दिव्य मराठीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी होणार !

औरंगाबाद - एकीकडे मजिठिया वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश तर दुसरीकडे वाढत जाणारा तोटा यामुळे दिव्य मराठी प्रशासनाने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून,अनेक रिपोर्टर,डीटीपी ऑपरेटर,उपसंपादक कमी करण्यात येणार आहेत.त्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जालना,बीड,उस्मानाबाद कार्यालयातील कर्मचा-यांना बसणार असून,या कॉस्ट कटींगमुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.
महाराष्ट्रात औरंगाबाद,नाशिक,जळगाव,सोलापूर आणि अकोला आवृत्त्या सुरू करण्यात आल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिव्य मराठीच्या डीबी कार्पोशनने महाराष्ट्रात यापुढे कोणताही आवृत्ती सुरू न करण्याचा निर्णय घेतला.दिव्य मराठीची सर्वात प्रथम आवृत्ती औरंगाबादमध्ये सुरू झाली.पाच वर्षे झाली तरी मराठवाड्यातील परभणी,हिंगोली,नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यात अंकच पोहचला नाही किंवा तसे प्रयत्न करण्यात आले नाहीत.महाराष्ट्रातील एकही आवृत्ती यशस्वी झाली नसून,वाढता तोटा दिव्य मराठी प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
आता मजिठिया वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर दिव्य मराठीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता कोणत्याही जिल्हा कार्यालयात डीटीपी ऑपरेटर राहणार नाही.प्रुफ रिडर आणि उपसंपादकही कमी करण्यात येणार आहेत.रिपोर्टरनी स्वत:ची बातमी टाईप करून मुख्य कार्यालयाकडे पाठवायची आणि मुख्य कार्यालयातील उपसंपादकांनी पाने लावून घ्यायची असा निर्णय घेण्यात आला आहे.
जालना आणि बीड कार्यालयातील रिपोर्टरनी औंरगाबाद आणि उस्मानाबादच्या रिपोर्टरनी सोलापूर कार्यालयाकडे बातम्या पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यामुळे आता या तिन्ही कार्यालयातील डीटीपी ऑपरेटर,उपसंपादक आणि पु्रफ रिडर कमी करण्यात येणार आहेत.त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आलेली आहे.काही निष्क्रिय रिपोर्टर सुध्दा कमी करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर सर्वच मुख्य कार्यालयातील अनेक डिटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर,उपसंपादक कमी होणार आहेत.पाचही आवृत्ती कक्षेतील जिल्हा कार्यालयातील रिपोर्टरनी मराठवाड्याप्रमाणे आपल्या बातम्या संबंधित मुख्य कार्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय होणार आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्हा कार्यालयात ब्युरोची जी मक्तेदारी सुरू होती ती आता संपुष्टात येणार आहे.
पुढारी थंडच !
एकीकडे गांवकरीने जोरदार मुसंडी मारली असताना औरंगाबादेत पुढारी सुरू होणार की नाही,अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.निवासी संपादक म्हणून भालचंद्र पिंपळवाडकर जॉईन झाले असले तरी अजून स्टॉपच भरती करण्यात आलेला नाही.मार्च महिन्यात पुढारीत जाहिरात देवूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिव्य मराठीत पुढारीची जाहिरात देण्यात आली होती,परंतु मोठ्या वृत्तपत्रातील कर्मचारी पुढारीत येण्यास इच्छुक दिसत नाहीत.आता दिव्य मराठीची कॉस्ट कटिंग झाल्यानंतर मात्र पुढारीला कर्मचारी मिळतील,अशी शक्यता आहे.
पुढारी १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्याचा पद्मश्रीचा घाट आहे,परंतु एकूण हालचाली थंडच आहेत.दुसरीकडे गांवकरी ८ जून रोजी सुरू झाला असून,सिटीसाठी १६ तर ग्रामीण भागासाठी १२ पानाचा अंक सुरू आहे.विविध मंत्री बोलावून डॉ.अनिल फळेंच्या अप्रतिम गप्पा चांगल्याच रंगल्या आहेत.