"नंबर वन" चा दावा, पण मीडियाची दलाली उघड!


शिक्षकांच्या मागण्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकार आणि यंत्रणांनी प्रयत्न करावेत, हे समजण्यासारखं आहे. पण मीडिया देखील पैसे घेतल्याशिवाय आंदोलनाचे अश्रू दाखवत नसेल, तर हा धंदा पत्रकारितेच्या नावावर काळी चादर टाकतोय!

"मीडियाला आमचे अश्रू दाखवण्यासाठी पैसे लागले!"

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्चला शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. महिला दिनाच्या दिवशी ‘जेलभरो’ आंदोलन झालं, पण "बातमी लावण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली!" अशी संतप्त पोस्ट सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतेय.

या पोस्टमध्ये एका शिक्षक-पत्रकारानेच माध्यमांच्या दलालीवर ताशेरे ओढलेत. त्यांनी लिहिलंय –

"मीडियाला आमचे दुःख आणि संघर्ष दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागले! महिला दिनी जेलभरो केले तरी मीडियाने मोठी रक्कम घेऊनच बातमी लावली. जणू आम्ही शिक्षक नंबर दोनचे पैसे कमावतो. इथेच समजले की मीडिया किती दलाल झाली आहे! नाव मोठे लक्षण खोटे!"

"मी पण एक पत्रकार आहे. परंतु आजची मीडिया एवढी लाचार झाली आहे की शिक्षकांचे अश्रू दाखवायलाही पैसे घेतले. धिक्कार आहे अशा मीडियाचा! ज्या दिवशी मीडिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन काम करेल, तेव्हाच ही नीच सरकारे कल्याणकारी कामे करतील. काल मला लाज वाटली शिक्षक असण्याची आणि एक पत्रकार असण्याची!"

ब्युरोच्या नावावर खंडणीखोरी?

या प्रकरणात नांदेडमधील एका मोठ्या चॅनेलच्या जुन्या प्रतिनिधीने आणि "दत्ताच्या कृपेने" चॅनेलमध्ये एंट्री मिळवलेल्या एका नवख्या स्ट्रिंगरने मिळून मोठी रक्कम वसूल केल्याचे बोलले जातेय.

यातील मोठा प्रश्न असा की, छत्रपती संभाजीनगरच्या ब्युरोला पैसे द्यावे लागतात म्हणून शिक्षकांकडून मोठी रक्कम वसूल झाली, पण हे पैसे खरोखर ब्युरोपर्यंत पोहोचले का? की कुणाच्या खिशात गेले?

पत्रकारितेच्या नावाखाली दलाली?

पत्रकारिता हा व्यवसाय नसून मिशन आहे, हे सांगणाऱ्यांनी आता आपल्याच पंक्तीतील लोकांचा धंदेवाईक चेहरा उघड केला आहे! पैसे न दिल्यास आवाज दाबला जात असेल, तर हा चौथा स्तंभ कोसळण्याच्या मार्गावर आहे.

या प्रकारानंतर आता प्रश्न एकच –
ब्युरो किंवा चॅनेलने या दलालांवर कारवाई करणार का, की पैशांनीच सर्व प्रकरण झाकलं जाणार?

(व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप पोस्टचा आणि पैसे घेऊन कव्हर केलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट संलग्न आहे.)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या