मुंबई : 'एबीपी माझा'च्या बातम्यांच्या धबधब्यात सध्या एका नव्या 'चिल' शोची जोरदार चर्चा आहे. रात्री आठच्या ठोक्याला बातम्यांचं विश्लेषण करणाऱ्या आणि आपल्या धारदार प्रश्नांनी समोरच्याला घाम फोडणाऱ्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
विषय असा की, सरिता मॅडमचा 'झिरो अवर' हा शो चांगलाच गाजला होता. पण, म्हणतात ना, 'एक रांजण भरला की दुसरं रिकामं राहतं'. या शोच्या प्रचंड व्यापात आणि मेहनतीत टीमवरील प्रशासकीय कामांकडे दुर्लक्ष होत होतं. अखेर, तो 'डेली सोप' सारखा रोजचा व्याप बाजूला सारून मॅडमनी आता थोडा 'निवांत'पणा शोधलाय.
त्यांनी आता 'कॉफी विथ कौशिक' (Coffee With Kaushik) हा नवा कोरा 'माझा पॉडकास्ट' सुरू केला आहे. आणि विशेष म्हणजे, याच्या पहिल्याच एपिसोडची ओपनिंग एकदम ग्रँड झालीये. पहिली 'कॉफी डेट' झाली आहे खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अर्धांगिनी अमृता फडणवीस यांच्यासोबत!
या पॉडकास्टमध्ये बातम्यांची दगदग नाही, तर हलक्या-फुलक्या गप्पा आहेत. पण सरिता कौशिक त्या, साध्या गप्पातूनही बातमी काढायची त्यांची जुनी खोड! त्यांनी अमृता वहिनींना असं काही बोलतं केलंय की, देवेंद्रजींच्या घरातल्या अनेक 'सिक्रेट' गोष्टी आणि पडद्यामागचे किस्से बाहेर आले आहेत.
मुळात सरिता कौशिक यांचा प्रवास तसा नागपूर ब्युरो ते विदर्भ संपादक आणि तिथून थेट मुंबईत कार्यकारी संपादक असा राहिलाय. नागपूरकरांचा बेधडकपणा त्यांच्यात आहेच. त्यामुळे आता या 'कॉफी'च्या पेल्यातून त्या भविष्यात अजून कोणा-कोणाची गुपितं बाहेर काढतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
थोडक्यात काय, तर 'झिरो अवर'चा सीरियसनेस गेला आणि आता कॉफीचा सुगंध दरवळू लागलाय!

0 टिप्पण्या