बीडच्या माजी आमदारास ब्लॅकमेल करणाऱ्या नगरचा युट्युब पत्रकार भैय्या बॉक्सरसह दोन महिलांवर गुन्हा दाखल

 

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटींची मागितली खंडणी ... 


नगर - "तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल करुन तुमची बदनामी करू, तुमच्याविरुद्ध पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि तुमचं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपवून टाकू", अशी धमकी देत, आष्टी (जि.बीड)चे माजी आमदार भीमराव धोंडे यांना 'भैय्या बॉक्सर' उर्फ इस्लाईल दर्यानी  या 'टाईम्स ऑफ नगर' या स्थानिक युट्यूब चॅनलच्या पत्रकारासह दोन महिलांनी 'ब्लॅकमेल' केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली, व त्यापैकी २५ हजार रूपये उकळण्यात आल्याची गंभीर बाबदेखील उजेडात आली आहे. या प्रकरणी अहमदनगर येथील दोन महिलांसह पत्रकार भैय्या बॉक्सर याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेने बाळ बोठे प्रकरणानंतर नगरचे पत्रकारविश्व पुन्हा एकदा हादरले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. हा गुन्हा जानेवारी ते २६ जूनदरम्यान हॉटेल रॉयल येथे घडला. या प्रकरणी नगरमधील महिला कल्पना सुधीर गायकवाड व बांगर (पूर्ण नाव समजले नाही) या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी  उर्फ भैया बॉक्सर या यूट्यूब पत्रकाराविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या भैय्या बॉक्सरने २५ हजार रूपये उकळल्याचेही सांगण्यात येत आहे.


या तीनही आरोपींनी संगनमत करून आमच्याकडे फिर्यादीची अश्लील व्हिडिओ क्लिप आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमच्याविरोधात बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करून तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू, अशी धमकी देत, एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील २५ हजार रूपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर याने स्वीकारले आहेत, असे माजी आमदार धोंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी भैया बॉक्सर हा 'टाईम्स ऑफ नगर' या स्थानिक युट्यूब चॅनलचा पत्रकार आहे. त्याची कोतवाली पोलिस ठाण्यात सतत ये-जा सुरू होती. पण आता त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या