भले शाब्बास... एका डॅशिंग महिला जिल्हाधिकाऱ्यांचा जबरदस्त निर्णय


अधिकृत-अनधिकृत अशा सर्वच संवर्गातील स्थानिक वार्ताहर, माध्यम प्रतिनिधींचा त्रास अलीकडे सर्वत्र वाढला आहे. अतिशय सन्माननीय संयमित व मर्यादा पाळणाऱ्या वार्ताहरांचा अपवाद अर्थात आहेच. काही माध्यम प्रतिनिधींच्या याच अतिरेकाला वैतागून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दांडेकरांना फाट्यावर मारल्याचे आपल्याकडे कालच पाहण्यात आले. अनेकदा आपल्याला मीडियाच्या स्थानिक वार्ताहर, प्रतिनिधींनी ताळतंत्र सोडल्याचे पाहायला मिळते. स्वतःला "पत्रकार" हा टॅग चिकटवून घेत अनेक जण जणू आपल्याला विशेषाधिकार प्राप्त झाल्याच्या थाटात वावरताना दिसतात. अलीकडे ही विशेषाधिकाराची भावना फारच वाढीस लागलेली दिसते, विशेषत: दांडेकरात! खरेतर, इतर सर्वसामान्य पेशाप्रमाणेच सध्याच्या काळात पत्रकारिता हाही एक प्रोफेशन आहे. त्यामुळे त्यालाही सर्वसामान्य सर्व नियम, संकेत, चौकटी लागू होतात. काही सन्माननीय अपवाद असलेले पत्रकार या सामाजिक संकेत अन् नियम-अटींच्या चौकटीत राहून, मर्यादा पाळून काम करताना दिसतात. मात्र, दुर्दैवाने बहुतांश उठवळ मंडळी विशेषाधिकाराच्या झिंगेत मर्यादा आणि संकेत पायदळी तुडवताना दिसतात. अशाच मंडळींमुळे अलीकडे पत्रकारिता सध्या कलंकित होत आहे, पत्रकार समूहाची बदनामी होत आहे, त्यांची सामाजिक पत खालावत चालली आहे. 


अनेक जिल्ह्यात आता दांडेकर समूह तयार झाले आहेत. अगदी सिंडिकेट कार्टेलसारखे. बातम्या, कार्यक्रम, इव्हेंट कव्हर करण्याचे अलिखित रेटकार्ड ठरलेले आहेत. आयोजकांना अटी घातल्या जातात, येण्या-जाण्याची आरामदायी, वातानुकूलित प्रवासाची सोय करण्यास सांगितले जाते. याशिवाय, समिष खानावळी, जेवणावळी, पेयपान, ओली-सुकी अशी सर्व प्रकारची "सोय" करायला सांगितले जाते. याहीउपर कार्यक्रम, इव्हेंटची निमंत्रणे "खास वजनदार पाकिटा"तून द्यावी लागतात. या अशा सर्व व्यवहारात "इनपुट-आऊटआऊट", वर-खाली सर्वच सहभाग असतो. अनेक ठिकाणी आता तर हे हिशेबाचे "हफ्ते" किंवा मासिक कार्यक्रम निश्चित केलेले असतात. बहुतेक मीडियावाले कुठेतरी "पे-रोल"वर असतात आणि इमाने-इतबारे खाल्ल्या मिठाला जागताना दिसतात. बहुतांश जण मेन स्ट्रीम मीडिया सोडून पॉलिटिकल को-ऑर्डीनेशनच्या दलाली कारभारात फसताना दिसत आहेत. या सर्वातून मीडिया आणि जर्नालिस्ट यांची बेअब्रू होत आहे. दिलास एव्हढाच, की या सर्वात अत्यंत सन्माननीय असे पत्रकार अपवाद आहेत, प्रिंट डेस्क मीडियाची इज्जत आजही जपत आहे. बहुतांश दांडेकरांनी अन् मशरूमगत फोफावत असलेल्या विकली, युट्यूब चॅनेल्सनी तर पार कहर केला आहे. चांगले अपवाद इथेही आहेतच! 

एव्हढे विस्ताराने हे विवेचन अन् पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे बेबंद, स्वैर अन् विषेशाधिकाराच्या मस्तीतीतल मीडियाला लगाम खेचण्याची सध्याच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. अनेक भ्रष्ट सरकारी बाबू आणि गद्दार नेते ते धाडस करू शकत नाहीत. मात्र, प्रशासनातही काही निर्भय, प्रामाणिक अपवाद आहेतच. त्यातूनच एका डॅशिंग महिला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच एक जबरदस्त निर्णय घेतला आहे. मीडियाचे अवास्तव लाड अन् घुसखोरीला त्यांनी पायबंद घातला आहे. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांचा बाईट किंवा कोट उठसूठ मिळणार नाही. सरळ उठून गावच्या चावडीसारखे किंवा पारावर ये-जा करणाऱ्यांसारखे त्याबाबत आता करता येणार नाही. त्यासाठी आधी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना कळवाव्ह लागेल. ते जिल्हाधिकाऱ्यांना तशी कल्पना देतील. पुढे त्याची अर्जन्सी, जिल्हाधिकाऱ्यांवरील कामाचा ताण अन् त्यांच्या सोयीनुसार या बाईट, कोटची व्यवस्था केली जाईल.  मीडियाला ताळ्यावर आणणारा हा जबरदस्त निर्णय घेणाऱ्या अधिकारी आहेत उत्तर प्रदेशातील अयोध्या विभागातील सुलतानपूरच्या जिल्हाधिकारी कृतिका ज्योत्स्ना! उद्या कदाचित कणाहीन नेत्यांचा राजकीय दबाव तसेच संघटित झुंडशाहीच्या विरोधातून त्यांना माघार घ्यावी लागेल, निर्णय फिरवण्याची वेळ येईल. पुढे जे होईल ते होईल; पण हा अतिशय धाडशी आणि प्रशासनातील अवाजवी ढवळाढवळ रोखणारा स्तुत्य निर्णय आहे. त्याचे मनापासून कौतुक करायलाच हवे, त्याला माध्यमांनी खुल्या दिलाने स्वीकारायला हवे. काही फारच महत्त्वाचे असेल तर त्या स्थितीत तेव्हढे भान तर जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीला निश्चित आहेच. कृतिका यांच्यापूर्वीच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर याही कडक शिस्तीच्या होत्या.  नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मतदान केंद्र परिसरातील मीडियाच्या अनिर्बंध धूडगूस आणि अतिरेकाला चाप लावला होता. 


जिल्हाधिकाऱ्यांचाही दिनक्रम ठरलेला असतो, त्यांनाही जनतेच्या हिताची अधिक प्राधान्याची कामे असतात. उठसूठ फुसकाट कारणासाठी थेट कोट, बाईटसाठी सतावणाऱ्या दांडेकर, मीडियाच्या स्थानिक वार्ताहरांचा त्यांना सातत्याने त्रास होत असतो, व्यत्यय येत असतो. वर मीडियावाल्यांची हा सारा जणू विशेषाधिकार आहे, या थाटातली अरेरावी. खरेतर हा सौजन्याचा भाग असतो. काय महत्त्वाचे, काय प्राधान्याचे ही जाण तर त्या पदावरील व्यक्तिलाही असतेच. अलीकडील काळात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे तर पोलीस स्टेशन, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग इतकेच नव्हे तर महापालिका, मंत्रालय अशा सर्वच सरकारी कार्यालयात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक जण पत्रकारितेच्या नावावर दलाली करू लागले आहेत. काही एजंट, ठेकेदारच संपादक झाले आहेत. दिवसभर "गिऱ्हाईक" शोधणे आणि दलालीचे टेंडर हुंगत फिरणे एव्हढेच त्यांचे काम असते. अशी मंडळी काहीतरी बातमीचे निमित्त काढून मग फुसकाट कोटस, बाईटसाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि आपला मेन अजेंडा चाचपतात. भ्रष्ट, टक्केवारीवाला अधिकारी हाती आला तर उत्तमच नाहीतर हीच मोड्स ऑपरेंडी ठेवून इतर अधिकाऱ्यांचा माग घेत राहायचे, हेच यांचे फुल टाईम काम! 


जिल्हाधिकारी कृतिका ज्योत्स्ना यांनी या हुंग्या मोड्स ऑपरेंडीवर प्रहार करत ती ठेचून काढली. ठीक आहे, काही काळ मोजक्या चांगल्या, प्रामाणिक पत्रकारांना त्रास होईल, त्यांची गैरसोय होईल; पण हरकत नाही. पत्रकारितेत सध्या साफसफाई करण्याची गरज आहे. त्यासाठी मोजक्या चांगल्या पत्रकारांनी अशा निर्णयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बाईटस्/ कोट्स उशिरा दिल्याने, न दिल्याने तसेही काही आभाळ कोसळत नाही. पत्रकारितेची इभ्रत जपायची असेल तर कृतिका ज्योत्स्ना यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना, अशा निर्णयांना बळ देण्याची गरज आहे. तरच 52खुळे, चंबूराज वैगेरे टाईप लोकांना पत्रकारितेचा नैतिक धाक पुन्हा वाटू लागेल. समोर बहुतांश प्रामाणिक, मर्यादाशील पत्रकार असतील तरच, राज ठाकरेंसारखे नेतेही दांडे धुडकावताना विचार करतील. पत्रकारितेची इभ्रत आपणच सारे मिळून जपूया, चांगल्या निर्णयांना पाठबळ देऊया!

कोण आहेत या कृतिका ज्योत्स्ना?

कृतिका ज्योत्स्ना या मूळच्या हैदराबादच्या. त्यांचे वडील एसबीएल मिश्रा हे IFS, भारतीय वन सेवा विभागात अधिकारी राहिले आहेत. ते तेलंगणाचे मुख्य वनसंरक्षकही होते, तर कृतिका यांची आई निरुपमा या उत्तर प्रदेश सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या UPPSC मध्ये आहेत. कृतिका यांचे बहुतांश शिक्षण यूपीमधूनच झाले आहे. त्यांनी हैदराबादमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले.  प्रयागराजमध्ये माध्यमिक शिक्षण आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली. त्यानंतर डीयूमधूनच मॅथ्समध्ये पीजी केले.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या संयुक्त UPSC टॉपर

कृतिका ज्योत्स्ना यांनी 2010 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या तीन प्रयत्नांत त्यांना यश आले नाही. पण त्यानंतर 2013 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्या ऑल इंडिया 30 व्या रँकसह यूपीएससी उत्तीर्ण झाल्या. त्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या संयुक्त टॉपर होत्या. पुढे त्यांनी 2014 बॅचच्या यूपी कॅडरच्या IAS राहुल पांडे यांच्याशी लग्न केले. यानंतर त्या कॅडर बदलून यूपीला गेल्या. जम्मू-काश्मीरमधून उत्तर प्रदेशात प्रतिनियुक्तीनंतर परतलेल्या IAS कृतिका ज्योत्स्ना या यूपीच्या सचिवालयात  उत्तर प्रदेश अन्न व नागरी पुरवठा विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना सुलतानपूरचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले आहे

मोठा भाऊही आहे आयएएस

कृतिका यांचा मोठा भाऊ कार्तिकेय मिश्रा हे 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेले कार्तिकेय प्रशासनातील नवनवीन प्रयोगांसाठी ओळखले जातात.  कृतिका यांची बहीण कनिका ज्योत्स्ना या दुबईतील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत अधिकारी आहेत.

- विक्रांत पाटील 8007006862 (WA)

Vikrant@Journalist.Com

Post a Comment

0 Comments