चित्रलेखाची एक्झिट ...

 


इलेट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमात एखाद्या प्रतिस्पर्धी वर्तमानपत्र किंवा चॅनलचे बंद पडणे अथवा एखाद्या संपादकाची एक्झिट सेलिब्रेट करण्याची विकृत मानसिकता फोफावलेली असताना आम्ही चित्रलेखा या साप्ताहिकाच्या एकार्थाने अकालीच बंद होण्याबद्दल सहवेदना व्यक्त करीत आहोत.एनडीटीव्हीच्या रवीशकुमार यांच्या एक्झिट इतकीच,किंबहुना मराठीपणाच्या नात्याने तोळाभर अधिकच वेदना आम्हाला चित्रलेखा या साप्ताहिकाच्या अकाली एक्झिटने झाली आहे.चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरक राहतील.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीचे झुंजार आणि निर्भीड पत्रकार वजु कोटक यांनी सुरु केलेल्या आणि गेल्या जवळपास ३८ वर्षांपासून ज्ञानेश महाराव या नाव आडनावाला तंतोतंत जागलेल्या,सर्वार्थाने आवलिया म्हणता येईल अशा माणसाने हिकमतीने चालवलेल्या ,चित्रलेखा या वाचकप्रिय साप्ताहिकाने माध्यम क्षेत्रातून सन्मान्य निवृत्ती घेतली.एका अर्थाने ही स्वेच्छानिवृत्ती देखील आहे.बंद पडण्याआधी, बंद करावे लागण्या आधी किंवा कोणा बनीयांच्या हाती पडण्याआधी हा सत्यशोधकी ठेवा सुरक्षितपणे,आब-प्रतिष्ठा राखून विश्रांत झाला आहे.ही हार किंवा हाराकिरी नाही.अंधारापुढे शरणागती नाही.पळपुटेपणा नाही.हे येथे आवर्जून  सांगावे लागेल.कारण चित्रलेखाने आपल्या भूमिकेवर ठाम राहून,त्याची किंमत मोजून वैचारिक लढा दिलेला आहे.

माध्यम जगतातील जीवघेण्या व्यापारी स्पर्धेमुळे आणि वर्तमानपत्रांनीच रविवारीय पुरवण्यांच्या माध्यमातून हप्तेबाजी सुरु केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक वाचकप्रिय मराठी साप्ताहिकांनी एक एक करुन माना टाकल्या.आठवड्यातून तीन ते चार दिवस भारंभार पुरवण्या छापणाऱ्या व्यासाययिक वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत न बोललेच बरे.आंबटशौकीन वाचकांचा कंडू शमवणे आणि जाहिरातींच्या माध्यमातून धंदा करणे हेच या वर्तमानपत्रीय साप्ताहिक पुरवण्यांचे ध्येय धोरण आणि उदिष्ट असते.माध्यम जगतातील या साठमारीत साप्ताहिक नावाची प्रजातीच धोक्यात आली आणि एक एक करून संपुष्टात आली.अशात सर्व्हायव्हल केले ते साप्ताहिक चित्रलेखाने.व्यावसायिक गणित बिघडू न देता भूमिका घेऊन चालणे आणि त्यात कोणतीही तडजोड न करणे ही बोलाची कढी नव्हती.

चित्रलेखाचे संस्थापक वजू कोटक यांचे नंतर पुढच्या पिढीतील मौलिक कोटक यांनीही अखेर पर्यंत तत्वाशी तडजोड केली नाही हे इथे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.चित्रलेखाला ज्ञानेश महाराव सारखे खमके आणि खंबीर संपादक मिळाले,ही एक बाजू. म्हणजे तो बुरुज महारावांनी शर्थीने सांभाळला.पण त्यांचे निशाण पडू न देण्याची खबरदारी कोटक नावाच्या संचालक तटबंदीने अखेरच्या क्षणापर्यंत घेतली हेही तितकेच महत्त्वाचे.वजू कोटकांचा  काळ वेगळा होता.महाराष्ट्रात त्यावेळी आपल्याला न पटणाऱ्या मत भूमिका आणि विचारांचा आदर केला जात असे.मुद्द्याला गुद्दे असा अघोरी प्रकार नव्हता.अलीकडे तर गुद्द्याबरोबर धमक्या,शिव्या,हाणामारी,काळे फासणे,इतकेच नाही तर विरोधात लिहिले म्हणून एखाद्याला आयुष्यातून उठवण्यापर्यंत,जीवघेणे हल्ले करणे ,जीवानीशी मारण्यापर्यंत मजल गेली आहे.अशा या विवेकी माणसाची मती सुन्न करणाऱ्या काळात सत्यशोधकी कास धरून तग धरुन राहणे म्हणजे जळत्या अंगारावरुन चालण्या इतकेच अग्निदिव्य आहे.

आम्ही स्वतः गेली सात आठ वर्षे या अंगारवाटेचा अनुभव घेत आहोत.पोळत,होरपळत आहोत.चित्रलेखा आणि ज्ञानेश महारावांनीही हाच अग्निपथ अनुसरला  होता.त्यात त्यांना कोणकोणत्या अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या.त्यातून ते कसे निभावले,हे खरे तर कधीतरी महाराष्ट्राला कळायला हवे.महाराव यांनी याबाबत कधीतरी लिहावे,जेणेकरून पत्रकार म्हणून परिवर्तनाची आस असणाऱ्या नवागतांना त्यापासून काही प्रेरणा मिळू शकेल.आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंधारलेल्या युगात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला चित्रलेखा सारख्या सत्यार्थी साप्ताहिकाची आणि ज्ञानेश महारावांसारख्या अधिव्याख्यात्याची गरज असतांना ते अचानक का थांबले ? याचे खरे उत्तर महारावच कधीतरी देतील.परंतु त्यांची ही स्थगिती आम्हाला तरी भावलेली नाही. तुर्तास त्यांनी कुठेतरी थांबायचे असते,म्हणून थांबतो.असे मोघम उत्तर देऊन वेळ निभावली आहे.परंतु त्यात नक्कीच काहीतरी मेख आहे.महाराव आमचे वैचारिक आघाडीवरचे अश्वासक सेनापती आहेत.लेखणीच्या लढाईचे अनेक डाव आम्ही त्यांना वाचून ऐकून समजून शिकलेलो आहोत.

महारावजी ; तुमच्या सत्याच्या मुशीत कसलेल्या धारदार लेखणीला आमचा सलाम ! तुमची निवृत्ती स्वेच्छा आहे,सक्तीची आहे,की अनिवार्य अथवा अपरिहार्य या चर्चेत आम्हाला याक्षणी तरी रस नाही.परंतु आम्ही अजून रणमैदानात उभे आहोत.लढत आहोत. लढत राहू.क्षेम कुशल असावे.काळजी नसावी.


- रवींद्र तहकिक

औरंगाबाद 

Post a Comment

0 Comments