पत्रकारांच्या संघटनांमधील राजकारण तापले

राजकीय आघाडीवर सध्या सामसुम असली तरी पत्रकारांच्या संघटनांमधील  राजकारण मात्र सध्या चांगलंच तापलेलं दिसतंय.मराठी पत्रकार परिषद या राज्यातील पत्रकारांच्या सर्वात मोठ्या संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे ( हे 1 सप्टेंबरपासून अध्यक्ष होणार होते) यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असल्याचं वास्तव समोर आल्यानंतर परिषदेने त्यावर विचार विनिमय कऱण्यासाठी तातडीची बैठक बोलाविली.25 ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत चंद्रशेखऱ बेहेरे यांनी राजीनामा दिला ( राजीनामा दिला म्हणण्यापेक्षा तो देण्यास त्यांना भाग पाडले गेले.आता नंदुरबारहून बातमी अशी आली आहे की,बेहेरे यांना नंदुरबार आणि धुळे  जिल्हयातून दोन वर्षांसाठी तडीपार करावे अशी शिफारस पोलिसांनी कलेक्टरांकडे केली आहे,गणपतीच्या अगोदर त्यावर निर्णय अपेक्षित आहे.) बरे झाले बेहेरेंचा राजीनामा घेतला गेला अन्यथा 76 वर्षाची परंपरा असलेल्या परिषदेचा अध्यक्ष एक तडीपार व्यक्ती झाली असती।त्यातून परिषदेची जी बदनामी झाली असती ती कदापिही भरून निघाली नसती. परिषदेने सध्या विद्यमान कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्याकडे प्रभारी  अध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत.गणपतीनंतर नव्या अध्यक्षाची निवड अपेक्षित आहे.परिषदेने आता तरी अध्यक्ष पारखून निवडावा, नाही तर ये रे माज़्या मागल्या। 
परिषदेचे हे वाद थांबतात न थांबतात तोच आता मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर  संघाचे राजकाऱण तापले आहे.मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर  संघाचे अध्यक्ष आहेत चदन शिरवाळे.शिरवाळे यांच्या काळात संघाचे कार्यालय नव्याने उभारलेल्या जागेत आलं.खरं तर याचं श्रेय द्यायचंच तर अगोदरच्या पदाधिकार्‍यांना धावे लागेल  पण शिरवाळे यांनी शनिवारी गुपचुप आपल्या नावाची कोनशिला संघाच्या कार्यालयाबाहेर चिटकविली.शनिवारी फार कोणी पत्रकार मंत्रालयाकडे फिरकत नाहीत.पण ज्यांनी हा प्रकार पाहिला ते संतापले आणि म्हणता म्हणता बातमी मुंबईभर पसरली.त्यामुळं सारेच चिडले .कारण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना देखील संघाचे कार्यालय नव्या जागेत गेले होते.तेव्हा प्रफुल्ल सागळे हे अध्यक्ष होते.त्यांनी अशीच कोनशिला बसविली पण ती नंतर काढली गेली.त्यानंतर झालेल्या जनरल बॉडीच्या बैठकीत यापुढे कोणीही असा "उद्योग" करू नये ,आपल्या नावाची कोनशिला उभारू नये असा ठराव संमत झाला होता.मात्र त्याकडे कानाडोळा करून शिरवाळे यानी कोनशिला बसविली आहे.त्यावर अध्यक्ष म्हणून चंदन शिरवाळे आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांची नावं आहेत.हे प्रकऱण आता या दोघांवरही शेकणार अशी चिन्हे असून उद्या सोमवारी कार्यकारिणीची तातडीची सभा होणार असून ती चांगलीच गाजणार असे दिसतय .मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघांला पन्नास वर्षे होत आहेत.त्यानिमित्त निधीची मागणी करणारी पत्रं देखील मंत्र्यांना दिली गेल्याची चर्चा आहे.या पत्रावरूनही अध्यक्षांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.कारण असा निधी उभारायला देखील एका ठरावाव्दारे विरोध केला गेलेला आहे.दोन दिवसाताली या घडामोडीमुळे उद्या मीटिंग मध्ये  काय होते याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.बैठकीत शिरवाळे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाऊ शकते.
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार या संघटनेतही फार काही अलबेल नाही.यदु जोशी हे या संघटनेचे तह्ह्यात अध्यक्ष आहेत की काय माहिती नाही पण गेली बारा ते पंधरा वर्षे त्यांनी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत.इतरांना साधशुचितेचे आणी  तत्वाचे धडे देणार्‍या पत्रकारांच्या संघटनेतही दहा-दहा बारा-बारा वर्षे निवडणुकाच होत नसतील तर यांना राजकारण्यांच्या नावानं बोंबा मारण्याचा अधिकार पोहोचतो का? .श्रमिक पत्रकार संघाचे मुंबईत अस्तित्व नाहीच.पुणे आणि नागपूरमध्येच ही संघटना प्रभावीपणे काम करते.चंद्रपूर,सोलापूर आणि अन्य एक दोन ठिकाणी संघटनेचे युनिटंस आहेत.पुणे असो किंवा नागपूर असो या शाखांचा कारभार नियमानुसार चालतो।  तेथे नियमित निवडणुका होतात,हिशोब सादर केले जातात,विविध उपक्रम राबविले जातात पण मध्यवर्ती संघटना असलेल्या महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी आहेत.गेली अनेक वर्षे संघटनेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत, सभा होत नाहीत किंवा संघटनेचे हिशोबही  सादर केले गेलेले नाहीत.अघ्यक्ष तर यदु जोशी आहेत पण अन्य पदाधिकारी कोण आहेत याचा पत्ता कोणालाच नाही.त्यामुळं ही संघटना वन मॅन शो आहे की काय अशी चर्चा आहे..याबद्दल राज्यात मोठी नाराजी आहे.काही दिवसांपुर्वी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी या संदर्भात एक पोस्ट फेसबुकवर टाकून खुर्ची न सोडण्याच्या पत्रकारितेतील प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.मात्र त्यानंतरही काही फरक पडलेला दिसत नाही.या संबंधिच्या तक्रारी आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यत गेलेल्या आहेत.खरं तर ट्रड युनियन अ‍ॅक्टखाली नोंदविल्या गेलेल्या या संघटनेने श्रमिक पत्रकारांच्या हिताचे विषय हाती घेऊन ते मार्गी लावल अपेक्षित असते.मात्र मजेठियाच्या अंमलबजावणीवरून देशभर काहूर उठलेले असताना महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना मात्र मुग गिळून गप्प होती.आजही राज्यात अनेक वृत्तपत्रांनी मजिठिया लागू केलेला नाही तरीही यदु जोशी आपली लोकमतमधील नोकरी धोक्यात यायला नको म्हणून या विषयावर शब्दही बोलायला तयार नाहीत.स्वार्थासाठी पत्रकारांच्या हिताचा  बळी द्यायचा आणि दुसरीकडे खुर्चीही सोडायची नाही अशी दुहेरी भुमिका घेऊन यदु जोशी निघाले असून आता ते अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला निघाले आहेत।यदु जोशी  यांच्या विरोधात आता नागपूरमधूनच बंड होणार असल्याच्या बातम्या हाती आलेल्या आहेत.