पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी): आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि वातानुकूलित केबिनमध्ये बसून चालवले जाणारे पत्रकारितेचे प्रयोग कधी अंगाशी येतील, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड 'सकाळ'च्या कार्यालयाला आला आहे. नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत स्थानिक रास-गरब्याच्या वृत्तासाठी चक्क 'एआय' (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) निर्मित काल्पनिक आणि आक्षेपार्ह धाटणीचा फोटो प्रसिद्ध केल्यामुळे शहरात संतापाचा मोठा भडका उडाला आहे . या प्रकारामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी 'सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाला थेट घेराव घातला, तर दुसरीकडे अंतर्गत राजकारणातून दोन कनिष्ठ सहकाऱ्यांचा बळी देऊन मूळ जबाबदार असणारे 'मॅडम' मात्र नामानिराळे राहिल्याची जोरदार चर्चा आता मीडिया जगतात रंगली आहे.
नेमके काय घडले?
'सकाळ टुडे'च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीत नवरात्रोत्सवात तरुणाईच्या गरब्याबाबत "नवरात्रोत्सवात रास-गरब्याद्वारे तरुणाईची 'धूम'" या मथळ्याखाली मुख्य बातमी प्रसिद्ध करण्यात आली . या बातमीसोबत स्थानिक मैदानांवरील उत्साह दाखवण्याऐवजी चक्क 'छायाचित्र : एआय निर्मित' असा क्रेडिट देऊन एक बनावट फोटो छापण्यात आला .
संस्कृती आणि परंपरेचा जागर सुरू असताना अशा प्रकारे संगणकीय, कृत्रिम आणि विसंगत फोटो छापल्याने वाचक आणि विविध सामाजिक संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्या.
सोशल मीडियावर तीव्र संताप; कार्यालयात फोनचा खणखणाट
हा अंक बाजारात येताच सोशल मीडियावर सकाळविरोधात जोरदार मोहीम सुरू झाली. नेटिझन्स आणि वाचकांनी संतप्त पोस्ट लिहीत सकाळवर जोरदार प्रहार केला.
"सकाळ पेपरकडे जोरदार आक्षेप नोंदवणे गरजेचे आहे. असा AI generated फोटो टाकून आमच्या भावना दुखावण्याचा अधिकार यांना कुणी दिला? आज शहरातील प्रत्येक भागातून सकाळच्या कार्यालयात दर मिनिटाला १ ते ३ फोन जात आहेत. उद्यापासून सकाळ घेणे बंद करू!" अशा संतप्त पोस्ट व्हायरल झाल्या.
वाचकांच्या रोषाचा पारा इतका वाढला की, अखेर वैतागून 'सकाळ'च्या कस्टमर केअर आणि स्थानिक कार्यालयाने आपले अधिकृत फोन बंद करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यालयाला घेराव आणि कनिष्ठांचा बळी!
प्रकरणाचे गांभीर्य वाढताच विविध संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील 'सकाळ' कार्यालयावर मोर्चा वळवत कार्यालयाला घेराव घातला आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, प्रकरण अंगलट आल्याचे पाहून 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी व्यवस्थापनाने तातडीने दोन कनिष्ठ उपसंपादक/कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवत त्यांचा बळी दिला. मात्र, यावरून पत्रकार वर्तुळात प्रचंड चीड व्यक्त होत आहे.
बेरक्याचा सवाल: कार्यकारी संपादक शितल पवार यांच्यावर कारवाई कधी?
आवृत्तीत काय प्रसिद्ध होते, पानांची मांडणी कशी होते आणि अंतिम मंजुरी कोणाची असते, याचे सर्व अधिकार ज्यांच्याकडे आहेत, त्या कार्यकारी संपादक शितल पवार मात्र या संपूर्ण प्रकरणात स्वतःला नामानिराळे ठेवून नामानिराळे झाले आहेत.
- वृत्तपत्राचे पान अंतिम तपासणी (Page Passing) करून सोडण्याचे अधिकार कोणाकडे असतात?
- वरिष्ठ पदावर बसून क्रेडिट घेणारे अधिकारी अशा चुका घडतात तेव्हा जबाबदारी कनिष्ठांच्या माथी का मारतात?
- दोन सामान्य कर्मचाऱ्यांचा बळी देऊन स्वतःची खुर्ची वाचवणाऱ्या कार्यकारी संपादकांवर 'सकाळ'चे मुख्य प्रशासन कोणती कारवाई करणार?
असा परखड सवाल आता माध्यम विश्वातून विचारला जात आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेताना संवेदनशीलतेचा विसर पडलेल्या 'सकाळ'च्या या कारभाराची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चवीने चघळली जात आहे
तळटीप : पूर्वी पिंपरी चिंचवड आवृत्तीची मुख्य जबाबदारी संभाजी पाटील यांच्याकडे होती, काही दिवसापूर्वी त्याची जबाबदारी कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड अंकात दररोज चुका आढळून येत आहेत.

0 टिप्पण्या