बेरक्या विशेष: अरेच्याss... पत्रकाराच्या पायात 'नानां'च्या साकोलीत दुसऱ्या पत्रकाराचाच बूट! सीसीटीव्हीने काढली इज्जत!!


भंडारा जिल्हा तसा शांत, पण इथल्या साकोलीत दोन दिवसांपूर्वी असा काही ‘भूकंप’ झालाय की ज्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारितेची अब्रू पार वेशीवर टांगली गेलीय. राजकारणी लोकांचे पाय ओढणारे पत्रकार आपण रोज पाहतो, पण एका पत्रकाराने थेट दुसऱ्याच पत्रकाराचा 'बूट' (शूज) ओढल्याचा (वाचा: चोरल्याचा) अजब आणि लाजीरवाणा प्रकार समोर आलाय.

नेमकं काय घडलं भाऊ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस होता. साकोलीतील नानांच्या कार्यालयात शुभेच्छा देणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. मीडियाचे कॅमेरे, बूम आणि रिपोर्टर्सची फौजही तिथे तैनात होती. याच गर्दीचा आणि गडबडीचा फायदा उचलत एका 'प्रतिष्ठित' आणि 'प्रसिद्ध' मराठी टीव्ही चॅनलच्या बहाद्दर रिपोर्टरने तिथे एक भन्नाट 'स्टोरी' कव्हर करायचा प्लॅन केला. पण ती स्टोरी बातमीची नव्हती, तर दुसऱ्या एका टीव्ही पत्रकाराच्या महागड्या ब्रँडेड शूजची होती!

गर्दीचा फायदा घेत या महाशयांनी दुसऱ्या पत्रकाराचे शूज लंपास केले. आपल्याला कोण बघतंय? या थाटात भाऊंनी बूट तर मारले, पण ते विसरले की वर 'तो' (म्हणजे नानांच्या कार्यालयाचा सीसीटीव्ही कॅमेरा) सगळं बघत असतो!

सीसीटीव्हीने केला गेम, कॅमेऱ्यासमोर 'नंगा नाच'!

माझा बूट चोरीला गेलाय हे समजताच पीडित पत्रकाराने थेट साकोली कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आणि काय आश्चर्य! जो पत्रकार रोज चॅनलवर 'ब्रेकिंग न्यूज' देतो, तोच चॅनलचा रिपोर्टर सीसीटीव्हीमध्ये दुसऱ्याचा बूट चोरताना अगदी क्लिअर फ्रेममध्ये कैद झाला होता!

झाली गम्मत... बूट चोरीची ही बातमी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील पत्रकार जगतात वाऱ्यासारखी पसरली. तो 'बूट चोर' पत्रकार नेमका कोण, याचा चेहरा उघडा पडताच जिल्ह्यात एकच हशा आणि संताप उसळला.

"माझ्या हातून चुकी झाली हो..."

चोरी उघडकीस आल्यावर आणि अब्रूचे धिंडवडे निघू लागल्यावर, या 'बूट बहाद्दर' टीव्ही पत्रकाराने आता स्वतःच डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील इतर पत्रकारांना स्वतःहून फोन करून तो आता गयावया करतोय – "भाऊ, माझ्या हातून अनावधानाने चुकी झाली हो, राग मानू नका..."

पण बेरक्याचा सवाल असा आहे:

  • चोरी ती चोरीच असते, त्याला 'चुकी' कसं म्हणता येईल?

  • सीसीटीव्ही कॅमेरा होता म्हणून ही एक चोरी समोर आली; पण यापूर्वी या महाशयांनी गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे खिसे, मोबाईल किंवा आणखी काय काय मारलं असेल? याची कल्पनाच न केलेली बरी!

बेरक्याचा डोस:

माईक हातात धरून जगाला शहाणपण शिकवणाऱ्या आणि नीतिमत्तेचे डोस पाजणाऱ्या अशा 'विकृत' प्रवृत्तीमुळे संपूर्ण पत्रकारितेला कलंक लागतो. टीव्ही स्क्रीनवर टीआरपी वाढवणारे हे महाशय स्वतःच्या पायात घालायला दुसऱ्याचा बूट चोरतात, यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय?

चला, आता चॅनलवाल्यांनी या आपल्या 'स्पेशल रिपोर्टर'साठी एक नवीन शो सुरू करावा- "क्राइम पेट्रोल: बूट चोर की दास्तान!"

जाता - जाता 

आता तुम्ही आम्हाला विचाराल की , तो बूट  चोरणारा पत्रकार  कोणत्या चॅनलचा आहे ?  आम्ही नंबर १ आहोत असे सांगणारा तो  चोर पत्रकार होता एव्हडे मात्र नक्की.  ( कारण सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती आहे) तर पत्रकार मित्रानो, उघडा डोळे बघा नीट"... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या