कर्मचारी कपातीच्या टांगत्या तलवारीने पत्रकार अस्वस्थ !

एका बाजुला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियात झपाट्याने वाढ होत असली तरी दुसऱ्या बाजुला मात्र बहुतेक वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे मार्च अखेर वर्तमानपत्रात काम करणाऱ्या अनेकांना बळजबरीने नारळ स्वीकारावा लागणार असल्याची विश्वसनीय माहिती बेरक्याकडे आली आहे. 
वाढती महागाई, वाढता निर्मिती खर्च आणि या तु‌लनेत दिवसेंदिवस घसरत जात असलेले उत्पन्न व्यवस्थापनाला गंभीर विचार करायला भाग पाडू लागले आहे.
गेल्या पाच सहा वर्षात नव्याने सुरू झालेली दैनिके आणि साप्ताहिके पाहिली तर ही वाढ लक्षणीय आहे. नवीन वर्तमान पत्र एखाद्या शहरात सुरू झाले तर लगेचच काही नवीन जाहिरातदार आणि नवीन वाचक तयार होतात असे नाही. जुन्या वर्तमानपत्राचे वाचक आणि जाहिरातदारच विभागले जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये विभागणी सहाजिकच आहे. आता कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम हा फंडा वापण्याशिवाय व्यवस्थापनाला पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांवर गडांतर येण्याची दाट शक्यता आहे. एका वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीस ते तीस टक्के कर्मचारी कपातीचे धोरण काही वर्तमानपत्राचे व्यवस्थापन अवलंबणार असून इतर वर्तमानपत्रातूनही कर्मचारी कपातीचे धोरण राबविण्यात येण्याची शक्यता आहे.