तुगीजांनी त्यांना पकडून तुरुंगात डांबले.तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.तरीही पोर्तुगीज पोलीस रोज रात्री बेरात्री घरी येत.झाडाझडती घेत.त्यामुळे त्याच्या आजीने सात वर्षाच्या मुलाला घेऊन गोवा सोडले आणि पणे गाठले.इथेही ब्रिटिशांची राजवट होती.पोर्तुगीजांशी ब्रिटिशांचे साटेलोटे होते.त्यामुळे त्याच्या आजीने ओळख लपवण्यासाठी राणे हे आडनाव बदलून नाईक असे ठेवले.मुलाचे नावही मराठी वाटावे म्हणून विठ्ठल ठेवले.आजीने आयुष्यभर मोल-मजुरी केली आणि एकदिवस देवाघरी गेली .


विठ्ठल मोठा झाल्यावर पोलिसात गेला.पण पगार तुटपुंजाच.त्यात लग्न झाल्यामुळे घरात खातीतोंडे वाढलेली.मग त्याची आई देखील मोल-मजुरीची कामे करू लागली.याच काळात त्याचा जन्म झाला .पण सटवीने त्याच्या कपाळावर भटकंतीच लिहून ठेवली होती.दारिद्र्य पाचवीला पुजलेले.तरीही तो शिकला.जेमतेम मॅट्रिक-इंटर पर्यंत.आई आता थकली होती.तिच्याच्याने मोल-मजुरीची कामे होत नव्हती.त्यालाही तिची उरस्फोड अस्वस्थ करायची.मग त्याने आचार्य अत्र्यांच्या 'मराठा'त पुणे वार्ताहर म्हणून नोकरी धरली.पगार २५ रुपये.तोही दोन-दोन,तीन-तीन मिळायचा नाही.पण एके दिवशी त्याच्या एका बातमीने चमत्कार घडवला.माधव काझी नावाच्या बेळगाव-निपाणी आणि महाराष्ट्रात तंबाखूचा व्यापार एका अवलियाने वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या नावांनी,वेगवेगळ्या महिलांशी विवाह केल्याची आणि अखेर त्याचे बिंग फुटून त्याला अटक झाल्याची बातमी त्याने 'मराठा'ला पाठवली.


अत्र्यांनी ती पहिल्या पानावर त्याच्या नावासह म्हणजे बाय लाईन छापली.इतकेच नाही तर या बातमी बद्दल अत्र्यांनी त्याला एका पगार एवढे बक्षीस आणि स्वतःच्या खिशातले पेन काढून दिले.इतकेच नाही तर माधव काझीच्या स्टोरीवर आचार्य अत्र्यांनी 'तो मी नव्हेच' हे नाटक लिहिले.त्यातले लखोबा लोखंडे हे पात्र माधव काझीवरच बेतलेले होते.हे नाटक तुफान चालले,आणि त्याला त्याच्या लेखणीची ताकद लक्षात आली.पुढे अत्र्यांच्या निधनानंतर तो मुंबईला नीळकंठ खाडिलकरांच्या नवाकाळ मध्ये गेला.अरे हो दरम्यानच्या काळातली एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच.मराठात असतानाच एकदा नवाकाळचे संपादक नीळकंठ खाडिलकरांनी त्याला दिवाळीअंकासाठी दोन रहस्यकथा लिहून मागितल्या होत्या.एका कथेचे पाच रुपये मिळणार होते.त्यावेळी त्याच्यासाठी ही मोठी रक्कम होती.अशातच तो पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स ॲन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेला,आणि काहीतरी क्लिक झालं.चित्रपट अर्ध्यातच सोडून तो घरी आला,आणि अक्षरशः झपाटल्या प्रमाणे त्याने रात्रभर जागून एक फर्मास रहस्यकथा लिहून काढली.‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ! दुसऱ्या रात्री दुसरी कथा 'हिरवे डोळे'.कथा थोड्याश्या मोठ्या होत्या.म्हणजे दिवाळी अंकाच्या पॅटर्न मध्ये न बसणाऱ्या.म्हणून खाडिलकरांनी त्याला पत्र पाठवून याच कथा आणखी थोड्या दीर्घ कर म्हणजे आपण त्या लघुकादंबऱ्या म्हणून छापू असे कळवले.तिथून त्याची जी लेखन कामाठी सुरु झाली ती शब्दशः दिन दुगुनी,रात चौगुनी वाढतच गेली.


तब्बल १२०० लघु  कादंबऱ्या.दोन नाटके,७५० हुन अधिक लघुकथा,आणि २०० हुन अधिक बालकथा.एवढं प्रचंड लेखन,आणि तितकाच प्रचंड वाचक वर्ग.त्याच्या लेखनाचा वेग-आवेग भयंकर होता.महिन्याला सात ते दहा कादंबऱ्या.दरम्यानच्या काळात नोकरीसाठी भटकंती सुरूच होती.आईच्या निधनानंतर त्याने पुणे सोडले .काहीकाळ मुंबईत नवाकाळ मध्ये.मग गोव्यातील गोमंतक,नवप्रभा.औरंगाबाद मधील अजिंठा,अहमदनगर मधील सार्वमत,लातूरचा एकमत,अखेरी अखेरीस पुन्हा औरंगाबाद मधील गावकरी.अशी त्याची भ्रमंती सुरु होती.दरम्यान त्याचे लग्न झाले.हा प्रेम विवाह होता.त्याचीच चाहती वाचक असणारी आणि नंतर त्याची लेखनिक म्हणून काम करणारी तरुणी त्याच्या प्रेमात पडली,आणि तो लग्नाच्या बेडीत.


साधारणतः सत्तर ते नव्वद पर्यंतचा तो काळ होता.त्याकाळी वर्तमानपत्रांच्या संपादकांना सुद्धा जेमतेम दीड-दोन हजार पगार असायचा,पुस्तकांचे मानधन देखील किरकोळ असायचे,एकतर त्याच्या कथांचा वाचक स्वतःला उच्चभ्रू समजणारा, तथाकथित उच्च अभिरुची संपन्न  नव्हता,त्याचे नाव आणि आडनावच त्याकाळातील सदाशीवपेठी साहित्यिक आणि वाचकांना खटकत होते.समीक्षक त्याच्यावर टीका करणे सोडाच,त्याची दखल देखील घेत नव्हते.हे साहित्य नव्हेच ! असे त्या शुचीर्भूतांचे म्हणणे.म्हणूनच सर्वाधिक पुस्तके लिहिणारा मराठी लेखक म्हणून त्याचे नाव गिनीज बुकात नोंदवले गेले.तरी आमच्या कृतक,कपाळकरंट्या.कंपूबाज,जातीयवादी साहित्य वर्तुळात साहित्यिक म्हणून त्याला कधी मान्यता मिळाली नाही.


मान मरातब सत्कार पुरस्कारही नाही.उलट कुचेष्टा,अवहेलना आणि उपेक्षाच झाली.मोठ्या प्रकाशन संस्था त्याची पुस्तके प्रकाशित करायला नकार देत,ग्रंथालये त्याच्या पुस्तकांचा विटाळ धरीत.पुस्तकांची दुकानात त्यांची पुस्तके दर्शनी भागात न लावता दडवून ठेवली जायची.अखेर स्ट्रीट फूड सारखी त्यांची पुस्तके रस्त्यावर-हातगाड्यावर विकू लागली.पण ही केवळ भारवाही हमाली ठरली.त्यांच्या पुस्तकांवर प्रकाशक आणि विक्रेते गब्बर झाले,तो मात्र कायम कफल्लक राहिला.हळू हळू त्याचा वाचक वयाने वाढला.त्याच्या लेखनातही तोच तोच पणा येऊ लागला.काळ बदलला.वाचकही थकले,तोही थकला.त्याची लेखणीही थकली.अखेरचा काळ विजनवासात,विपन्नावस्थेत गेला.अन्न वस्र निवाऱ्यासही पारखा झाला.मुलांनाही त्याची हेळसांडच केली.हे कळल्यावर गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकरांनी त्याला हक्काचा निवारा दिला.पण आता सारे काही संपले होते.संध्या छाया पसरली होती.बोलावणं आलं आणि तो गेला.पुण्यात.मागे अनेक गूढ अगम्य रहस्यमयी प्रश्न सोडून.मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते.हीच त्याची अखेरची रहस्यकथा.

-रवींद्र तहकिक

७८८८०३०४७२ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या