समाजातील नैराश्‍य पत्रकारांनी दूर करावे - भय्यूजी

एस. एम. जोशी सभागृह - "सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना भय्यूजी महाराजांच्या हस्ते शुक्रवारी "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.
पुणे - 'जातीयवाद, हिंसाचार, बेरोजगारी यामुळे आपल्या समाजामध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होत आहे. माणसांच्या मनामधील ही नकारात्मक भावना दूर करण्यासाठी पत्रकारांनी चातुर्य आणि विनम्रतेने आपल्या लेखणीच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी समाजासमोर आणणे गरजेचे आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केले.

राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा पहिला "राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' भय्यूजी महाराज यांच्या हस्ते "सकाळ माध्यम समूहा'चे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, निर्माते मेघराजराजे भोसले, इम्पाचे संचालक विकास पाटील, संघाचे राज्याचे अध्यक्ष गणेश जोशी, संघटक संजय भोकरे, उपाध्यक्ष अरुण लोणकर व शहराध्यक्ष संजय दिनकर या वेळी उपस्थित होते.

भय्यूजी महाराज म्हणाले, 'माणुसकीची वेगवेगळी रूपे दाखविण्याचे काम पूर्वी ग्रंथांद्वारे होत असे. बदलत्या काळानुसार आता हेच कार्य वृत्तपत्रसृष्टी करत आहे. पत्रकार म्हणजे संवेदना असून तिची अभिव्यक्ती म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. बाजारवादाच्या प्रभावाखाली आल्याने आता तिचे सकारात्मक व नकारात्मक असे विभाग निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आत्म्याचे बळ लाभलेल्या पत्रकारितेकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.''

घोळवे म्हणाले, 'पत्रकारांनी स्वतःमधील नकारात्मक दृष्टिकोन दूर ठेवावा. एकत्रित आल्याशिवाय त्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळणार नाही. नकारात्मक गोष्टींनाच प्राधान्य मिळत असल्याने पत्रकारितेची विश्‍वासार्हता कमी होत आहे. हा प्रश्‍न गंभीर असून सर्वांनी आत्मचिंतन करणे आवश्‍यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची मनोवृत्ती बाजूला ठेवून आता जांभेकर, टिळक, अत्रे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा दिलेला वसा पुढे चालविण्याची वेळ आली आहे. माणूस मोठा झाल्यावर निंदा होते; मात्र "निंदकाचे घर असावे शेजारी' हे संतवचन लक्षात घेऊन कार्य करत राहावे.''

पत्रकारितेसाठी सतीश डोंगरे, सूर्यकांत भिसे, नितीन शहा, धारणा राठी व सुदेश गिरमे यांना; तर प्रशासकीय सेवेसाठी भूमी अभिलेखचे संचालक चंद्रकांत दळवी, बारामतीचे कार्यकारी अभियंता उद्धव मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, मनोज जोशी, विद्याधर जोशी, अतुल कांबळे, संतोष जुवेकर व संजय ठुबे यांना; तर उल्लेखनीय जाहिरात सेवेसाठी दिनकर शिलेदार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मकरंद अनासपुरे, मनोज जोशी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भोकरे यांनी प्रास्ताविक केले. संगीतकार हर्षित अभिराज व निखिल महामुनी यांनी विविध गीते सादर केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद लोणकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments