भारदस्त आवाज हरपला ... जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन


मुंबई: दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं आहे. भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.


 गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग समजली, त्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.


नमस्कार मी प्रदीप भिडे म्हणत त्यांनी भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली.दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावं असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.


विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. त्यांच्या भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.


मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी 'प्रदीप भिडे कम्युनिकेशन' या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.


नाटकाची पार्श्वभूमी

प्रदीप भिडे यांना नाटकाची देखील पार्श्वभूमी आहे. रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केलं होतं. स्वत:च्या आवाजावर त्यांनी आर्थिक प्राप्ती करण्याच्या निर्णय घेतला आणि खरा ठरवला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या