धाराशिव - काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान झालेल्या मराठा आंदोलनाने शहरात खळबळ माजवली होती. राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिलेल्या विधानानुसार, या आंदोलनामागे धाराशिवमधील काही पत्रकारांचा हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
धाराशिवमध्ये पुष्पक पार्क हॉटेलमध्ये थांबलो असता, काही मराठा आंदोलकांनी आपल्यासमोर आंदोलन केले. आंदोलकांचा मुद्दा ऐकण्यासाठी मी तयार होतो. परंतु काही पत्रकारांनी त्यांना भडकावले. "मी आंदोलकांशी संवाद साधायला तयार होतो, पण काही पत्रकारांनी परिस्थिती अधिक गंभीर बनवली." त्याचे नाव आपणास माहित आहे. तो कुणाचे काम करतो, हेही माहित आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी या पत्रकारांनी एमआयडीसीमध्ये प्लॉट, महागड्या गाड्या आणि जमिनी मिळवल्या असल्याचा तसेच रोडच्या पेव्हर ब्लॉक कामाचे कंत्राट मिळवल्याचा आरोप केला होता. त्यांनी याबाबत गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत, तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडून अहवाल मागविला होता. या अहवालानुसार, तीन पत्रकारांनी मराठा आंदोलनाला भडकावल्याचे समोर आले आहे.
चौकशीदरम्यान पुष्पक पार्क हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज आणि मराठा आंदोलकांसोबत पत्रकारांचे फोनवरील संभाषण यांचे सीडीआर तपासण्यात आले. राज ठाकरे हे सोलापूरहुन धाराशिवला निघाल्यानंतर त्यांचे लाइव्ह लोकेशन पत्रकार मराठा आंदोलकाना सांगत होते, हेही समोर आले आहे.
बातमीसाठी पैसे घेणे, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे आणि लाखो रुपये कमविण्याचा धक्कादायक प्रकार देखील उघड झाला आहे.
या प्रकरणामुळे धाराशिवमध्ये पत्रकारितेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या आरोपांमुळे शहरात चर्चा रंगली आहे.
0 टिप्पण्या