लेखण्या बोथट झाल्यामुळे पत्रकार संघाचे पीक

बीड - वृत्तपत्रांच्या वाढत्या संख्येबरोबरच पत्रकारांचीही संख्या वाढली असतांना लेखण्या बोथट झाल्या की काय? असे होऊन पत्रकार संघांना शहरात उदंड पीक आल्याचे दिसत असुन त्या माध्यमातून नेतागिरी करण्याचा प्रकार वाढला आहे. पत्रकारांचे कोणतेही प्रश्न न सोडवता केवळ नेतागिरी करण्यासाठीच पत्रकार संघ स्थापन केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले असून एकट्या बीड शहरात सहाव्या जिल्हा पत्रकार संघाची स्थापना होऊ घातली जात असल्याचे वृत्त आहे. वृत्तपत्रेच आपली नेतागिरी टिकवण्यासाठी पत्रकार संघ स्थापन करू लागल्याने हे स्पष्ट झाले आहे.
या बाबत वृत्त असे की, सध्या बीड जिल्ह्यात वृत्तपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली त्याबरोबरच पत्रकारांची संख्या चांगलीच वाढली आहे. अनेक ठिकाणी तर या पत्रकारांनाच अनेकजण घाबरून असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात पत्रकारांच्या संघटनाही वाढत आहे. यापुर्वीच बीड शहरात सध्या जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणुन चार संघटना अस्तित्वात आहेत. तर मुस्लिम पत्रकारांचा वेगळाच संघ असुन प्रेस क्लब नावानेही एका संघाची न्यास नोंदणीकडे नोंदणी करून ठेवल्याचे समजते. या सर्वच पत्रकार संघटनांकडून न्याय मिळत नाही अशी भावना व्यक्त करत शहरातील काही पत्रकारांनी पुन्हा युवक पत्रकार संघाच्या नावाखाली वेगळ्या संघाची स्थापना करण्याचे घाटत आहे. याबाबत एक बैठक झाली असुन स्थापनेसाठी लवकरच दुसरी बैठक होणार असल्याचे समजते. प्रत्येक पत्रकार संघात इकड तिकडच्या पत्रकार संघातून सदस्यत्व किंवा पदाधिकारी पद उपभोगणारेच दुसर्‍या पत्रकार संघात पदे स्विकारत असल्याने ते पुन्हा अन्य लोकांना किंवा पत्रकरांच्या प्रश्नांना काय न्याय देणार? हे मात्र समजु शकत नाही.
विशेष म्हणजे कोणताही पत्रकार संघ स्थापन करतांना शहरातील एखाद्या वृत्तपत्राने त्यात पुढाकार घेतल्याचे दिसुन येते व पुढे कंसात का असेना पण त्या वृत्तपत्राचा पत्रकार संघ म्हणुनच तो पत्रकार संघ आणि त्याचे पदाधिकारी मिरवतांना दिसतात. त्यामुळे आगामी काही काळात शहरात आणखी काही वृत्तपत्रांचे वेगवेगळे पत्रकार संघ स्थापन झाले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे कोणताही पत्रकार संघ स्थापन होतांना जे पदाधिकारी होतात ते पुढे पाच किंवा दहा वर्ष झाली तरी पद सोडत नाहीत आणि पदाधिकारी बदलत नाही. होणारे पदाधिकारी तहहयात असल्यासारखेच वावरतात. आणि त्यांच्याच नाराजीतून पुन्हा नविन पत्रकार संघाचा जन्म होतांना दिसतो. पत्रकारांचा एखादा कार्यक्रम आला म्हणजे सर्वच संघातील सदस्यांना बोलावून गृह निर्माण योजनेसारखी लालुच दाखवुन पाठीशी उभे केले जाते. आणि पुन्हा या योजनेची आठवण नविन वर्षाच्या नविन कार्यक्रमात केली जाते.
शासनाच्या मदतीने बीड शहरात पत्रकार भवन तर आहे. पण ते नेमक्या कोणत्या पत्रकार संघाकडे आहे आणि त्याचे आर्थिक व्यवहार कोण पाहतो, पत्रकार भवनाच्या जागा कोणी कशा घेतल्या आणि त्यांचे भाडे कोणत्या खात्यात जमा होते हे कोणत्याच पत्रकार संघाला सांगता येणार नाही. एका पत्रकार संघाचे वाद तर न्यास नोंदणीच्या खेटा मारून उच्च न्यायालयातही  पोहचल्याचे वृत्त आहे. पत्रकारांचे कोणतेही प्रश्न न सुटताही इतके पत्रकार संघ का स्थापन होतात याचे कोडे जिल्ह्यातील भल्या भल्या राजकीय पुढार्‍यांनाही सुटलेले नसले तरी ते प्रत्येक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना राजाश्रय देत असल्याचे दिसत असल्यामुळे केवळ पदाधिकारी होण्यासाठीच पुन्हा पुन्हा पत्रकार संघ स्थापन होतांना दिसतात. शासनाच्या माहिती खात्यालाही कोणता पत्रकार संघ अधिकृत आणि कोणता खरा याचे उत्तर सापडत नसल्याचे अनेक वेळा दिसुन येते. अनेक वेळा तर आपण पुर्वीच्या कोणत्याही पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍याला आपला नेता मानत नाही हे दाखवून देण्यासाठीच नवा पत्रकार संघ स्थापन केला जात असल्याचे दिसुन येते. विशेष म्हणजे पत्रकार संघांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकांची पदाधिकारी होण्याची इच्छा मात्र पुर्ण होते. वेगळा पत्रकार संघ दाखवला तरी अंधारात एकत्र येऊन आपल्या नेतागिरीचे लाभही मिळवता येतात.
पत्रकार संघाचा नेता झाल्यानंतर शासकीय यंत्रनांची आणि राजकीय पुढार्‍यांची संबंध जुळवुन आपण जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते आहोत हे दाखवत आपल्या खाजगी संस्था/सोसायट्या स्थापन करून लाभ आणि पदेही लाटता येतात. बीड शहरात शहरातील पत्रकारांचे पत्रकार संघ असले तरी हे पत्रकार संघ आपण जिल्ह्याचे असल्याचेच दाखवतात. पत्रकार संघांची संख्या वाढली असली तरी शहरातील आणि जिल्ह्यातीलही अनेक पत्रकार मात्र या कोणत्याही पत्रकार संघाचे साधे सभासदही नसुन आपला या संघाचा संबंध नसल्याचे दाखवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करून या कोणालाच आपण नेते मानत नसल्याचे ते दाखवत असतात. तरीही शहरात पत्रकार संघाची संख्या मात्र वाढतच असते. पुर्वीच्या पत्रकार संघांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले नसले तरी नविन स्थापन होणार्‍या संघाने तरी पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा अनेक पत्रकार व्यक्त करत होते.

राज्य पातळीवरही तेच
राज्य पातळीवरही गेली पन्नास वर्षे पत्रकारांच्या प्रश्नावर काम करणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद काहींनी बाजुला ठेवली असून नविनच महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना केल्याचे वृत्त दोन दिवसांपुर्वीच आले आहे. त्यांनीही केवळ राज्य स्तरीय ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घेत आपण सर्व महाराष्ट्राचे नेते असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे.