औरंगाबाद -  
ज्येष्ठ पत्रकार विद्याधर सदावर्ते यांच्यामुळे नावलौकिकास आलेल्या आणि 
शहरातील क्रमांक एकचे बनलेल्या सायंदैनिक सांजवार्तावर सध्या फारच बुरे दिन
 आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या दैनिकाला संपादकच नाही, अशी 
परिस्थिती असून, शेवटचे निवासी संपादक ठरलेल्या मनोज सांगळे यांनी राजीनामा
 दिल्यानंतर कोणताही ज्येष्ठ पत्रकार सांजवार्ताची सूत्रे हाती घ्यायला 
तयार नाही. खंबीर नेतृत्त्वच नसल्याने   दर्जाहिन वृत्तपत्र झाले असून, खप 
पूर्वीच्या अर्धाही राहिला नाही, अशी स्थिती आहे.
अनेक चांगले 
संपादक सांजवार्ताने राहिले आहेत. त्यात प्रारंभीच्या काळातील विद्याधर 
सदावर्ते यांनी खर्या अर्थाने या वृत्तपत्राला वाचकप्रिय बनवले. दुपारनंतर
 संध्याकाळपर्यंत सांजवार्ताचीच चर्चा असायची. तब्बल दहा वर्षे या 
वृत्तपत्राला विद्याभाऊंनी सांभाळले. मात्र इतकी वर्षे सेवा दिल्यानंतर 
मालकांनी त्याला अपमानास्पद वागणूक देत काढून दिले. त्यानंतर तरुण भारतचे 
मुकुंद कुलकर्णी यांनी सांजवार्ताची धुरा सांभाळली.  सकाळमधून आलेल्या मनोज
 सांगळे आणि कुलकर्णींच्या जोडी चांगलीच जमली आणि दोघांनी पुन्हा एकदा 
सांजवार्ता विक्रमी खपाकडे नेला. एकट्या शहरात पंधरा हजारावर सांजवार्ताचा 
खप होता. मात्र इथेही मालकाचा स्वभाव नडला. पैशाने सगळे काही विकत घेता 
येते, याच मानसिकतेत असणार्या सांजवार्ताच्या मालकाची वागणूक दोघांशीही 
बदलली नाही. आधी मनोज सांगळे आणि नंतर मुकुंद कुलकर्णींनी सांजवार्ता सोडून
 दिला. त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक आणि लोकमतचे माजी पत्रकार भालचंद्र 
देशपांडे हे कार्यकारी संपादक म्हणून रूजू झाले. दोन वर्षे त्यांनी 
सांजवार्ताला डबघाईतून वर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरत गेले.
 त्यातून मालकाचे फटकून बोलण्याची आणि पानउतारा करण्याची पद्धत इथेही सुरूच
 होती. मात्र आता सोडले तर धोका दिल्यासारखे होईल म्हणून देशपांडेंनी 
त्याही परिस्थितीत सांजवार्ताचा गाडा पुढे ओढणे सुरूच ठेवले. त्यांच्या 
अपेक्षेप्रमाणे असमाधानी मालकाने त्यांचा जुना हुकूमीएक्का असलेल्या मनोज 
सांगळे यांना जळगाववरून बोलावून घेतले. दुप्पट पगारासह त्यांच्या सगळ्या 
अटी मान्य करत औरंगाबादला सांगळे निवासी संपादक म्हणून कार्यरत झाले. ते 
आल्यानंतर वृत्तपत्रात अमुलाग्र बदल झाले. वृत्तपत्राचा लूकच बदलला. 
बातम्यांची निवड, आकर्षक ले-आऊट यामुळे सांजवार्ताची बाजारात पुन्हा एकदा 
चर्चा सुरू झाली होती. मात्र ती औटघटकेचीच ठरली.कारण माणूस येईपर्यंत 
डोक्यावर घेणार्या मालकाने ते येताच, स्वतःची वागणूक पुन्हा जैसे थे केली.
 इकडे सांगळेंच्या खांद्यावर भार टाकून आजारपणाचे निमित्त सांगत 
देशपांडेंनी तातडीने काढता पाय घेतला. मालकावर विश्वास ठेवून सकाळसारखी 
नोकरी सोडून आलेल्या सांगळेंच्या अपेक्षांना तडा गेल्याने तेही निराश झाले 
होते. वैतागून त्यांनीही तीनच महिन्यात राजीनामा देऊन आपल्या मीडिया प्लस 
संस्थेकडे लक्ष केेंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सांजवार्ता 
विनासंपादकाचा निघतोय. कोणताही ज्येष्ठ पत्रकार मालकाच्या स्वभावामुळे 
सांजवार्तात जायला तयार नाही. मागे लोकसत्ताचे माजी संपादक प्रवीण 
बर्दापूरकर यांच्या मागे सांजवार्ताचे मालक लागले होते, पण मालकाला चांगलेच
 ओळखून असल्याने त्यांनीही सांजवार्ताला दूरच ठेवले.
 
 
 
 
