पुणे - एबीपी माझाने पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. एका बातमीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या ऐवजी चित्रपट अभिनेता प्रसाद विलास सुर्वे यांचा फोटो झळकुन ती बातमी दिवसभर प्रसारित केली. त्यामुळे अभिनेता प्रसाद सुर्वे यांनी ABP माझा विरुध्द १० कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेला उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट पिटीशन नं. २९११/२०२२ मध्ये पुणे येथे घडलेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमात रक्कम रु.१०,७८,५९३ /- रूपयांची अफरातफर केल्याबद्दल माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे तसेच संचालक अलका कुबल, प्रिया बेर्डे यांच्यासह इतर संचालकांना दंड केला.
उच्च न्यायालयाने शिक्षा सुनाविलेले प्रसाद सुर्वे हे सन २०१० साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते. सदर शिक्षेची बातमी अनेक वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवरून प्रसारीत झालेली होती, ही बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने देखील प्रसारित केली. परंतु या बातमीमध्ये शिक्षा सुनाविलेले प्रसाद सुर्वे यांच्या ऐवर्जी चित्रपट अभिनेता प्रसाद विलास सुर्वे या फोटो झळकुन ती बातमी दिवसभर प्रसारित केली.
सदर घटना अभिनेता प्रसाद सुर्वे यांच्या लक्षात येताच त्यांनी विमानतळ पोलिस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला व ए.बी.पी माझा या वृत्तवाहिनीला आणि ए.बी.पी चे एडिटर राजीव खांडेकर यांना वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु कुठलाही कायदेशीर नोटीसीला ए.बी.पी माझा वृत्तवाहिनीकडून अभिनेता प्रसाद सुर्वे यांना प्रतिसाद मिळाला नाही व ए.बी.पी माझा ने चुकीची बातमी प्रसारित केल्याबद्दल त्यांची माफी देखील मागितली नाही. यामुळे अभिनेता प्रसाद सुर्वे यांना समाजामध्ये होणाऱ्या बदनामीस सामोरे जावे लागले.
अभिनेता प्रसाद सुर्वे हे अनेक मराठी, हिंदी व दक्षिणात्य सिनेमामधुन आपली छबी प्रेक्षकांमध्ये उमटवत आलेले आहेत त्यांनी शेर शिवराय, प्रेम तुझा रंग कसा, चौवीस तास अनिलकपुर आय लव दुबई, लग्न मुबारक, परफ्युम इत्यादी सिनेमामधुन आपला अभिनय प्रेक्षकांस दाखवून त्यांचे मनामध्ये घर केले आहे. तसेच त्यांचा बलोच हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ए.बी.पी माझाने लावलेल्या चुकीच्या बातमीमुळे अभिनेता प्रसाद सुर्वे यांना अनेक चित्रपटामधुन नकार मिळाला तसेच अनेक ठिकाणी प्रमुख पाहूणे म्हणून जेथे ते उपस्थिती लावणार होते, त्याठिकाणी देखील त्यांना नकारास सामोरे जावे लागले आहे त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक नुकसान झाले.
अभिनेता प्रसाद सुर्वे यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मार्फत अथवा आर. टी. आय मार्फत शासनाचे दरवाजे ठोठावले. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय पोलिसांकडून मिळाला नाही. त्यामुळे समाजामध्ये होत असलेल्या बदनामीमुळे अभिनेता प्रसाद सुर्वे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनी विरुध्द त्यांना न्याय मिळेल या उद्देशाने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात १० कोटी रूपयाचा मानहानीचा व नुकसान भरपाईचा दावा अॅड सत्यजीत कराळे पाटील यांचेमार्फत दाखल केला असून, लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.
0 टिप्पण्या