मालकांनो, 'बेरक्या'ची भूमिका तुमच्याविरोधात मुळीच नाही!

गेल्या काही दिवसातील 'बेरक्या'त अपडेट होणाऱ्या बातम्यांवरून मीडियातील काही मंडळी जाणूनबुजून मालक-व्यवस्थापनाचा असा गैरसमज करून देत आहेत, की 'बेरक्या' त्यांच्याविरोधात आहे. मात्र, आम्ही तमाम मालकमंडळीस खुल्या दिलाने, जाहीरपणे सांगतो की 'बेरक्या' ही काही मालकांविरोधातील चळवळ नाही. 

एखादी संस्था, ब्रांड उभी करतांना मालकास किती कष्ट उपसावे लागतात, किती तडजोडी कराव्या लागतात, किती त्याग करावे लागतात त्याची कल्पना पगारदार नोकरास कधीही येणार नाही. त्यासाठी पिढ्या खपतात, हयात घालवावी लागते, कुटुंबापेक्षा संस्था मोठी मानून झोकून देवून घड्याळ्याच्या तासांपलीकडे काम करावे लागते. 'लोकमत'साठी राजेंद्र दर्डा यांनी सुरुवातीच्या संपाच्या काळात तब्बल २० दिवस प्लेटा ते गठ्ठे उचलणे सर्व काही केले. अगदी काल-परवा छिंदवाडा आवृत्ती प्रकाशनालाच कामगारांनी असहकार पुकारला. तेव्हा पगारी नोकर कामास आले नाहीत. स्वत: विजय दर्डा यांना सारे काही सांभाळावे लागले. रमेशचंद्र अग्रवाल यांनी 'भास्कर' कसा वाढविला, किती यातना भोगल्या ते सारेच जाणून आहेत. 'देशोन्नती'चे प्रकाश पोहरे, 'पुढारी'चे प्रतापराव जाधव, 'गांवकरी'चा पोतनीस परिवार, 'प्रहार'चे नारायणराव राणे, 'वास्ट मीडिया'चे! अभिजित राणे, 'तरुण भारत'वाला परिवार, तिकडे 'बेळगाव तभा'चे किरण ठाकूर, गोव्यातील 'सत्यप्रभा'चे नाईक, 'कृषीवल'चे जयंतराव पाटील अशी एक ना अनेक किती नावे घ्यावीत. या मालकांच्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे. पत्रकारितेतील पगारदार नोकर जेव्हा मालकाच्या भूमिकेत शिरून निर्णय घ्यायला लागतील तेव्हा कुठेही कोणतीही कटुता, खुन्नस, काटा-काटी असे प्रकार होणार नाहीत. 'ब्रांड'चाच विचार, 'ब्रांड'चेच हित जपले जाईल.

मराठी पत्रकारितेत आज जे काही सर्वत्र चाललेय त्यात मालकांचा थेट सहभाग आहे तरी किती? फारतर ५-१० टक्के! पगारदारांवर विश्वासाने सारे काही सोपविल्यावर दैनंदिन निर्णयप्रक्रियेत मालक कुठे नसतोच. मात्र ज्या विश्वासाने हे अधिकार बहाल केले जातात त्याच निरपेक्ष, तटस्थ भावनेने ते राबविले जात नाहीत. अनेकदा त्याचा गैरवापर होतो. कधीकधी तर यातून माणसे कोलमडून पडतात, उद्ध्वस्त होतात. 'बेरक्या' कुणाला उद्ध्वस्त होउ देणार नाही आणि कुणाला उद्ध्वस्त करण्यासाठी 'बाहुले' म्हणूनही वापरला जाणार नाही.

सातत्याने पत्रकारांचा पाठीराखा बनून राहणे, त्यांच्या हितांची जपणूक करणे हेच 'बेरक्या'चे धोरण आहे, तीच त्याची भूमिका आहे. पत्रकारांवर थेट मालकांकडून अन्याय होण्याचे प्रमाण हे अगोदरच सांगितल्यानुसार, अवघे ५ ते १० टक्के आहे. अनेकदा तर त्यांना काही चुकीचे घडतेय याची कल्पनाही नसते व ते पूर्णत: अंधारात असतात. त्यामुळे मालकांनी  'बेरक्या' त्यांच्याविरोधात आहे, असा चुकूनही ग्रह करून घेवू नये, अशी आमची नम्र विनंती आहे. 

जो कुणी चुकीचे करतोय त्याला आवरणे, त्याच्या चुका लक्षात आणून देणे व न्यायाच्या भूमिकेचा पुरस्कार करणे यासाठी ही 'बेरक्या'ची धडपड आहे. त्यात आमच्या हाती काहीच लागत नाही. उलट अनेकांचे हित साधले जाते, जपले जाते. 

'बेरक्या'ची चळवळ ही व्यक्तींविरुद्ध मुळीच नाही. आम्ही व्यक्तींच्या नव्हे तर प्रवृत्तींच्या विरोधात आहोत. कारण प्रवृत्ती कुठल्याही कारणाने का असेना वाईट वळणावर गेली की, सारासार विवेक गमावला जातो आणि विवेकहीन माणूस प्रत्यक्षात कितीही चांगला असला तरी तो इतरांना उद्ध्वस्त करू पाहतो. म्हणूनच आम्ही पुनश्च एकदा सांगतो, 'बेरक्या' कुणाला उद्ध्वस्त होउ देणार नाही. पत्रकारांच्या हितांची जपणूक, सत्याचा शोध आणि नाठाळांच्या माथी काठी हाणणे नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, याची मात्र आम्ही १०० टक्के खात्री देतो.