नगर सकाळचा विक्रमी वर्धापनदिन, डीएम लोकमतला चिंता

वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या नगर पंचवीस वर्षांनंतर या विशेषांकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन करताना उपस्थित मान्यवर.
अहमदनगर - सकाळच्या नगर आवृत्तीचा वर्धापनदिन नुकताच धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळने 200 पानी विशेषांक प्रकाशित करून जाहिरातीच्या रुपाने 1 कोटी 11 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविल्याचे सांगण्यात येते. याशिवाय वर्धापनदिनाचा शानदार सोहळा आयोजित करून नगर जिल्ह्यात एक नवा विक्रम केला आहे. आता लवकरच लोकमत आणि दिव्य मराठीचा वर्धापनदिन येत आहे. त्यामुळे सकाळच्या तुलनेत तो कसा साजरा करायचा याची चिंता त्यांना लागली आहे.

सकाळ, पुढारी, दिव्यमराठीमार्गे पुन्हा सकाळमध्ये निवासी संपादक म्हणून दाखल झालेले बाळ ज. बोठेपाटील यांच्यासमोर वर्धापनदिनाचे आव्हान होते. ते सकाळमध्ये परत आल्यावर पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करू शकतील का, याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळेच त्यांनी आपली सगळी शक्ती आणि संपर्क पणाला लावून विशेषांकासाठी जाहिराती संकलित करण्याचे नियोजन केले. 25 वर्षांनंतरचे नगर असा विषय घेऊन 200 पानांचा विषेशांक काढला. तो सगल चार दिवस टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आला. आपल्या वीस वर्षातील संपर्काचा कस लावून बोठेपाटील यांनी या विशेषांकाचे काम केले. त्यासाठी त्यांना कार्यालयातील आणि जिल्ह्यातील सहकाऱयांची चांगली साथ मिळाल्याचे दिसून आले.
वर्धापनदिनाचा कार्यकम म्हणजे एखाद्या मंगल कार्यालयात हजार-पाचशे लोकांच्या उपस्थितीत होणारा पनसुपारीचा कार्यक्रम आणि तेथे दिली जाणारी आइस्कीम, काॅफी फार तर वडापाव अशीच अातापर्यंतची नगरमधील सकाळसह सर्वच वृत्तपत्रांची पद्धत होती. यावर्षी सकाळने मात्र हा कार्यक्रमही शानदार केला. एखाद्या स्वागत समारंभासारखा त्याचा थाट होता. सुमारे पाच हजार लोकांनी त्याला उपस्थितीती लावली. भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. हजारो खुच्यार् टाकण्यात आल्या होत्या. सलाम तरुणाईचा ही गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली होती. याशिवाय जिल्ह्यात विविध क्षेत्रात नावलैकिक मिळविलेल्या पाच जणांचा यामध्ये सत्कार करण्यात आला. पालकमंत्री बबनराव पाचपुते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महापाैर शीला शिंदे, शहर व जिल्ह्यातील आमदार यावेळी उपस्थित होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळ माध्यमसमूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. नगरच्या कार्यक्रमास ते प्रथमच उपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासमवेत पुण्यातून सर्व विभांगाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. खाण्याचा मेनूनही वेगळा होता. दहा प्रकारचे दिल्ली चाट अ‍ॅटम ठेवण्यात आले होते. त्यामुळे नगरकरांनी त्यावर मनसोक्त ताव मारला. पूर्वी सफारीत आणि आता साध्या पँटशर्टमध्ये दिसणारे बोठेपाटील या कार्यक्रमात मात्र सुटाबुटात वावरत होते.
नगरकरांचे डोळे िदपविणारा हा कार्य्रकम इतर पेपरवाल्यांसाठी मात्र अवघड बनला आहे. कारण आता इतरांनाही असाच मोठा कार्यक्रम आणि मोठी पुरवणी काढण्याचे उद्दिष्ठ स्वीकारावे लागणार आहे. त्याची चर्चा याच कार्यक्रमात करण्यात येत होती. एकूणच सकाळने नगरमध्ये आता एक नवा विक्रम केला असून वेगळा पायंडाही पाडला आहे. लोकमतचा वर्धापन दिन 15 ऑगस्टला तर दिव्य मराठीचा 16  ऑक्टोबरला आहे. त्यामुळे सकाळचे हे प्रमुख दोन स्पर्धक तो कसा साजरा करतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
वर्धापनदिन म्हटले की, विशेषांक काढून जाहिरातीचे उत्पन्न स्वतःच्या पदारात पाडून घेणे, अशीच आतापर्यंतची पद्धत आहे. यावेळी मात्र सकाळने मिळालेल्या उत्पन्नातील मोठा वाचकांसाठी खर्च केला. त्यामुळे आता इतरही वृत्तपत्रांकडून वाचकांची अशीच अपेक्षा असेल.