हीच का पत्रकारिता? की पॉर्न स्टारडमची स्पर्धा? भाग १

 

एकेकाळी पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ म्हटलं जायचं. समाजाचा आरसा, अन्यायावर घणाघात करणारा आवाज, आणि सत्यासाठी लढणारा योद्धा म्हणून पत्रकाराकडे बघितलं जायचं. पण आजच्या डिजिटल झुणकाभाकर मीडियाने ही प्रतिष्ठा अक्षरशः चिरडून टाकली आहे.

प्रिंट आणि टीव्ही माध्यमातून स्पर्धा सुरू झाली, ती एक वेळ ठीक होती. पण डिजिटल मीडियाच्या महासागरात, TRP आणि क्लिकबेटच्या भोवऱ्यात सगळंच बुडालंय. आज जे सुरू आहे, त्याला पत्रकारिता म्हणायचं की बाजारातली वखवखलेली मालविक्री, हेच समजेनासं झालंय.

एकीकडे ‘माझे तिच्या एवढेही मोठे नाहीयेत’ अशा नीना गुप्ताच्या कमेंटवर, कपिल शोच्या मसाल्यातून बातमी तयार होते. मोठ्या वेबसाइटवर हे पेज थांबू नये म्हणून थंबनेलमध्ये लाल रंग, मोठे फॉन्ट आणि बेशरम हेडलाईन! आणि तेच लोक जे कधी काळी 'पत्रकार म्हणजे सामाजिक जबाबदारी' म्हणायचे, आज कमेंट सेक्शनमध्ये जनता त्यांचं वस्त्रहरण करत असताना मात्र गप्प आहेत.

इतकंच नव्हे, दुसरी बातमी – “त्याने सेक्स पॉवरच्या गोळ्या घेतल्या, तीन दिवस सेक्स केला आणि शेवटी मेला” – ही बातमी नाही, ही विकृती आहे. अशा हेडलाईनसाठी जे पत्रकार स्वतःला म्हणवून घेतात, त्यांनी एकदा तरी आरशात स्वतःचा चेहरा बघावा – तिथे ना लाज दिसेल, ना जबाबदारी.

ही पत्रकारिता नाही, ही बाजारातला विकाऊ थाट आहे.

लोकांच्या भावना, समाजाचं मानसिक आरोग्य, आणि देशाच्या विचारविश्वाचा ताळतंत्र ढासळवण्याची ही प्रक्रिया आहे. एखादी घटना एंटरटेन्मेंट म्हणून सादर करायची आणि त्यातून फक्त ‘क्लिक्स’ कमवायचे – हाच नव्या पत्रकारितेचा चेहरा झाला आहे.

प्रश्न एकच – ही स्पर्धा नंबर १ होण्यासाठी आहे की समाजाला नं. १० च्या खड्ड्यात लोटण्यासाठी?

"पत्रकारिता मेली नाही... तिला रोज मारलं जातं, क्लिकबेटच्या गोळ्या घालून, TRP च्या बलात्काराने आणि बेशरम संपादकांच्या मौनाने!"


उद्या वाचा -
“हे TRP आहे की Tandoori Rating Porn?”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या