मंदार फणसे यांचा निखिल वागळेबाबतचा खुलासा...

 ( मंदार फणसे यांची फेसबुकवरील पोस्ट)


अलीकडेच निखिल वागळे सरांनी एक पत्र लिहून काही एक उल्लेख केला,की त्यांच्या नंतर ज्या दोघांना कार्यकारी संपादक IBN लोकमत,या पदावर नेमलं, ते एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरून.हे वाचून माझी करमणूक झाली. दुसरं म्हणजे माझं त्यांना आव्हान आहे कि त्यांचा हा पोकळ गौप्यस्फोट त्यांनी सप्रमाण सिद्ध करावा, मी माझी पत्रकारिता सोडून माझ्या गावी जाईन.
उगीच उठसुठ उठून आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना बदनाम करायचं हा उद्योग मला किळसवाणा वाटतो.कीव येते. याबाबत माझ्या कडे अनेक तपशील आहेत.अनेक प्रतिवाद आहेत. गरज पडली तर तेही लिहीन लवकरच.कारण मी ही पत्रकार आहे,आणि लिहायला घाबरत, कचरत नाही. माझी IBN लोकमत ला पुन्हा लागलेली वर्णी ही माझ्या वकुबावर आणि माझ्या आतापर्यंतच्या मेहनत,कर्तृत्व आणि माझ्यावरील विश्वासावर होती. मी साम वाहिनी अभिजित पवारांच्या परवानगी ने सोडून IBN लोकमत ला पुन्हा रुजू झालो ते माझ्या जुन्या मित्रांनी (जे झी वाहिनी मध्ये होते,2000 साली सोबत आणि एक जण जो IBN ग्रुप च्या सुरुवातीला आम्ही सोबत काम केलं होतं त्याने )जेव्हा त्यावेळच्या रिलायन्स व्यवस्थापनाला सांगितलं तेव्हा माझ्या 2 बैठका झाल्या तेव्हा मला जबाबदारी देण्यात आली. हे या महाशयांनी लक्षात ठेवले तर बरे होईल. खरं तर लिहिण्यासारखं खूप आहे. पण संयम ठेवतो. आता आदर संपत आलाय. मी आणि महेश म्हात्रे या माझ्या ज्येष्ठ मित्राने जी जबाबदारी दिली होती ती आमच्या परीने उत्तम निभावली.खोटे धंदे केले नाहीत. मी माझ्या लहानपणापासून खूप मोठे ताकदीचे संपादक जवळून पाहिलेत.आणि त्यांचा व्यासंग,कळकळ,संपर्क हे सुद्धा बारकाईने पाहिलंय.2 ते 4 संपादक पाहून या व्यवसायात आलो नाही. आमच्या पिढीत झालेल्या पत्रकारितेतल्या एकूण पडझडीची जबाबदारी आमच्यावर सुद्धा आहे असंही मी मानतो. प्रामाणिकपणा ,बेधडक पत्रकारिता,आम्ही आमच्या परिघात आणि आमच्या संस्कारात करत आलो आहोत,आणि करूच. माझी पत्रकारितेतली बांधिलकी हि भारतीय संविधानाशी कटिबद्ध आहे.कुणाच्या बडबडीवर आणि धादांत खोट्या आरोपांवर नाही . इतकंच माझ्या मनातून जनात आणतोय,कारण खदखद मी जोमबाळून ठेवत नाही.तुम्ही किती चारित्र्यवान आहात हे सांगतांना उगीच दुसऱ्यांची चारित्र्य डागाळू नका इतकंच तूर्तास सांगतो.

- मंदार फणसे