TV9 च्या लाईव्हवर BBC मराठीचा कब्जा; २५ मिनिटे डिजिटल डेस्कला खबरच नाही!



मुंबई -  मोठ्या न्यूज चॅनल्सच्या २४x७ धावपळीत कधी कधी अशी चूक घडते की तीच पुढच्या काही वेळात चर्चेचा विषय बनते. 16 एप्रिलच्या सायंकाळी TV9 मराठीच्या अधिकृत युट्यूब लाईव्हवर असाच एक भन्नाट डिजिटल घोळ पाहायला मिळाला. कार्यक्रम संपल्यानंतर लाईव्ह बंद करायचे राहून गेल्याने चक्क BBC मराठीचा लाईव्ह फीड TV9 च्या स्क्रीनवर झळकू लागला.

सामान्यतः युट्यूब लाईव्ह संपल्यानंतर फीड तातडीने कट करणे गरजेचे असते. अन्यथा सिस्टीमला जोडलेला पुढील व्हिडीओ किंवा इतर अकाउंटचा फीड आपोआप सुरू होण्याची शक्यता असते. मात्र यावेळी TV9 सारख्या मोठ्या चॅनलच्या डिजिटल मॉनिटरिंगमध्ये मोठी चूक झाल्याचे दिसून आले.

धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार केवळ काही सेकंदांचा नव्हे, तर तब्बल 20 ते 25 मिनिटे सुरू राहिला. इतका वेळ TV9 च्या अधिकृत लाईव्हवर BBC मराठीचा फीड चालू असतानाही कंट्रोल रूम, डिजिटल डेस्क किंवा सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमच्या लक्षात ही बाब आली नाही, अशी चर्चा माध्यम वर्तुळात रंगली आहे.



बेरक्याच्या भाषेत सांगायचं तर,
“ब्रेकिंगच्या स्पर्धेत इतके गुंतले, की स्वतःच्या स्क्रीनवर BBC ने ‘कब्जा’ केल्याचंही लक्षात आलं नाही!”

या प्रकारामुळे डिजिटल न्यूज रूममधील लाईव्ह मॉनिटरिंग, जबाबदारी आणि तांत्रिक दक्षता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठ्या ब्रँडच्या चॅनलमध्ये अशा प्रकारचा घोळ होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून डिजिटल शिस्तीतील ढिलाईचे उदाहरण मानले जात आहे.



सध्या या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून,
“TV9 च्या लाईव्हवर BBC मराठीचा कब्जा” हा विषय अनेकांच्या चर्चेचा आणि मिश्कील प्रतिक्रियांचा केंद्रबिंदू ठरला आहे.

बेरक्याचा शेवटचा टोला असा —
“दुसऱ्यांच्या बातम्यांवर पहारा देणाऱ्यांच्या स्वतःच्या दारात BBC येऊन बसलं, आणि घरच्यांना पत्ताच नाही!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या