‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत कुलकर्णी यांचे निधन

नाशिक - अत्यंत परखड आणि तटस्थ पण तितक्याच लालित्यपूर्ण शैलीत लेखन करत पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारे ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, दोन विवाहित मुली मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, जावई, तीन भाऊ असा परिवार आहे.
हेमंत कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने कॉलेजरोडवरील विजन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी २.५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मूळचे अहमदनगरनिवासी असलेल्या हेमंत कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे दादा चौधरी विद्यालयात झाले. नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली होती. पत्रकारितेची वाट चोखाळणाऱ्या कुलकर्णी यांनी थेट मुंबई गाठली आणि लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकसत्ताचे माजी संपादक कै. विद्याधर गोखले यांचे बोट धरत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि एक विलक्षण अशी शैली आत्मसात करत कुलकर्णी यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ठसा उमटविला.
मुंबईनंतर कुलकर्णी यांनी १९८२-८३ पासून नाशिक येथे लोकसत्ताच्या जिल्हा प्रतिनिधीपदाची सूत्रे स्वीकारली. लोकसत्तामधील त्यांनी चालविलेले ‘वेध उत्तर महाराष्ट्राचा’ हे सदर विशेष लोकप्रिय ठरले होते. समाजातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवणाऱ्या कुलकर्णी यांचे ‘भाष्य’ स्तंभलेखनही गाजले. डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेरा वर्षांपासून ‘लोकमत’मध्ये कार्यरत असलेल्या कुलकर्णी यांची गेल्याच वर्षी सहयोगी समूह संपादकपदी नियुक्ती झाली होती. पत्रकाराने समाजात वावरताना आणि प्रसंगी लोकांशी समरस होतानाही आपली तटस्थ भूमिका अबाधित ठेवली पाहिजे आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण त्रयस्थाच्या भूमिकेतून अत्यंत परखडपणे केले पाहिजे, अशी धारणा घेऊन पत्रकारिता करणाऱ्या कुलकर्णी यांचा लेखनसंग्रह ‘परखड’ या शीर्षकाखाली जून २००१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. एक लिहिता संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अरुण टिकेकर या मान्यवर संपादकांचा त्यांना सहवास लाभला होता. साहित्य क्षेत्राबाबतही त्यांची विशेष रुची होती. पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक संस्थांनी गौरव केला होता. कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.