महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी काही पत्रकारांवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
राज ठाकरे यांनी सोलापुरात दिलेले "आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण" देण्याच्या वक्तव्याचे चुकीचे स्पष्टीकरण धाराशिवमध्ये केले गेले, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः, धाराशिवमधील पुष्पक पार्क हॉटेलमध्ये थांबल्याच्या वेळी मराठा आंदोलकांनी आपल्यासमोर आंदोलन केले, हे त्यांनी मान्य केले. तथापि, या आंदोलनाला काही पत्रकारांनी भडकावले, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
या आरोपांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विश्वात मोठी खळबळ माजवली आहे. पत्रकारितेची भूमिका ही सत्य आणि न्यायासाठी असावी, हे आपण सर्व मान्य करतो. पण, जर पत्रकारिता भेसळयुक्त, स्वार्थी आणि राजकीय दबावाखाली कार्यरत होत असेल, तर त्याचा परिणाम फक्त राजकारणावरच नव्हे, तर समाजावरही होतो. राज ठाकरे यांनी केलेले आरोप हे केवळ काही पत्रकारांवरच नव्हे, तर संपूर्ण पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
राज ठाकरे यांच्या मते, जरांगे पाटील यांचे आंदोलन पत्रकारांनी भडकावले , त्यासाठी त्यांनी काही राजकीय नेत्यांची सुपारी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईच्या एका न्यूज अँकरने एमआयडीसीमध्ये प्लॉट, तर अन्य काही पत्रकारांनी महागड्या गाड्या आणि जमिनी घेतल्या आहेत, तसेच काहींना रोडच्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. हे आरोप गंभीर असून, यात तथ्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आरोपांची चौकशी होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या सगळ्या प्रकरणामुळे, महाराष्ट्रातील जनतेसमोर पत्रकारितेच्या विश्वातील बदलते स्वरूप, त्याची स्वायत्तता आणि विश्वसनीयता यावर प्रश्न उपस्थित होतात. पत्रकारितेची जबाबदारी ही केवळ सत्याचा शोध घेणे आणि ते जनतेसमोर मांडणे आहे. पण, जर हे माध्यमच भ्रष्टाचार आणि राजकीय दबावाच्या अधीन झाले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा हा घटक आपली विश्वसनीयता गमावू शकतो.
या घटनेने आपण सर्वांनी एक गंभीर विचार करायला हवा की, आपल्याला कोणत्या प्रकारची पत्रकारिता हवी आहे? राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांची बाजू घेणारी की सत्याची बाजू घेणारी? याचा निर्णय हा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच करावा लागेल. राज ठाकरे यांचे आरोप जर खरे ठरले तर याचा परिणाम किती व्यापक होऊ शकतो, याचा अंदाज आपण लावू शकतो.
या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे, पण त्याचबरोबर, पत्रकारिता क्षेत्रालाही आपली भूमिका तपासावी लागेल. सत्य, नीतिमत्ता आणि लोकशाहीची रक्षक म्हणून पत्रकारिता तिचे कार्य पार पाडेल, अशीच आशा महाराष्ट्रातील जनतेला आहे.
- बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या