चिवेलीत 'पाणी' मुरलं, अन् ३ पत्रकारांनी 'गुगल पे'वर हात धुतले! ९ हजारांची सुपारी, पण बातमीच गायब

 



चिपळूण:कोकणातील चिपळूणमध्ये भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणाने आता भलतेच वळण घेतले आहे. 'पाणी योजनेत' झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी बोलावलेल्या सॅटेलाइट चॅनलच्या तीन रिपोर्टर्सनी स्वतःचीच तहान 'गुगल पे'वर भागवून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

 चिपळूण तालुक्यातील चिवेली ग्रामपंचायतीमधील 'राष्ट्रीय पेयजल योजनेत' लाखोंचा अपहार झाला आहे. ग्रामस्थ विद्याधर साळुंखे यांनी माहिती अधिकारातून (RTI) कागदपत्रे काढून या आर्थिक अनियमिततेचे वाभाडे काढले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

पत्रकारांची 'निन्जा टेक्निक' आणि 'गुगल पे'चा व्यवहार

हाच भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी या गावकऱ्यांनी चिपळूणमधील ३ सॅटेलाइट चॅनलच्या रिपोर्टर्सना पाचारण केले. "तुमची बातमी अशी लावतो की प्रशासन हादरून जाईल" अशा वल्गना करत या महाभागांनी प्रत्येकी ३ हजार याप्रमाणे ९ हजार रुपये उकळले. डिजिटल इंडियाचा पुरेपूर वापर करत हे पैसे एकाच रिपोर्टरच्या 'गुगल पे'वर जमा झाले. पैसे तर गेले, पण टीव्हीवर बातमी काही झळकलीच नाही!

आतली खबर अशी आहे की, या 'गुगल पे' बहाद्दरांनी बातमी न लावण्यासाठी संबंधित भ्रष्ट कंत्राटदाराकडूनही मोठी 'मलई' खाल्ली आहे. म्हणजेच इकडूनही खायचं आणि तिकडूनही खायचं, अशी ही दुहेरी खेळी होती.

कार्यकर्त्याचा संताप आणि भंडाफोड

बातमी न आल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भ्रष्टाचार उघड करणाऱ्या गावकऱ्याने थेट पत्रकार परिषदच लावली. या पत्रकार परिषदेत त्या ३ रिपोर्टर्सचा भर चौकात भंडाफोड करण्यात आला. गुगल पे चे स्क्रीनशॉट आणि पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत असून या पत्रकारांची चांगलीच नाचक्की होत आहे.

१६ जुलैच्या सुनावणीकडे आणि संपादकांकडे लक्ष

एकिकडे या लाचखोर पत्रकारांची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे चिवेलीच्या गावकऱ्यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याची दखल घेत कोकण विभागीय आयुक्तांनी १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (V.C.) सुनावणी ठेवली आहे.

आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दोन गोष्टींकडे आहे:

१. १६ तारखेच्या V.C. सुनावणीत चिवेलीतील पाणी योजनेच्या भ्रष्टाचाऱ्यांवर काय कारवाई होते?

२. "आमचं चॅनल म्हणजे सत्य" अशा डरकाळ्या फोडणारे चॅनलचे संपादक या 'गुगल पे' रिपोर्टर्सवर कारवाईचा बडगा उगारणार की त्यांना पाठीशी घालणार?

- आपला बेरक्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या