‘आज तक’ने एका फटक्यात 150 जणांना काढले!


टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील बड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या टीव्ही टुडे समूहातून किमान 150 जणांची सुट्टी होत आहे. या समूहाचे मुख्य माध्यम असलेले ‘आजतक’ निरंतर तोट्यात चाललेय; त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने या 150 जणांना घरी बसविण्यात येणार आहे. टीव्ही टुडे समूहाच्या ‘एचआर’ने या सर्वांना ‘आस्क्ड टू गो’ श्रेणीत ठेवले आहे. ही अत्यंत गोपनीय लिस्ट ‘बेरक्या’च्या हाती आली आहे. आतापर्यंत 66 जणांची सुट्टी करण्यात आलेल्यांची ही यादी आहे. लवकरच सर्वच्या सर्व 150 जणांच्या ‘मुक्ती’ची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यापुढे अनेक बड्या माध्यमसमूहात अशी वेळ येण्याची शक्यता आहे. भरमसाठ वेतनाची खैरात, वाढता खर्च, उधळपट्टी यामुळे अनेक माध्यमसमूह तोट्याच्या गर्तेत चालले आहेत. 
 
टीव्ही टुडे समूहाने आतापर्यंत 66 जणांना एकगठ्ठा बाहेरचा रस्ता दाखविण्याऐवजी एकेकाला, वेगवेगळे कारण सांगून कपात चालविली आहे. आश्चर्य म्हणजे, देश-परदेशातील अन्यायाला वाचा फोडणारे, अनेकांना न्याय मिळवून देणारे हे सारे बुद्धधीजीवी पत्रकार स्वता:ची लढाई लढण्याऐवजी गुपचूप ‘मुक्ती’पत्र स्वीकारून इतरत्र सोय पाहत आहेत. 150 जणांची कपात होवूनही मीडियात संघर्षाचा ब्र शब्दही उमटू नये, हे मालकशाही मुजोर झाल्याचे नव्हे तर; पत्रकार संघटना अत्यंत कमजोर व बटिक झाल्याचे लक्षण मानले जात आहे. अलीकडेच ‘फोबर््स इंडिया’ने एका झटक्यात संपादक इंद्रजित गुप्ता यांच्यासह चौघा वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखविला. या अपमानास्पद प्रकाराबाबत मुंबईतील प्रेस क्लबच्या पत्रकबाजीऐवजी इतरत्र कुठे काही बोंबही झाली नाही. 

टीव्ही टुडे समूहाने आपला तोटा कमी करण्यासाठी अलीकडेच 26 टक्के भागभांडवल आदित्य बिर्ला समूहाला विकले. 2009 मध्ये 32 कोटींच्या नफ्यात असलेला टीव्ही टुडे समूह वाढत्या स्पर्धेत अवघ्या तीन वर्षांत तोट्याच्या दलदलीत फसला आहे.

 कंपनीच्या द्ृष्टीने नॉन प्रॉफिटेबल अ‍ॅसेटस ठरवून 150 जणांच्या बरखास्तीचा डाव तडीस नेला जात आहे. त्यातील 50 टक्के काम तसे पूर्णही झाले आहे. यात सीनियर आणि ज्युनियर सर्व कर्मचारी;  एडिटोरियल, पीसीआर, एमसीआर, मार्केटिंग, एडिटिंग, आयटी, कॅमेरामन सहीत अनेक विभागातील मंडळी  समाविष्ट आहेत.