'पद्मश्रीं'च्या सोलापूर आवृत्तीत 'फाटका'ची कीरकीर!

'मोठे साहेब' आणि 'दादां'च्या नजरेखालीच 'आंधळं दळतयं कुत्र पीठ खातयं'!


सोलापूर - 'पद्मश्रीं'च्या सोलापूर आवृत्तीत सद्या बिघडलेल्या 'फाटका'ची जोरदार कीरकीर सुरू आहे. डोक्यावर 'मांडव'चे 'कर' आणि 'पाटील'कीचा हात असल्याने जुनेजाणते रिपोर्टर घरी पाठवले गेले असून, एका प्रूफरिडर कम रिपोर्टरच्या सल्ल्याने अंध झालेला 'संजय' 'पद्मश्री'च्या दैनिकाचा कारभार हाकलत आहे. या सल्लागारासोबत 'फाटक' सद्या बरेच आवाज करत असून, 'नाजूक' प्रकरणाचा शहरभर नुसता बोभाटा सुरू असला तरी; अंध झालेला 'संजय' आणि 'मांडवा'चा 'कर' डोक्यावर असलेले मात्र या प्रकरणाकडे कानाडोळा करून एकमेकांना डोळे मारत आहेत. खप, दर्जा घसरला असला तरी, 'फाटका'ची कीरकीर का सहन केली जाते? याचे आश्चर्य वाटले जात आहे.

 

पुरोगामी विचारसरणी आणि निर्भीड मतांचे दैनिक म्हणून सोलापुरात नावारूपाला आलेल्या 'पद्मश्रीं'च्या सोलापूर आवृत्तीमध्ये आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं असला कारभार सुरू आहे. इथला संपादकीय कारभारी 'संजया'ला 'नाजूक' प्रकरणाने घेरले असून, त्याबद्दल एक 'जिंदम' बापमाणूस चांगलीच पेटवापेटवी करत असल्याने अख्खा स्टाफ या फाटकाच्या कीरकिरीविरोधात पेटलेला आहे. हे 'फाटक' मीच मालकाच्या मर्जीतला 'मांडवाखाल'चा माणूस, 'पाटीलकी'चे वतन मलाच मिळाले आहे, आशा तोर्‍यात अंधाधुद कारभार करत आहे. स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्याच्या नादात हुशार, चौकसबुद्धी, सडेतोड आणि 'पद्मश्री'ना हवी असलेली आणि संशोधनात्मक पत्रकारिता करणार्‍यांना घरचा रस्ता दाखवत आपल्या मर्जीतील माणसांची भरती सुरू केली आहे. हेच महाशय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा झाला त्यावेळी तिरुपती- बालाजीच्या दर्शनात मग्न होते. वर्धापनदिन झाला त्यावेळीसुद्धा चार दिवस रजेवर होते. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रा कालावधीतही ते कार्यालयात दिसलेच नाहीत. शतक महोत्सवी अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनही सोलापुरात झाले. जब्बार पटेल अध्यक्ष तर पालकमंत्री स्वागताध्यक्ष होते, तरीही महाशय रजेवर होते. दैनिकाच्या वर्धापन दिन पुरवणीची जबाबदारी आपलीच 'वठ्ठ' आहे रे.. असे समजत उपसंपादकांऐवजी प्रूपरिडरच्या स्वाधीन करण्यात आली. इथं बरेच पाणी जिरत असल्याचा बोभाटा शहरभर झालेला आहे, आणि 'जिंदम' बापमाणूस त्याची चोहीकडे बोंब करत सुटला आहे; तरी या संपादकीय कारभार्‍याला त्याचे सोयरसुतक नाही, असं दिसतंय. हा कारभारी सद्या त्याला वरचढ ठरत असलेल्या व चांगल्या कामाने कोल्हापूर हेडऑफिसच्या मर्जीत उतरत असलेली कार्यालयातील माणसे म्हणजे कर्मचारी उद्या आपल्याला डोईजड होतील, या उद्देशाने मालकांचा आदेश आहे असे सांगत, काम थांबवण्याचा आदेश तो देत आहेत. दबलेले, खंगलेले, घाबरलेले आणि कशाला वाद, नको ते उठाठेव, संघर्ष असा मनात विचार करून बिचारे पत्रकार कशाचाही विचार न करता निर्भीड मताचं दैनिक सोडून दुसर्‍या ठिकाणी नोकरीचा शोध घेत आहेत. 


जाहिरात विभाग, प्रशासन विभागाच्या प्रमुखांना सन्मानाची वागणूक तरी सोडा अर्वाच्च भाषेचा वापर केला जात आहे. तेही बिचारे नाईलाज म्हणून नव्हे तर नोकरी जाईल, या भीतीने निमूटपणे सहन करत आहेत. खाजगीत ते सोबतीला 'शिर'साट आहेत तर येणारे पचास अशी भाषा करत स्वतःच 'संतोष' मानून घेत आहेत. मालकांचा मी मर्जीतला आहे आणि माझाच 'वठ्ठ' 'आहे' रे अशा पद्धतीने त्यांची वागणूक सुरू आहे. कॉम्प्युटर बंद असल्याची तक्रार डीटीपी विभागातील कर्मचारी थेट कोल्हापूरच्या दरबारी केल्यास मी प्रमुख आहे मला न सांगता कशाला तुम्ही कळवताय... तुम्हीच साहेब आहात येऊन माझ्या खुर्चीवर बसा, अशी तंबी ते देत आहेत. घाबरलेले ते डीटीपी ऑपरेटर मूग गिळून शांत आहेत. तरीही कॉम्प्युटर ना दुरुस्त झाले, ना माऊस बदलून मिळाले. कीबोर्डचा पत्ताही नाही. माझे कोणी बिघडवणार नाहीत. मीच सोलापूर आवृत्तीला घडविणार अशा तोर्‍यात कामकाज सुरू आहे. अशा या कारभाराला वैतागून कर्मचार्‍यांची गळतीवर गळती सुरू असताना नव्यांच्या शोध घेत भलतेच लोकांना इंट्री देण्याच्या मानसिकतेत ते आहेत. अनेक वर्षापासून ग्रामीण पाहणार्‍या 'विठ्ठला'ला ठरवून 'आहेर'वडी देण्यासाठी आता नियोजन सुरू केले जात आहे. घाबरतील ते कसले वाडी त्यांनी तर मी कामाशी प्रामाणिक आणि माझ्यासारखे इतरांना पण हुकूम सोडा असा प्रतिसवाल उपस्थित केला. तेव्हा घाम टिपत साक्षात संजयने मोर्चा दुसरीकडे वळवला. 


टीव्ही चॅनलच्या टीआरपीसाठी धडपडणार्‍या 'पद्मश्रीं'च्या सोलापूर आवृत्तीत भरदुपारी चंद्र-चांदण्यांचे दर्शन घडत आहे. अधूनमधून प्रूफरिडरला आपला 'वठ्ठ' दाखवण्यासाठी बळ देले जात आहे. त्यांच्या बातम्या बायलाईन झळकवल्या जात आहेत. स्वतः निवासी संपादक ऑपरेटरच्या शेजारी बसून तासन् तास या बातम्या लेआउट करून घेतात. इतर वार्ताहर, बातमीदारांच्या संशोधनात्मक बातम्यांचे नाव गायब केले जात आहेत. हा सगळा रंगलेला खेळ पाहून उपसंपादकांसह वार्तारांचे डोळे 'पांढरे' होत आहेत. यामुळे हतबल झालेले सगळेच गप्पगुमान शांत आहेत. या सोलापूर आवृत्तीला पूर्वी नगरचा एक खमक्या संपादक आला होता, त्याने आवृत्ती सुतासारखी सरळ करून दर्जा व लोकप्रियताही वाढवली होती. त्या दर्जाचा आता पार बोजवरा उडा असल्याने सोलापूरकर कपाळाव्ार हात मारून घेत आहेत. 

---

जाहिरात विभागातील अवास्तव अतिरेकामुळे कोल्हापूरचे सर्जेराव चक्क हतबल झाले तर सोलापूरच्या देशमुखांनाही मनस्ताप सोसावा लागत आहे. जाहिरात एकाची, आरओ दुसर्‍याचा, बातमी करणारा तिसराच, कमिशनचा हिशोब मात्र चालतो कॅन्टीनवर... वसुलीचा पेच निर्माण झाल्यास हात वर करणार्‍या आंधळ्या 'संजया'चा 'इगो' मात्र जोरावर असतो. साहेबगिरीला मुजरा न केल्यास त्रास सुरू केला जातो. 'पद्मश्रीं'च्या सोलापूर आवृत्तीत बॉसगिरी करणार्‍या या फाटकाचे मात्र पुन्हा स्वगृही परतण्यासाठी सात अर्ज मेलवर आढळलेत आणि ते मेल थेट पुण्यावरून जुन्या   मालकांनी सोलापूरच्या दरबारी चौकशीसाठी धाडले आहेत. 'पद्मश्रीं'च्या दैनिकाचे बारा वाजवून जुनी  वाट  शोधत फिरणार्‍याचे 'पद्मश्री' स्वतः लक्ष घालून 'फाटक' बंद करणार का? अशी चर्चा सोलापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत रंगत आहे.

Post a Comment

0 Comments