‘टाइम्स नाऊ’चे संपादक अर्णब गोस्वामी यांचा राजीनामा

मुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णब गोस्वामी हे त्यांच्या ‘द न्यूज अवर’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपादकीय बैठकीत अर्णब गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्षांपासून अर्णब गोस्वामी ‘टाइम्स नाऊ’मध्ये संपादक पदावर कार्यरत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर ‘द न्यूजअवर’ या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णब गोस्वामी हेच करतात. या कार्यक्रमावरील त्यांच्या आक्रमकपणामुळे ते कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष मुलाखत घेतली होती. टेलिव्हिजनवर थेट बातम्या देण्यास खासगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिल्या फळीत जे चेहरे पुढे आले. त्यामध्ये अर्णब गोस्वामी यांचाही समावेश होतो. ‘एनडीटीव्ही’ या वाहिनीवर पहिल्या फळीतील पत्रकारांच्या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. ‘टाइम्स समूहा’ने २४ तास चालणारी वृत्तवाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णब गोस्वामी या वाहिनीमध्ये संपादक म्हणून दाखल झाले. तेव्हापासून या वाहिनीचा चेहरा म्हणून अर्णब गोस्वामी यांच्याकडे बघितले जाते. पाकिस्तान स्थित एका दहशतवादी गटाने धमकी दिल्यामुळे गोस्वामी यांना नुकताच ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.