'सकाळ'चा अजब कारभार!

शेगाव संस्थानच्या बातमीला भलत्यांचाच फोटो लावला अन् शेवटी जाहीर दिलगिरीची नामुष्की ओढवली!



नागपूर (बेरक्या वृत्तसेवा ) - महाराष्ट्रभरात शिस्त, अचूकता आणि तत्त्वांच्या गप्पा मारणाऱ्या दैनिक ‘सकाळ’वर स्वतःच्याच गंभीर चुकीमुळे जाहीर 'खुलासा' आणि माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे. निमित्त ठरलंय—श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावच्या दातृत्वाची बातमी आणि त्याखाली छापलेला भलताच फोटो!

झाले असे की, सोमवार दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दैनिक 'सकाळ'च्या मुख्य अंकाच्या दुसऱ्या पानावर 'शेगाव संस्थानचे दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख' अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण बातमी छापताना 'सकाळ'च्या अतिउत्साही डेस्कने असा काही घोळ घातला की, शेगाव संस्थानच्या बातमीखाली भलत्याच मंडळींचा धनादेश देतानाचा फोटो झळकवून दिला.

आता गंमत म्हणजे, त्या फोटोत दिसणारे महाभाग हे ना शेगाव संस्थानचे पदाधिकारी आहेत, ना विश्वस्त, ना साधे सेवेकरी! श्री गजानन महाराज संस्थान हे अत्यंत कठोर आचारसंहिता, निःस्वार्थ सेवा आणि पारदर्शकतेसाठी ओळखले जाते. तिथे स्वतःचा चेहरा चमकावण्याची कुठलीही प्रथा नाही. मात्र 'सकाळ'च्या या कर्तृत्वामुळे संस्थानच्या आचारसंहितेला आणि प्रतिष्ठेला चांगलाच सुरुंग लागला.

बातमी प्रसिद्ध होताच राज्यभरातील लाखो भाविकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. "शेगाव संस्थानच्या नावावर हे कोण वेगळेच लोक मिरवत आहेत?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत भाविकांनी संस्थानकडे फोनचा अक्षरशः भडिमार केला. प्रकरण इतके तापले की, कोणी भामटे या चुकीचा गैरफायदा घेऊन भाविकांची फसवणूक करतील की काय, अशी गंभीर भीती निर्माण झाली. संस्थानचे सेवेकरी आणि विश्वस्त मंडळाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

शेवटी संस्थानच्या रोषापुढे आणि भाविकांच्या दबावापुढे झुकत दैनिक 'सकाळ'च्या नागपूर आवृत्तीला पहिल्याच पानावर ठसठशीत 'खुलासा' छापत जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. नेहमीप्रमाणे या सगळ्या भोंगळ कारभाराचे खापर "नागपूर कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याची चूक" असे म्हणत कर्मचाऱ्यावर फोडून व्यवस्थापनाने आपले हात वर केले आहेत!

बेरक्याचा सवाल :

संपादकीय संस्कार आणि प्रूफ रिडिंगचा दर्जा इतका रसातळाला गेलाय का, की लाखो रुपयांचे चेक वाटताना कोण उभे आहे हेही तपासण्याची तसदी डेस्कवर कोणी घेत नाही? शेवटी काय, घोडचूक करायची आणि नंतर 'कर्मचाऱ्याची चूक' म्हणून माफीनामा छापून मोकळे व्हायचे, ही नवीच पत्रकारिता सध्या सुरू आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या