चंद्रकांत वानखडे, विश्‍वास पाटील यांना पुरस्कार

बाळासाहेब ऊर्फ बाळाजी तोंडे
नागपूर - लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ स्मृती सामाजिक-आर्थिक, विकासपर लेखन स्पर्धेचा २0११ सालचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांना त्यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचा चष्मा’ या ‘इत्यादी मनोविकास दिवाळी अंक २0११’मधील लेखासाठी देण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचा प्रथम पुरस्कार लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे वरिष्ठ पत्रकार विश्‍वास पाटील यांना त्यांच्या ‘कोल्हापूरच्या पोलीस दलातील लैंगिक शोषणाचा पर्दाफाश’ या वृत्तमालिकेसाठी देण्यात येत आहे. रुपये २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.
पां.वा. गाडगीळ स्मृती द्वितीय पुरस्काराचे मानकरी पुण्याचे डॉ. दीपक शिकारपूर हे आहेत. त्यांच्या ‘संगणक आणि मोबाइल यांचे दूरगामी परिणाम’ या ‘संस्कृती विशेषांक-२0११’मधील लेखासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. बाबा दळवी स्मृती द्वितीय पुरस्काराचे मानकरी दै. पुण्यनगरीचे बीडचे पत्रकार बाळासाहेब ऊर्फ बाळाजी तात्याभाऊ तोंडे हे आहेत. त्यांच्या दै. पुण्यनगरीमधील ‘धरण नव्हे शेतकर्‍यांचे मरण’ या वृत्तमालिकेसाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. रोख रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.
पां.वा. गाडगीळ स्मृती तृतीय पुरस्काराचे मानकरी नाशिकच्या मेघना ढोके या आहेत. यांना त्यांच्या ‘लोकमत दीपोत्सव २0११’मधील ‘लडते नही तो क्या करते’ या लेखासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. बाबा दळवी स्मृती तृतीय पुरस्काराचे मानकरी दै. उद्याचा मराठवाडाचे नांदेडचे पत्रकार संदीप काळे हे आहेत. त्यांना ‘जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वाळवी प्रकरण’ या वृत्तमालिकेसाठी पुरस्कार दिला जात आहे. रोख ५ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या दोन्ही स्पर्धांसाठी पुण्याचे विजय कुवळेकर, मनोहर कुळकर्णी व विजय लेले, नागपूरचे दि.मा. ऊर्फ मामासाहेब घुमरे, सुधीर पाठक व चिपळूणचे निशिकांत जोशी हे परीक्षक होते.


जाता - जाता : पुरस्कार पत्रकार बाळासाहेब तोंडे हे सध्या पुण्यनगरीमध्ये नाहीत.त्यांनी स्वत:चा समर्थ लोकनेता नावाचे वृत्तपत्र सुरू केले असून, त्याचे प्रकाशन दि.4 नोव्हेबर रोजी आहे.