भारतकुमार राऊतांचा राजीनामा !!

लाखो गुंतवणूकदारांना 1700 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना लावणार्‍या 420 महेश मोतेवारांची शंभरी आता भरली आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मी मराठीतही सध्या राजीनामा सत्र सुरु झालेले आहे. सीईओ सुप्रिया कणसेंसोबत आता शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनीही त्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र दुसरे संचालक कुमार केतकर मात्र अद्यापही पदावर असून, मोतेवारांसाठी लायझनिंगची कामे करत आहेत. मात्र महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉजिटर्स अ‍ॅक्ट (एमपीडीए) लागू झाला तर लाचार केतकरांनाही मोतेवारांप्रमाणे तुरुंगात खडी फोडायला जावे लागणार आहे.




.....................

मी मराठी आणि लाईव्ह इंडिया या दोन्ही टि.व्ही चॅनल्सचे संचलन करणारी समृद्ध जीवन कंपनी अनेक कारणाने काही दिवस चर्चेत होती. सेबीने केलेल्या कारवाईनंतर आता हा खरा भोपळा फुटला आहे. समृद्ध जीवन कंपनीच्या मालकाने आपल्या प्रेयसीलाच सीईओ कसे बनवले ? याच्याही सुरस कथा आम्ही जगजाहीर केल्या आहेत. इस्टेटीवरून भांडणे सुरू झाली आहेत. आपल्या प्रेयसेसाठी लग्नाच्या बायकोला सोडून देणारा मोतेवार आता पूर्णत: कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. इंद्राणी मुखर्जी प्रकरणापेक्षाही हे प्रकरण आधिक रंगतदार आहे. 


देशभरातून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणार्‍या भामट्या माणसाच्या संस्थेत कुमार केतकर आणि भारतकुमार राऊत ही माणसे कशी काम करतात, हे कोडेच आहे.

निखिल वागळे यातून अगोदरच बाहेर पडलेत. गुरूवारी भारतकुमार राऊत यांनीही राजीनामा दिला. या दोघांनी उशिरा का होईना पण आपली चुक सुधारली आहे. मात्र नैतिकतेचा डांगोरा पिटणारे आणि जगाला शहाणपणाचे डोस पाजणारे कुमार केतकर अजूनही मोतेवारांना चिकटून आहेत. अशा दुटप्पी माणसांचा आदर्शवाद कसा खपवून घ्यायचा, याचा एकच अर्थ निघतो की, केतकरांना आता कोणीही उभे करत नाही किंवा त्यांना म्हातारपणातही लाभाचे पद हवे आहे. त्यासाठी कुठलीही नितीमत्ता आणि संकेत पाळण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. 


लक्षावधी गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर करणार्‍या ‘समृद्ध जीवन’ला माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला. सेबीचे प्रतिबंध असतानाही या कंपनीने तब्बल 463 कोटींचे व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणार्‍या ‘समृद्ध जीवन’ने सेबीचे प्रतिबंध असतानाही तब्बल 426 कोटींचे व्यवहार करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांनी केला आहे. तसेच मोतेवार यांनी गुंतवणुकदारांचे सगळे पैसे बुडवले असून सरकारने त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी सोमैय्यांनी केली आहे

समृद्ध जीवन मल्टी को.ऑ. सोसायटीने चीट फंडच्या माध्यमातून जमा केलेले 426 कोटी रुपये मॉल, इतर बिझनेस आणि टि.व्ही चॅनेलमधे सेबीच्या निर्बधानंतरही वापरले आहेत आणि ते लोकांना परत केले जाण्याची शक्यता शुन्य आहे असा खळबळजनक आरोपही किरीट सोमैय्यांनी केला आहे. यासाठी सोमैय्या यांनी कोऑपरेटीव्ह मिनीस्ट्रीच्या 2015 चा रिपोर्टचा दाखला दिला आहे.

आघाडी सरकारने वेळीच कारवाई केली असती तर हे प्रकरण एवढे वाढलेच नसते असेही सोमैय्या म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी महेश मोतेवार यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांची आणि संचालकांची बँक खाती जप्त करण्यात यावीत अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे. यासंदर्भात ते कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांना भेटले.

याप्रकरणी मोतेवार यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांची आणि संचालकांची  बँक खाती जप्त करण्यात यावीत अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

मातेवारांना प्रसिध्दीची प्रचंड हौस आहे. लाखो गोरगरिबांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारायचा, हा त्यांचा रक्त शोषून घेण्याचा प्रकार आहे. आणि त्यानंतर स्वस्त प्रसिध्दीसाठी महारक्तदान शिबीरे भरवायची, ही 420 मोतेवारांची जुनीच तंत्रे. मॅनेज केलेले पुरस्कार व मानद पदव्या यातूनही मोतेवारांनी वारेमाप प्रसिद्धी मिळवली. या सगळ्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी दिली.

चिटफंडातून कोणी लुटले?
समृद्ध जीवन आणि साईप्रसाद लॅण्डमार्क या चिटफंड कंपन्यांना प्रतिबंध घातला आहे.
हरी ओम, पर्ल अग्रो, ट्विंकल प्लांट्स अँड प्रोजेक्ट, ओम गोएंका या कंपन्यांची सेबीतर्फे चौकशी सुरु आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर राज्य सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केबीसीने महाराष्ट्रातील अनेक गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या चिटफंड कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गरवारे क्लब हाऊस, सायट्रस हॉटेल्स,ऑरेंज हॉलिडेज, एनमार्ट रिटेल्स गुरुप्रसाद, व्हर्जिन गोल्ड इंटरनॅशनल, मीरा रिअलटर्स या चिटफंड कंपन्या संशयाच्या फेर्‍यात आहेत.

महाराष्ट्रात 162 चिटफंड कंपन्यांनी राज्यातील जनतेचे 40 हजार कोटी लुटले आहेत. या चिटफंड कंपन्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी खासदार सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळा करणार्‍या 162 कंपन्यांची यादीच सादर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने पावले टाकली जातील असे आश्‍वासन दिले आहे. एनमार्ट, केबीसी, समृद्ध जीवन, ऑरेंज हॉलिडेज कंपनी, साईप्रसाद, गरवारे, श्री सुर्या, पर्ल्स, हरी ओम, मीरा, ट्विंकल आदी चिटफंड कंपन्यांचा यात समावेश आहे. या कंपन्यांकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आली नाही.
रस्त्यावर भाजीपाला विकणारे, रिक्षाचालक यांसारख्या सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाची पुंजी महेश मोतेवार या 420 आरोपीच्या कंपन्यांमध्ये गुंतवली. त्यातून 1700 कोटींहून अधिक रुपयांची माया जमा केली. ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी महेश मोतेवर, कुमार केतकर यांना संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.



मला सामाजिक कार्याची आवड आहे. मी कायमच त्या कामात व्यस्त असतो. कोणत्याही वादविदात पडण्याची मला इच्छा नाही. यामुळे मी या कंपनीच्या संचालक व माध्यम सल्लागार या पदांचा राजीनामा दिला आहे. 
भारतकुमार राऊत, माजी खासदार

सेबीकडे तक्रार येतच नाही. सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा पोलीसात तक्रार घेऊन जातात तेव्हा त्यांना सांगतात सेबीकडे जा. मात्र सेबी किरकोळ स्वरूपाची तक्रार घेतच नाही. सेबी चौकशी करते 100 करोडच्यावर तेव्हा त्यामध्ये फारच मोठा कालावधी जातो. जवळजवळ 12 ते 13 वर्षांचा कालावधी लागतो. त्या काळात हे लोक विदेशात सायपन ऑफ काढतात. दुसर्‍या कंपन्या काढतात. गरिबांकडून चेक मिळत नाही. त्यांना 1000, 2000 ची कॅश मिळते त्याचा ते  लाभ घेतात. महेश मोतेवार विरोधात मध्यप्रदेशमध्ये वॉरन्ट काढले आहे. 2000 रु. चे इनाम ठेवले आहे. तरीही त्यांना पासपोर्ट मिळतात. परदेशात ते लोक भ्रमण करतात. ते मुजोर झाले आहेत. सेबीच्या सेटने 6 महिन्यांचे 2 वेळा एक्सटेंशनही दिले आहे.
नरेश जैन, अर्थतज्ज्ञ

वृत्तपत्र स्वातंत्र्याची सुरुवात ही स्वतःच्या वृत्तपत्रापासून होते. वृत्तपत्राचे मालक हे कोणत्या मार्गाने पैसा कमवतात याची काही निगरगट्ट संपादकांना फिकीर नसते. जेव्हा कायद्याची यंत्रणा गळयापर्यंत येते तेव्हा ते लोक मालकाची साथ सोडून पळून जातात. भारतकुमार राऊत यांच्या राजीनाम्यामुळे ही गोष्ट पुन्हा दिसून आली. वाईट मार्गाने पैसे कमविणार्‍या मॅनेजमेंट वरीष्ठ पत्रकारांना आपली काळी कृत्य दाबण्याकरीता सुपारी देतात. ती सुपारी त्यांना वेळेत वाजवता आली नाही तर त्यांना नोकरीवरून काढलं जातं. भारतकुमार राऊत यांच्या गच्छंतीमध्ये हा एक दृष्टीकोन दिसून येतोय. राऊत यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्या हकालपट्टीचा भाग आहे. मोतेवारने त्यांना सक्तीने राजीनामा देण्यास सांगितले होते, हे जगजाहिर आहे.
केतन तिरोडकर, ज्येष्ठ आरटिआय कार्यकर्ते   

महेश मोतेवर यांनी सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक करुन काळी माया जमा केली आहे. ज्या कंपन्यांवर सेबीने किंवा इतर विभागाने प्रतिबंध घातलेत त्या कंपनीत पैसा ट्रान्सफर केला. शेतकर्‍यांकडून शेळी, मेंढीच्या नावाने पैसे घेतले. ते सगळे पैसे मोतेवारने आपल्या सेवेन स्टार हॉटेल्स, मॉल्स, विमान आणि हिंदी, मराठी दोन्ही चॅनल्ससाठी डायव्हर्ट केले आहेत. नियमबाह्य पद्धतीने गोरगरिबांची व  गुंतवणूकदारांची फसवणूक केली. असा स्पष्ट निष्कर्ष या अहवालात आहे.
किरीट सोमैय्या, खासदार

समृद्ध जीवनवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई आणि मी मराठी चालवणार्‍या कंपनीमध्ये सुरु झालेले राजीनामा सत्र यांचा थेट संबंध आहे. मी मराठीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून सुप्रिया कणसे यांना महेश मोतेवार यांनी निवडले होते. त्याचबरोबर समृद्ध जीवनमधून मी मराठीमध्ये सीईओ हे पद त्यांच्यासाठी निर्माण केले होते. त्यामुळे समृद्ध जीवन बुडीत निघाल्यानंतर मी मराठीची पूर्ण चौकशी होणार आणि यामध्ये ज्यांच्याकडे कंपनीची सुत्रे आहेत, त्यांच्यावर सर्व कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी येऊन पडणार हे स्पष्ट आहे. ज्यावेळी एखादी कंपनी अपहार किंवा गैरव्यवहारामुळे बंद पडते तेव्हा तिच्या संचालकांना सर्व कागदपत्रे तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे की नाही याचा जाब केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तसंच सक्तवसूली संचलनालय (ईडी) इत्यादींना द्यावा लागतो. कागदपत्रांमध्ये घोटाळा असेल किंवा कागदपत्रे गहाळ केली असतील तर एखाद्या डमीला पदावर बसवून अपहाराचे सूत्रधार पळ काढतात, असा अनुभव कित्येकदा यापूर्वीही आलेला आहे. त्यामुळे मी मराठीमधील राजीनामा सत्र ही याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
संजीव पुनाळेकर
सचिव, हिंदू विधिज्ञ परिषद

जे बडे पत्रकार आहेत ते संपूर्ण व्यवस्थेशी संधान बांधून असतात आणि आपापसात आर्थिक हितसंबंधांची ते जपणूक करत असतात. त्यात आर्थिक नुकसान होऊन जनतेचा नाहक बळी जातो. या बड्या धेंडांना मी ‘कोअ‍ॅलिशन ऑफ कनेक्टेड पिपल’ म्हणतो. भारतातील लोकशाहीसाठी आणि पारदर्शक व लोकाभिमूख कारभारासाठी हे अत्यंत हानिकारक आहे. यात गुंतलेल्या सगळया बड्या धेंडांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. या अशा भ्रष्ट व अनिष्ट आर्थिक हितसंबंधातून ङ्गपीत पत्रकारीताफ जन्माला येते आणि लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा व मोठा चौथा आधारस्तंभ आहे तो पोखरला जाऊन कमकुवत होतो. हे कुठल्याही राष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे.
राजन राजे, अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष 



उन्मेष गुजराथी