नवी दिल्ली : भारत सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या कामकाजावर कडक पाऊल उचलत त्यांच्या TRP (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) रेटिंग्स पुढील चार आठवड्यांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने (MIB) दिलेल्या आदेशानुसार आता BARC कडून वृत्तवाहिन्यांचे प्रेक्षकसंख्या (व्यूअरशिप) आकडे जाहीर केले जाणार नाहीत.
इस्रायल–इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्यांकडून करण्यात येत असलेल्या सनसनाटी आणि नाट्यमय वार्तांकनामुळे सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार काही न्यूज चॅनेल युद्धासंदर्भात असत्यापित, भीती निर्माण करणाऱ्या आणि अतिरंजित बातम्या दाखवत होते. यामुळे देशात सार्वजनिक शांतता भंग होण्याची आणि जनतेमध्ये घबराट पसरू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारचे म्हणणे आहे की TRP रेटिंगवर तात्पुरती बंदी घातल्याने चॅनेल्समधील जास्तीत जास्त TRP मिळवण्याची अंधाधुंद स्पर्धा कमी होईल. परिणामी पत्रकारितेत अधिक जबाबदारी आणि गांभीर्य येईल, तसेच आंतरराष्ट्रीय संकटाच्या संवेदनशील काळात भ्रामक आणि सनसनाटी बातम्यांवर लगाम बसेल.
दरम्यान, या निर्णयामुळे टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या स्पर्धात्मक धोरणांवर पुढील काही आठवड्यांत मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या