पत्रकारांचा आवाज की पैशाचा बाजार? – पार्ट ४

 

पत्रकारांसाठी उभ्या राहिलेल्या संघटनेचा हेतू काय असतो? सत्यासाठी लढणं, पत्रकारांचे हक्क अबाधित ठेवणं आणि पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवणं. पण ‘पत्रकारांचा आवाज’ नावाची ही संघटना पाहिली, की वाटतं—पत्रकारांची प्रतिष्ठा वाचवायची सोडा, इथे तर पत्रकारितेलाच तडाखा बसतोय!

 पत्रकार वर्ग की ‘प्रेस’ नावाचा तमाशा?

मराठवाड्यातील  जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या एका छोट्या शहरात  या तथाकथित ‘संघटनेत’ पाहायला गेलं, तर यांची अवस्था अजूनच हास्यास्पद आहे. इथे ना एकही प्रिंट मीडियातला सन्माननीय पत्रकार आहे, ना मेनस्ट्रीम मीडियातला, ना अगदी साप्ताहिक चालवणारा!

तर मग ‘पत्रकार’ म्हणून संघटनेत कोण आहेत?
चार-पाच यूट्यूबर्स – ज्यांचे चॅनेल सबस्क्रायबर २,००० च्या पुढे जात नाहीत.
गाडीवर ‘प्रेस’ लिहून मिरवणारे – कुठल्याही वृत्तपत्रात नाव नाही, पण प्रेस स्टीकर लावून मोकळे!
दोन नंबरवाल्यांचे चमचे – ज्यांना पत्रकारितेच्या नावाखाली वेगळाच धंदा करायचा आहे.

म्हणजे इथे खरे पत्रकार नाहीत, पण पत्रकारितेचा ‘बनावटी गवगवा’ आहे.

संघटना की दिखावा?

ही संघटना सध्या एका नवा ट्रेंड चालवतेय—
पत्रकारांसाठी काहीही करायचं नाही, पण स्वतःसाठी बक्कळ पैसे जमवायचे.
संघटनेच्या नावावर ‘पुरस्कार विक्री’ करायची, बार मालकांना ‘गौरव’ द्यायचा.
पत्रकारिता नसलेल्या लोकांना ‘पत्रकार संघटनेत’ भरती करून जबरदस्तीचं वर्चस्व निर्माण करायचं.

पत्रकारितेचं चारित्र्यहनन सुरू आहे!

या सगळ्या प्रकारामुळे पत्रकारितेचा निखळ उद्देश कुठेतरी गडप होतोय. खऱ्या पत्रकारांसाठी काहीही सुरक्षितता नाही, काहीही सुविधा नाहीत, पण पैसेवाल्यांसाठी नक्कीच ‘संघटना’ उपलब्ध आहे.

हेच चालू राहिलं, तर लवकरच पत्रकारिता करणाऱ्यांसाठी नाही, तर पत्रकारितेचं ‘मार्केट’ करणाऱ्यांसाठीच अशा संघटना राहतील!

बेरक्या उर्फ नारद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या