पत्रकारिता हा एक काळा-पांढरा खेळ राहिला नाही आता. इथे सगळ्या छटा आढळतात – काही शुभ्र, काही धूसर आणि काही तर डबक्यातून सरळ रंगवलेली! बेरक्या गेल्या तीन दशकांपासून हे सगळं बघतोय... आणि आज थेट बोट ठेऊन सांगतोय – पत्रकारितेचे आजकाल तीन प्रकार झालेत. चला, उघडं करू या या तिन्ही वर्गांचं पान...
१. जबाबदार पत्रकारिता – ‘खमकी’, पण शहाणी!
हे लोक खरी पत्रकारिता करतात, कारण त्यांना समाजाचं भान आहे. यांच्यासाठी ‘ब्रेकिंग’पेक्षा ‘वेरिफायिंग’ महत्त्वाचं. कुणावरही आरोप करताना ते समोरचं मत घेतात. बातमी ही ‘फॅक्ट’च्या बोर्नव्हिटाने ताकदलेली असते. अशी मंडळी खरंतर समाजासाठी ऑक्सिजनसारखी आहेत, पण त्यांना व्हायरल होण्यासाठी टीआरपीचं ऑक्सिजन सिलिंडर लागंत नाही.
हे पत्रकार म्हणजे बेरक्याचा आदरयुक्त सलाम घेणारे लोक. बातमी देण्याआधी सातदा तपासतात, समोरचं मत घेतात, अन् वाटेल ती थिअरी मांडत नाहीत. हे लोक टीआरपीच्या मागे लागत नाहीत, पण बातमी इतकी प्रामाणिक असते की लोक आपसूक त्यांच्या मागे लागतात.
बेरक्या म्हणतो – "भाऊ, तू पत्रकार नाहीस, तू लोकशाहीचा खरा सिपाही आहेस!"
२. बेजबाबदार पत्रकारिता – ‘दिसलं की फेकलं!’
हे लोक टीआरपीच्या धुंदीत ‘तफावत’ आणि ‘खोटं’ यातला फरक विसरतात. खात्री न करता बातम्या देणं म्हणजे त्यांचा प्राणायाम. "कसली काय माहिती, फॉरवर्ड आली ना, बातमी झाली!" असा त्यांचा फंडा. ‘पाणीपुरीच्या पाण्यात कोरोना’सारख्या बातम्या टाकून हे मंडळी समाजात भीतीचं खैरात वाटतात. ना शोधनिबंध, ना फॅक्टचेक – फक्त ‘शॉक’ इज द की!
हे पत्रकार नाहीत, हे ‘हॅशटॅग वाले हल्लेगार’ आहेत! कुणीतरी म्हणालं की ‘पेट्रोलमधून बकरी जन्मली’ – तर ही मंडळी त्या बकरीचा फोटो एडिट करून पहिल्या पानावर छापतात.
त्यांच्या डेस्कवर तथ्य नाहीत, फक्त फॉरवर्ड्स आहेत.
बेरक्याने यांना एकदा विचारलं – "अरे, बातमी खरी आहे ना?" तर म्हणतात, "साहेब, भाव आला होता, आम्ही विकली!"
हे लोक म्हणजे टीआरपीच्या खुर्चीवर बसून पत्रकारितेचा तमाशा बघणारे कलाकर. आणि त्यांना वाटतं – प्रेक्षक मूर्ख आहेत.
बेरक्या सांगतो – "बाबांनो, लोक मूर्ख नाहीत, ते निवांत आहेत… पण उठले की तुमचं दुकान उघडं टाकून जातील!"
३.थर्ड क्लास पत्रकारिता – ‘बातमीसाठी बाप पण विकतील!’
इथे पत्रकारिता म्हणजे व्यवसाय नव्हे, व्यवहार आहे. ५०० दिलं तर कव्हरेज, १००० दिलं तर हेडलाईन! चाटूगिरी ही इथली आर्टफॉर्म आहे. चांगल्या पत्रकारांचं बदनाम करणं, रात्रीच्या पार्टीत जाऊन ‘संधी’ मिळवणं आणि दिवसा सोशल मीडियावर मीच किती शहाणा हे दाखवणं – ही थर्ड क्लास मंडळींची ठरलेली रुटीन. येलो जर्नालिझमची कमाल म्हणजे पत्रकारिता ‘विक्रारिता’ बनते.
‘पार्ट्या, पेज थ्री, पिठासाखर आणि पोटभरून कव्हरेज’ – हेच यांचं चक्र.
ज्यांनी खरं मोकळं लिहिलं, त्यांच्यावर पेड पोस्ट्स टाकणं, तक्रारी करणं, आणि सगळी पत्रकारिता ‘मी किती शहाणा’ यात अडकवणं – हे त्यांचं प्रोफेशनल हत्यार.
बेरक्याच्या नजरेत अशांना एकच विशेषण आहे –
"हे पत्रकार नाहीत, हे जाहिरातीतून आलेले जोकर आहेत!"
शेवटची बोच...
हे तिन्ही प्रकार बघताना बेरक्या विचारतो –
"पत्रकारिता करताय की ‘पत्र-कारित’ करताय?"
तुमच्या खिशात प्रेस कार्ड आहे की रेट कार्ड?
बातमी विकता की जनतेचं भान जपताय?
ज्यांना वाटतं बेरक्या फारच तिखट बोलतोय – त्यांना सांगतो,
"बातमी खोटी असेल, तर बोचट बोलणं खरं वाटायला हवं!"
बाकी, खरी पत्रकारिता करणाऱ्यांना बेरक्याचा सलाम कायम आहे. आणि थर्ड क्लास मंडळींवर बेरक्याची नजर कायम दुर्बीण लावून आहे!
बाकी पत्रकारिता करताय की ‘डील’ करताय, हे ज्याचं त्यानं ठरवायचं!
– बेरक्या उर्फ नारद
(चांगल्या पत्रकारांचा साथीदार, बदमाश पत्रकारांचा कर्दनकाळ )
0 टिप्पण्या