टीव्हीच्या पडद्यावर 'महामुकाबला'! ज्ञानदा परतली, आता विलास बडेंसोबत होणार 'काँटे की टक्कर'!

 


मुंबई: अखेर त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय! ज्या क्षणाची माध्यम वर्तुळात आणि प्रेक्षकांमध्ये आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण आला आहे. 'ती पुन्हा परत येतेय...' या प्रोमोने धुमाकूळ घातल्यानंतर, ज्ञानदा कदम यांची 'एबीपी माझा'वर अधिकृत 'घरवापसी' झाली आहे. पण ही फक्त घरवापसी नाही, तर एका मोठ्या संघर्षाची नांदी आहे!

'एबीपी माझा'ने "महाराष्ट्र देशा, पाहा ज्ञानदा कदम सोबत सायंकाळी ७:०० वाजता" असा प्रोमो सुरू करून आपली भावी रणनीती स्पष्ट केली आहे. पण थांबा, खरी लढत तर आता सुरू होणार आहे. ज्या सायंकाळच्या ७ च्या स्लॉटवर ज्ञानदा आपला हक्क सांगणार आहेत, त्याच स्लॉटवर 'न्यूज १८ लोकमत'ने आपला हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे.

ज्ञानदा विरुद्ध विलास: सायंकाळच्या ७ ची 'TRP' लढाई!

एकीकडे ज्ञानदा कदम यांचा लोकप्रिय चेहरा आणि अनुभव, तर दुसरीकडे 'न्यूज १८ लोकमत'वर "आपला महाराष्ट्र, विलास बडे सोबत सायंकाळी ७:०० वाजता" अशी घोषणा झाली आहे. विलास बडे हे नाव सध्या महाराष्ट्राला नवीन नाही. त्यांच्या रात्री ८ वाजताच्या 'बडे मुद्दे' या डेबिट शोने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपल्या आक्रमक आणि रोखठोक शैलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विलास बडे आता थेट ज्ञानदा कदम यांना टक्कर देणार आहेत.

ही स्पर्धा फक्त दोन चॅनलमधली नाही, तर दोन मोठ्या अँकरच्या प्रतिष्ठेची बनली आहे. ज्ञानदा कदम यांचा शांत, संयमी पण अभ्यासपूर्ण आवाज महाराष्ट्राने वर्षानुवर्षे ऐकला आहे. तर विलास बडेंचा 'बडे मुद्दे' मांडणारा दमदार आवाज लोकांना भावला आहे.

आता खरा प्रश्न हा आहे की, सायंकाळच्या ७ वाजता महाराष्ट्रातील जनता कुणाला पसंती देणार? ज्ञानदा यांच्या अनुभवाला की विलास बडेंच्या आक्रमकतेला? लोकांना मेल आवाज पसंत पडणार की फिमेल? या 'हाय व्होल्टेज' ड्राम्याचा निकाल तर आता प्रेक्षकच लावतील, पण एक गोष्ट नक्की... रिमोटवरच्या बटणाची लढाई आता अधिकच  रंजक होणार आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या