स.सो.खंडाळकर लोकमतमधून निवृत्त होणार


औरंगाबाद - दैनिक लोकमतचे विशेष प्रतिनिधी,ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर येत्या १ जूनपासून लोेकमतमधून सेवानिवृत्त होत आहेत.औरंगाबादमध्ये दैनिक लोकमत १९८२ ला सुरू झाला.तेव्हापासून आजपर्यंत खंडाळकर दैनिक लोेकमतमध्ये कार्यरत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील अचलेर गावचे स.सो.उर्फ सदाशिव सोपानराव खंडाळकर यांच्या पत्रकारितेची सुरूवात सन १९८० मध्ये दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत झाली.याचवेळी त्यांनी एका दलित कन्येशी आंतरजातीय विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला.दैनिक लोकमत औरंगाबादेत सुरू झाल्यानंतर ते औरंगाबादेत आले.सुरूवातीस शहर वार्ताहर नंतर चिफ रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले.सोलापुरात दैनिक लोकमत सुरू झाल्यानंतर त्यांनी काही काळ सोलापुरात काम केले.सोलापुरात असताना रॉकेल विक्री घोटाळा काढून सोलापुरात रॉकेलला लागली आग,ही मालिका त्यांनी गाजवली.तसेच औरंगाबादेत स्व.जवाहरलाल दर्डा अन्न आणि पुरवठा मंत्री असतानाही पुरवठा खात्यातील मोठा घोटाळा काढला होता.त्यांच्या अनेक शोधवार्ता गाजल्या आहेत.त्यांना ५० हून अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
राजेंद्र दर्डा यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या खंडाळकर यांच्यावर पाच वर्षापुर्वी हृदय धमनी बाईपास सर्जरी होवूनही त्यांनी सेवानिवृत्ती न घेता दैनिक लोकमतशी असलेली नाळ तोडली नाही.लोकमतच्या पडत्या काळात चौकाचौकात पेपर वाटण्याचे कामही खंडाळकर यांनी केले.लोकमतमध्ये अनेक आले आणि गेले परंतु खंडाळकर यांनी  कधीही लोकमत सोडले नाही.प्रतिस्पर्धी दैनिकाची मोठी ऑफर आली असतानाही त्यांनी लोकमतशी गद्दारी केली नाही.लोकमत आणि खंडाळकर असे जणू समिकरण झाले होते.
एक अभ्यासू,व्यासंगी,शैलीदार लेखन करणारा आणि सर्वांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा पत्रकार म्हणून स.सो.खंडाळकर यांची ख्याती आहे.
औरंगाबादेत काही दिवसापुर्वी मित्रपरिवारांने त्यांचा मोठा जंगी सत्कार केला होता.यावेळी गौरव अंक काढून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.ते दैनिक लोकमतमधून सेवानिवृत्त होत असताना,लोकमत मोठा जंगी सत्कार करणार का,याकडे लक्ष वेधले आहे.

औरंगाबादेत झालेल्या जंगी सत्काराची व्हिडीओ क्लीप




जाता -  जाता :
स.सो.खंडाळकर हे लोकमत मधून सेवानिवृत्त होत आहेत तर गणेश खेडकर आणि सुहास अंजनकर यांनी लोकमतचा राजीनामा दिलेला आहे.खेडकर हे दिव्य मराठीत एन्ट्री करणार आहेत तर अंजनकर हे स्वत:चा व्यवसाय सुरू करणार आहेत.
लोकमतमध्ये रिक्त झालेल्या तीन जागांवर विजय देऊळगावकर (म.टा.),मंदार जोशी, (दिव्य मराठी) मनोज साखरे ( सकाळ ) यांची लोकमतमध्ये वर्णी लागली आहे.हे तिघेही १ जूनपासून लोकमतमध्ये ज्वाईन होणार आहेत.