बीडमध्ये TRP च्या लाटेत तीन न्यूज चॅनल रिपोर्टरचा बळी! चौथा रडारवर ...

 



बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने जिल्ह्यात नुसता गदारोळ माजवलाय! ९ डिसेंबरला झालेल्या या हत्येनंतर मागील तीन  महिने बातम्या सुटत नाहीत. आंदोलनं, अटक, राजीनामा आणि राजकीय गदारोळ – हे प्रकरण अजूनही शांत होण्याचे नाव घेत नाही. पण यात सगळ्यात मोठी झळ कुणाला बसतेय, तर थेट न्यूज चॅनलच्या रिपोर्टरांना!

टीआरपीच्या हव्यासात मराठी न्यूज चॅनलवाले या हत्याकांडावर तिखट-मीठ लावून सतत नवी ‘ब्रेकिंग न्यूज’ द्यायला तयार! पण यात ग्राउंड रिपोर्टर मात्र जळताहेत. कारण त्यांना पाठवलेल्या बातम्या ऑन-एअर जात नाहीत, आणि टेबलवर बसून ‘मसालेदार’ बनवलेल्या बातम्या मात्र त्यांच्या नावाने खपवल्या जातात. त्यात आणखी भर म्हणजे कुणी बाईट दिली, की लगेच त्यावर प्रतिक्रिया गोळा करण्यासाठी रिपोर्टरांना धावपळ!

‘मस्साजोग’च्या प्रवासाने दमले रिपोर्टर!

बीड ते मस्साजोग हे ४५ किलोमीटरचं अंतर म्हणजे रिपोर्टरांसाठी एक ‘टूर’च बनलंय. रोजचा ९० किलोमीटरचा प्रवास, दिवसभर धावपळ, आणि वरून ‘बातमी मिळवली नाही’ म्हणून गाडीतूनच झाडलं जाणारं तंबी - या सगळ्याचा पत्रकारांना वैताग आलाय.

याचा फटका मोठ्या प्रमाणावर पडतोय आणि गेल्या काही दिवसांत तब्बल तीन रिपोर्टरचा बळी गेला आहे! एका क्षणात नोकऱ्या उडाल्या.

  • साम: जुना रिपोर्टर विनोद जिरे गेले, नवा रिपोर्टर योगेश काशीद आला
  • झी २४ तास: जुना रिपोर्टर विष्णू बुर्गे हटला, नवा रिपोर्टर विकास माने
  • जय महाराष्ट्र: जुना रिपोर्टर उद्धव मोरे गायब, त्याऐवजी अमीर हुसेन

TV9 मराठीच्या महेंद्रकुमार मुधोळकर यांच्यावरही सध्या टांगती तलवार आहे. नव्या रिपोर्टरच्या शोधात चॅनल आहे, पण ह्या ‘टेन्शन’वाल्या नोकरीसाठी कुणी तयार नाही!

जातीय वादात पत्रकारांचा बळी?

बीड जिल्ह्यात वंजारी विरुद्ध मराठा हा वाद आधीच तापलेला. त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी चिघळली. वाल्मिक कराड यांची अटक, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, आणि आता यावर बातम्या देणाऱ्या रिपोर्टरनाही टार्गेट केलं जातंय!

या वादात खरं तर राजकारण पेटलंय, पण पत्रकार मात्र धगधगताहेत. याला पत्रकारिता म्हणायचं की बळी देण्याचा खेळ?
मस्साजोग प्रकरणाचा शेवट काय होईल, हे कोणालाही ठाऊक नाही. पण टीआरपीच्या हव्यासात अजून किती रिपोर्टर बळी जातील, हा मोठा प्रश्न आहे!






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या