मोबाईलकारिता वेगवान, अपरिहार्य!


वृत्तपत्रे कागदावर छापून घरोघरी विचार पोहोचवू लागली म्हणून ती पत्रे आणि त्यासाठी केलेले काम ही पत्रकारिता, या व्याख्याच बदलण्याची वेळ आज आली आहे. आजचेच उदाहरण बघा - कसारा लोकल अपाघाताचे दोन तासात इतके अपडेटस वेगवेगळ्या स्त्रोतातून आले की विचारु नका. खुद्द इंजिन ड्रायव्हरने इतकेच काय जखमी गार्डनेही फोटो पाठविले आणि अवघ्या दहा मिनिटात माहिती मुंबईतील सर्व सोशल  गृप्समध्ये फिरुऊ लागली. प्रत्येक प्रवाशानेही आपापल्या पद्धतीने न्यूज जनरेट केली. 'सामना'चे मंत्रालय प्रतिनिधी सुनील जावडेकर टिटवाळ्यात राहतात. ते याच ट्रेनने सीएसटीकडे जात होते. त्यांनी नंतर बरीच माहिती; छायाचित्रे पुरविली; पण एखाद्या पत्रकाराने रिपोर्टिंग करण्याच्या अगोदरच पहिला फ्लॅश हा 'आम आदमी'चा आला होता.

आता उद्या वृत्तपत्रांनी असे काय द्यायचे की वाचक म्हणतील, " हा, कुछ नया है यह!" कारण मलाच स्वत:ला आता इतके काही या घटनेतील माहिती झालेय की मी उद्या वृत्तपत्रात ही बातमी का वाचावी? कदाचित एखाद्या वेगळ्या ह्युमन इंटरेस्ट स्टोरीसाठी किंवा जबरदस्त फोटोसाठी! आता बातमी नवीन राहिलेली नाही; वेगळे काहीतरी द्यावे लागेल ज्यात 'भावना' असेल. सध्या इमोशन्स विकल्या जातात. तमाम वाहिन्यांवरील सिरिअल्स पाहा; महिला अश्रू ढाळत पाहतात! 'भावनांनी' टीआरपीही मिळतो. वृत्तपत्रांनाही इमोशन्सचे महत्त्व ओळखावे लागेल. 




आपल्याकडे अजूनही वृत्तपत्रे आणि संपादक 'जुने ते सोने' याला चिकटून बसले आहेत. इमोशन्सचे महत्त्व ओळखले ते इंग्रजी वृत्तपत्रांनी आपल्याकडे 'भास्कर', 'दिव्य मराठी'ने! सकाळ, लोकमत किंवा सर्वच आपल्या मातीतील छोटी-मोठी वृत्तपत्रे फोटो वापरताना फार कंजुषी करतात; त्यांना ते जागा वाया घालविणे वाटते; 'दिव्य'ला नेमका याच मानसिकतेचा फायदा होतो. त्यांच्या फोटोस्टोरीज भन्नाट असतात; विशेषत: 'भास्कर'च्या तर अधिकच! मिड-डे, मिरर निव्वळ फोटोस्टोरीजसाठी इतरांपासून वेगळे ठरतात. फोटोकडे निव्वळ छायाचित्र म्हणून पाहायला नको; त्यात भावना व्यक्त करण्याची जबरदस्त ताकद असते. 'दहा हजार शब्दांपेक्षा एका छायाचित्राची किमया अधिक असते,' हे आपण पत्रकारितेच्या पुस्तकात शिकतोय वर्षानुवर्षे; पण त्याचा वापर करायला मात्र कचरतो. 'भास्कर'ने त्याचा व्यवहारात वापर सुरू करुन प्रॉडक्ट् एनरिच केलेय.
पत्रकारितेला बदलावे लागणार हे तर अगदी शाश्वत सत्य आहे; त्यासाठी कोणा विद्वान पंडिताची गरज नाही. आजच्या समाजाचा बदलाचा, तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग अफाट आहे. त्याच्याशी जुळवून घेताना मराठी माध्यमांची पार दमछाक होतेय. पत्रकारिता ही मोबाईलकारितेत कधी रुपांतरित झालीय; ते कळलेही नाही. मोबाईल येण्यापूर्वी काही काळ पेजरचे युग होते. पेजर आले कधी आणि गेले कधी, त्याचा पत्ताही लागला नाही; इतका तो स्थित्यंतराचा छोटा कालावधी ठरला. अगदी तसेच वेबपत्रकारितेचे झालेय. वेबपत्रकारिता अपरिहार्य आहे, असे आम्ही म्हणतो न म्हणतो तोच इंटरनेटपुढे स्मार्ट मोबाईल्सचे आव्हान उभे ठाकलेय.

मला 'जळगाव लाईव्ह'चे शेखर पाटील यांचे नाव म्हणूनच अग्रक्रमाने घ्यावेसे वाटते. आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मिडीयाच्या डीजीटलायझेशनवर त्यांचा भर आहे. सोशल माध्यमातून जी बातमी मला आजच, आताच समजतेय ती वाचण्यासाठी मी दुसरया दिवशी सकाळच्या वृत्तपत्राची वाट का पाहावी? असा विचार अनेक जण करू लागले आहेत. लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास आणि नेहमीच्या सेकंड क्लास डब्यातही असे अनेक जण मला भेटतात; की ते अनेक दिवस पेपरच वाचत नाही. बातम्यांचा मुख्य स्त्रोत म्हणजे मोबाईल आणि त्यातही सोशल मिडीया! परिस्थिती आहे; पण वृत्तपत्रे माहितीचा स्त्रोत म्हणून नको आहे. ही मानसिकता हे वृत्तपत्रे, पत्रकारितेपुढचे मोठे आव्हान आहे. कुणी संपणार नाही; पण लोकप्रियता घसरू लागेल; जर बदलाच्या वेगाशी जुळवून नाही घेतले तर! वृत्तपत्र "ग्लोबल' झाले तरीही 'लोकल'च अधिक चांगले असते. हे 'लोकल' नव्या माध्यमांतून वृत्तपत्रांनी पोहोचवायला हवे. ते काम शेखर पाटील करताहेत, म्हणून मला त्यांचे कौतुक वाटते; हे मी वर लिहिलेच आहे.

जे काम
'जळगाव लाईव्ह' करू शकते ते 'दिव्य', 'लोकमत', 'सकाळ', मटा, लोकसत्ता ही बडी वृत्तपत्रे त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, नेटवर्क असूनही का नाही करु शकत? जळगावातील/माझ्या शहरातील एखादा कार्यक्रम, घटना मला पुरेशा क्षमतेने व विस्ताराने अथवा ते महत्त्व किंवा प्राधान्याने वाहिन्यांवर दिसत नाही. या बड्या वृत्तपत्रांनी त्यांच्या वार्ताहरांजवळच डिजिटल उपकरणे किंवा आता तर स्मार्ट फोनही दिले तरी अनेक बातम्यांचे 'लाईव्ह' वाचकांना मिळतील. फक्त वार्ताहरांना 'पत्रककारिता' बंद करून प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याचे कष्ट घ्यावे लागतील. मित्रानो, मला माफ करा; मी तुमची माफी मागून हे सत्य लिहितोय की अनेक वार्ताहर आळशी झाले आहेत; फोनवर बातम्या घेतात किंवा पत्रकावर करतात. त्यामुळे प्रत्यक्ष स्पॉटचा फील बातम्यात कधीच उतरत नाही. त्या तुलनेत फोटोग्राफर एकमेकाचा फोटो शेअर करत असले तरी प्रत्यक्ष स्पॉटवर उपस्थित असतात. बदलांशी जुळवून घेताना आम्हाला आपले पारंपरिक दृष्टीकोणही बदलावे लागतील. 'भास्कर' बरयापैकी त्यांच्या पत्रकारांची मानसिकता बदलण्यावर मेहनत घेतो. इतर ते का करीत नाहीत अजूनही?

मुंबईतच नव्हे तर सर्वत्र अनेक बातम्या आजकाल 'व्हॉटसअप'वर येतात. ई-मेलही आता कुणी फारसे करत नाही; बघत नाही. 'फेसबुक'चेही अलीकडे रोज लॉग-इन केले जात नाही. रायगडात कुठेतरी तलाठ्याला पकडले तर इंग्रजी, हिंदी, मराठीत कारवाई करणारी ती टीमच सर्व मेसेज, फोटो फॉरवर्ड करते; पोलिसांचेही तसेच, अनेक पक्ष, राजकारणी, संस्थाही ते करतात. मी मुंबईत असताना मला एरंडोलचा ट्रक जळाल्याचा फोटो जळगावच्या दैनिकांच्यापेक्षा अगोदर मिळतो; ही माध्यमाच्या नव्या वेगाची ताकद आहे. 'सिटीजन जर्नालिस्ट' ही कन्सेप्ट्ही तशी आता जुनी झालीय. 'सोशल जर्नालिस्ट' जागोजागी आहेत; त्यांना वृत्तपत्रे उत्तेजन का नाही देत? छापा ना त्यांनी दिलेल्या बातम्या व फोटो त्यांना क्रेडीट/बायलाईन देऊन! काय फरक पडणार आहे, काय बिघडणार आहे? 


मुळातच आमच्या मराठी पत्रकारितेतील मंडळींचा कद्रूपणा भयानक आहे. ते आपल्या वार्ताहरांना नाही देत क्रेडीट तर बाहेरच्यांना कसे देतील? त्यांचा युक्तिवाद काय तर, बायलाईन/क्रेडीट दिले तर ते लोक लगेच बाहेर वृत्तपत्रांचे नाव सांगून गैर धंदे करतात, गैरवापर करतात! अहो, ते तर असेही सुरूच आहे; अनेकजण करतात आजही! कितीतरी जण अमक्या-तमक्या दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून "उद्योग' करीतच असतात. तुम्ही रोखू शकलाहेत त्यांना? मग त्या भीतीपायी वाचकांच्या वृतपत्रनिर्मितीतील सहभागावर काट का म्हणून मारायची? एकदा त्यांना क्रेडीट देऊन बघा कसे धडपडतात ते. एका 'फद्या' पैशाची अपेक्षा न ठेवता धावतील ते नवे शोधायला, तुम्हाला नवे कळवायला. एकही बातमी चुकणार नाही व जागोजागी, पावलापावलावर मिळतील वृत्तपत्रांना प्रतिनिधी! करायला काय हरकत आहे. 'दिव्य'मध्ये जळगावात असताना आम्ही अनेकांना असे उत्तेजन दिले होते. 'सोर्स' उभे केले होते. तेच तर आहे नव्या युगातील तुमचे शक्तीस्थान! 

इंटरनेट वापरणाऱ्यांच्या जोडीला स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येतही भारत चीन आणि अमेरिकेनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. स्मार्टफोन फीचरफोनपेक्षा मुख्यत्त्वे वेगळा ठरतो तो त्याच्या इंटरनेट वापराच्या क्षमतेमुळे. एखादा संगणक करू शकतो अशा जवळपास सर्व गोष्टी स्मार्टफोन करू शकतो. त्यामुळे स्मार्टफोनच्या बरोबर इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतच्या बाबतीत भारत मोठी उडी मारणार आहे. आज देशातील सुमारे १५ कोटी लोक इंटरनेट वापरत असले तरी पुढच्या ५ वर्षात जगातील सर्वाधिक नेटकर भारतात असतील. एकीकडे गुगलसारख्या कंपन्यांनी पुढील ५ वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सध्याच्या २७० कोटीवरून ५०० कोटीवर नेण्याचा चंग बांधला आहे.

हा ५०० कोटीचा आकडा गाठण्यासाठी भारतातल्या किमान ७०-८० कोटी लोकांना इंटरनेटवर यावेच लागेल. दुसरीकडे आता टेलिकॉम कंपन्यांनीही महिना ३०-५० रूपयात मोबाईल इंटरनेट प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन – स्वस्त टॅबलेट विकत घेणारे बहुतांशी भारतीय इंटरनेटही वापरतील असा अंदाज आहे.  आजूबाजूला नजर टाकली तर लोक ते फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा यु-ट्यूबसारखी सोशल मिडिया साइट्स वापरताना किंवा गेम खेळताना दिसतात. या साइट्सवरही अनेकजण स्वतःचे विचार पोस्टद्वारे मांडण्याऐवजी दुसऱ्यांचे पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करणेच पसंत करतात. जोक, कोडी, देवदेवतांचे भक्त आणि देवळं आणि अद्भुत रम्य गोष्टी शेअर करण्यात भारतीयांचा हात कोणी धरू शकणार नाही.

स्मार्टफोन युजर दिवसभरात सरासरी १५० वेळा आपला फोन चेक करत असतो. किमान २३ वेळा तो मेसेज अपडेट पाहात असतो. हे सारे करतानाच तो ताज्या बातम्याही पाहून घेतो. बातम्यात त्याचा रस चित्रपट, मनोरंजन, मोबाईल, गॅजेटस, तंत्रज्ञान, अद्भुत-रम्य व स्पोर्ट्स यात असतो. इंटरनेटच्या सरासरी वापरात अमेरिकन्सना मागे टाकून भारत आघाडीवर आहे. सोशल स्टेटस अपडेट्स करण्यात भारतीय जगात पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. हे सारे बदल पाहता आमची मराठी पत्रकारिता मात्र अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकतेय. ते म्हणाले, त्यांनी सांगितले अशा छापाच्या बातम्यात आता कुणालाही रस नाही. राजकारणात नव्या पिढीला काडीचाही रस नाही. मनोरंजन, स्पोर्टस आणि तंत्रज्ञान व नंतर करिअर, नोकरीविषयक असेल ते त्यांना भावते, हे अनेक सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. 

- विक्रांत पाटील
Vikrant@Journalist.Com