मुंबई: जगाला शहाणपण शिकवायचे, राजकारण्यांच्या गुंडागर्दीवर अग्रलेख खरडायचे आणि टीव्हीवर नैतिकता ओकायची... पण जेव्हा स्वतःच्या घरात (प्रेस क्लबमध्ये) विषय येतो, तेव्हा हेच ‘फोर्थ इस्टेट’चे शिलेदार गल्लीतल्या टपोरी गुंडांनाही लाजवतील असा तमाशा करतात. याचाच प्रत्यय काल (बुधवारी) मुंबई प्रेस क्लबच्या विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) आला. विषय होता शिस्तीचा, पण दर्शन घडले ते नंग्या ‘झुंडशाही’चे!
झालं असं की, ऑक्टोबरमध्ये क्लबमध्ये एक ‘राडा’ झाला होता. त्यानंतर क्लबची नक्षलवादी अड्डा म्हणून बदनामी करणे, सदस्यांना ट्रोल करणे, आणि कुटुंबावर घाणेरड्या टीका करणे याविरोधात कारवाई करण्यासाठी ही सभा बोलावली होती. पण कारवाई तर दूरच, जमलेल्या ‘टाळक्यांनी’ असा काही धुमाकूळ घातला की, अखेर सभा गुंडाळण्याची वेळ आली.
अध्यक्षांनी काढला पळ, मस्कारन्हास बळीचा बकरा?
सभेच्या सुरुवातीलाच क्लबचे अध्यक्ष समर खडस यांनी स्मार्ट गेम खेळला. घटनेनुसार त्यांनी अध्यक्षपद भूषवायला हवे होते, पण त्यांनी नैतिकतेचे कारण देत काढता पाय घेतला. प्रवीण काजरोळकर यांनी आक्षेप घेतला, पण शेवटी ज्येष्ठ सदस्य राजेश मस्कारन्हास यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. बिचाऱ्या मस्कारन्हास यांना काय माहित की, पुढे काय वाढून ठेवलंय!
गांधीवादाचा बुरखा आणि उजव्यांची मांडी
नचिकेत कुळकर्णी जेव्हा प्रस्तावाच्या बाजूने बोलायला उभे राहिले आणि “गांधीवादाचे सोंग घेणारे उजव्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत,” असे म्हणताच उपस्थितांचा ईगो दुखावला. मग काय, झुंडीतले काही ‘शूरवीर’ अंगावर धावून गेले. यात गुरुबीर सिंग आणि जतीन देसाई हे सुद्धा होते. ज्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारायच्या, त्यांनीच नचिकेतचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
‘संत’ गुरुबीर आणि खुर्चीवरचा जोष
सभेत खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा प्रवीण काजरोळकर यांनी गुरुबीर सिंग यांचा उल्लेख उपरोधाने ‘संत-महात्मा’ असा केला. हा टोमणा जिव्हारी लागताच झुंडीने काजरोळकरांना घेरले. एका बाजूला श्रुती गणपत्ये आणि रोहन टिल्लू क्लबची बदनामी आणि नक्षली लेबलवर पोटतिडकीने बोलत होते, पण ऐकतोय कोण? एका महापालिका कव्हर करणाऱ्या पत्रकाराने तर सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या.
शेवटी तमाशाचा ‘द एंड’
राजू कोरडे आणि सौरभ शर्मा यांनी मध्यस्थी करत काहींना रोखले, पण गोंधळ काही थांबेना. अखेर सभा अनिश्चित काळासाठी तहकूब झाली. विशेष म्हणजे, सभा गुंडाळल्यावर गुरुबीर सिंग यांनी चक्क खुर्चीवर उभे राहून विजय मिळाल्यासारखे भाषण ठोकले.
थोडक्यात काय, तर ‘आम्ही सुजाण, आम्ही उच्चविद्याभूषित’ असा आव आणणाऱ्या पत्रकारांनी काल राजकारण्यांनाही मागे टाकले. गावाकडचा अशिक्षित माणूसही चारचौघात नीट वागतो, पण मुंबईच्या एसी रूममध्ये बसणाऱ्या या पत्रकारांनी मात्र काल स्वतःचेच वस्त्रहरण करून घेतले.
प्रेस क्लबच्या या ‘दंगल’ चित्रपदानंतर आता सामान्य माणसाने पत्रकारांकडे कोणत्या नजरेने बघायचे, हाच खरा प्रश्न आहे!



0 टिप्पण्या