‘दिव्य मराठी’च्या अकोला आवृत्तीचे थाटात लोकार्पण


अकोला - विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. दैनिक दिव्य मराठीच्या राज्यातील सहाव्या आणि विदर्भातील पहिल्या अकोला आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.  प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अकोलेकरांनी ‘दिव्य मराठी‘वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दैनिक भास्कर देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह आहे. हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये वृत्तपत्र प्रकाशित करीत ‘दिव्य मराठी’ने वृत्तपत्र क्षेत्रातील आपले स्थान बळकट केल्याचे देशमुख म्हणाले. विदर्भाच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच विकासात वृत्तपत्रांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, संचालक सुमीत अग्रवाल, बिझनेस स्टेट हेड निशित जैन, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार वसंतराव खोटरे उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’तर्फे प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी केले, तर निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी आभार मानले. या प्रसंगी मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागपूर ते अकोल्याचे अंतर कमी व्हावे- रमेशचंद्र अग्रवाल
अकोल्याचा विकास करायचा असेल, तर अकोल्याहून नागपूर तीन तासांत गाठता यायला हवे. सध्याच्या काळात जग किलोमीटरवर नव्हे, तर घड्याळाच्या काट्यावर चालते. त्यामुळे नागपूरहून येण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. येथील विमानतळाचा विकास करण्याची गरज आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील उज्जैन, सागरप्रमाणे येथे हवाई प्रशिक्षण अकादमी सुरू करावी.  जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी ते स्वत: पायलट असल्याचे सांगितले, तसेच खासदार आनंदराव अडसूळ हे पायलटचे वडील आहेत. त्यांनीही या कामासाठी पुढाकार घ्यावा.  1999 पासून दैनिक भास्कर नंबर वनवर आहे. भास्कर समूहाने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली आहेत. त्यामुळे हे वृत्तपत्र नंबर वनवर आहे. सूर्य जसा प्रकाश देण्यासाठी कोणताही भेदभाव करीत नाही, तसे दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीदेखील वाचकांशी भेदभाव करणार नाही. केवळ वर्तमानपत्र काढणे हा आमचा उद्देश नसून, अकोल्याचा विकास व्हावा, नागरिकांचा आवाज बुलंद व्हावा, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

वृत्तपत्रांचे स्थान अजूनही अबाधित - कुमार केतकर
भारतात सर्वाधिक वृत्तवाहिन्या आहेत. त्यावर बातम्यांचा अखंड प्रवाह सुरू असतो. मात्र, तिथे आवडीची बातमी पाहण्यासाठी वाट बघावी लागते. आयपॅड, फोनवर बातम्यांचे विश्लेषण येत नाही,  त्यासाठी वर्तमानपत्र महत्त्वाचे माध्यम आहे, तसेच त्याचे स्थान अबाधित आहे.  बातमीमागची बातमी, घटनेचे निरूपण, भविष्याचा वेध वृत्तपत्रात घेता येतो. यामुळे अद्यापही वाचकांच्या मनात वृत्तपत्रांविषयी अनन्यसाधारण महत्त्व आहे. खासगी वाहिन्यांच्या आगमनाच्या काळात म्हणजेच  1992 मध्ये दैनिक भास्करची भरभराट झाली. वाहिन्यांवरील बातम्यांमुळे समाधान होत नाही, कारण वाहिन्यांवर चॉइस नाही. गाव, शहर आणि जिल्ह्यातील बित्तंबातमी दूरचित्रवाणीवर आली तरी तो बातमीचा छोटा ट्रेलर असतो, त्यामुळे नागरिक बातम्यांसाठी वृत्तपत्राची प्रतीक्षा करतात. दैनिक दिव्य मराठीमध्ये वाचकांच्या तक्रारी, हरकती, सूचना आणि अपेक्षांची दखल घेतली जाईल, असे केतकर म्हणाले.