टीव्ही 9 मध्ये राजीनामा बॉम्ब: अवघ्या दोन महिन्यांत चार अँकर्सनी दिला रामराम

 


मुंबई - टीव्ही 9 मराठीमध्ये (Tv9 Marathi) सध्या काहीतरी मोठा घोळ सुरू असल्याचं दिसतंय. अवघ्या दोन महिन्यांत तब्बल चार अँकर्सनी चॅनलला रामराम ठोकला आहे. यामुळे, टीव्ही 9 मध्ये 'राजीनामा बॉम्ब' फुटला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुरुष अँकर्सची मोठी उणीव

चॅनलमधून बाहेर पडणाऱ्या अँकर्समध्ये सौरभ कोरटकर, सागर जोशी आणि सुमित सावंत यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, मनश्री पाठक आणि प्रणिता बोरसे यांनीही चॅनल सोडल्याचं बोललं जातंय. एकामागोमाग एक अँकर जात असल्यामुळे टीव्ही 9 मध्ये पुरुष अँकरची मोठी उणीव निर्माण झाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी चॅनलला नवीन पुरुष अँकर मिळवण्यात अडचणी येत असल्याचीही कुजबुज सुरू आहे.

रिपोर्टर्स आणि आउटपुट टीममध्येही राजीनामा सत्र

फक्त अँकर्सच नाही तर, रिपोर्टर्स आणि आउटपुट टीममधील कर्मचाऱ्यांनीही चॅनल सोडल्याची माहिती मिळतेय. रिपोर्टर संदीप राजगोळकर आणि विशाल पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय, आउटपुट टीममधील आशिष धनगर, आकांक्षा रक्ताटे, श्री काटे, भूषण पाटील, सुमेध मोहिते, विशाल पाटील, आकाश शिंदे, तेजल, आशुतोष, प्रणित आणि अजय यांनीही टीव्ही 9 सोडल्याचं म्हटलं जातंय.

टीव्ही 9 मध्ये नेमकं काय चाललंय?

एकाच वेळी इतके कर्मचारी, विशेषतः महत्त्वाच्या पदांवरील लोक चॅनल का सोडत आहेत, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. टीव्ही 9 मधील अंतर्गत वाद, व्यवस्थापनाशी संबंधित समस्या किंवा कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण यामागे काही कारण आहे का, याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

टीव्ही 9 मध्ये सुरू असलेल्या या 'राजीनामा सत्रा'मागे नेमकं काय कारण आहे, हे येणाऱ्या काळातच कळेल. मात्र, टीव्ही 9 मराठीच्या पत्रकारिता आणि कार्यक्रमांवर याचा काय परिणाम होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या