सोलापूर शहरातील तथाकथित पत्रकार सैपन अमिनसाब शेख (वय ५० वर्षे) यास खंडणी उकळणे आणि सरकारी नोकरांना दमदाटी करण्याच्या गंभीर आरोपांखाली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैपन अमिनसाब शेख यांच्याविरुद्ध इ.स. २०२३ आणि २०२४ या वर्षांत सदर बाजार पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे प्रामुख्याने खंडणी उकळणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी नोकरांना धमकावणे या स्वरूपाचे होते.
शेख यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर शहर, विजय कबाडे यांनी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांना क्र. २३०५/२०२३ दि. ११/०७/२०२३ अन्वये सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.
तडीपार आदेशानुसार, सैपन अमिनसाब शेख यांना सोलापूर जिल्ह्याबाहेर पुणे येथे सोडण्यात आले आहे. तडीपार कालावधीत ते सोलापूर किंवा धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाहीत. जर त्यांनी तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, जर त्यांना सैपन अमिनसाब शेख तडीपार कालावधीत सोलापूर किंवा धाराशिव जिल्ह्यात आढळून आल्यास त्यांनी ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.
0 टिप्पण्या