मराठी न्यूज चॅनल्सच्या यादीत आता आणखी एक मोठं नाव लवकरच जोडलं जाणार आहे. पुण्यातील उद्योजिका स्नेहल चौधरी आणि त्यांच्या टीमकडून ‘LS मराठी’ (लोकशिवाय मराठी) हे 24X7 नवं मराठी सॅटेलाईट न्यूज चॅनल सुरू होत आहे. यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून गेल्या 10 महिन्यांपासून हे चॅनल बातम्या दाखवत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी केल्यानंतर, ‘LS मराठी’ आता 24X7 न्यूज चॅनलच्या माध्यमातून भेटीला येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे LS मराठीचं हेड ऑफिस हे पुण्यात असणार आहे. मुंबई खेरीज पुण्यातूनही यशस्वीरित्या चॅनल चालवता येऊ शकतं, असा चॅनल मालकांचा दावा आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेला ‘LS मराठी’ चा न्यूजरूम सेटअप, पुण्याच्या बालेवाडी परिसरात उभा राहतोय. खरंतर महाराष्ट्राच्या इतर शहरी-ग्रामीण भागातून येणाऱ्या पत्रकारांना पुणे शहर नेहमीच सोयीचं राहिलेलं आहे. मात्र, टीव्ही चॅनल्सची सर्वच मुख्यालयं मुंबईत असल्यानं अनेकांचा नाइलाज झाला होता. LS मराठीच्या निमित्तानं आता हे शक्य होणार आहे.
कॅलिडस मीडिया अकॅडमीचे संचालक पंकज इंगोले यांनी कन्सल्टिंग एडिटर म्हणून धुरा सांभाळली आहे. पंकज इंगोले यांना प्रिंट आणि टीव्ही माध्यमांचा अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी ई टीव्ही, झी 24 तास, मी मराठी, महाराष्ट्र १ वाहिन्यांमध्ये अँकर म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय सल्लागार म्हणून पियुष शर्मा आणि कमलकिशोर सिंह यांचं सहकार्य लाभलंय. पियुष शर्मा यांनी इंडिया टुडे ग्रुप, टीव्ही ९, अमर उजाला, दैनिक भास्कर समुहाबरोबर काम केलेलं आहे. तर कमलकिशोर सिंह यांना ब्रॉडकास्ट आणि डिजिटल मीडियाचा मोठा अनुभव आहे. इंडिया टुडे ग्रुपबरोबर १४ वर्षे काम केल्यानंतर अनेक सॅटेलाईट चॅनलच्या तांत्रिक उभारणीत त्यांचं योगदान राहिलंय. इनपुट हेड म्हणून नयन कारेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अनेक मोठी नावं लवकरच LS मराठीमध्ये रुजू होणार आहेत.
सध्या अँकर्ससह इनपूट, आऊटपूट, प्रॉडक्शन डेस्कसाठी नेमणूक सुरू आहे. आतापर्यंत 25 जिल्ह्यात स्ट्रिंजर्सची नेमणूक झाली असून, ब्युरोसाठी मुलाखती सुरु आहेत. इतर सर्व विभागात देखील भरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. इच्छुकांनी contact@lokshevay.com या ई-मेलवर अर्ज पाठवण्याचं आवाहन करण्यात आलंय.
 

 
 
 
0 टिप्पण्या